इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासिन भटकळ आणि त्याच्या चार साथीदारांना हैदराबादेत २०१३ साली दिलसुखनगर येथे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात काल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या एखाद्या दहशतवादी घटनेत दोषी ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०१० साली या दहशतवादी संघटनेवर सरकारने बंदी घातली आहे.
हैदराबादच्या दिलसुखनगर येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत फेब्रुवारी २०१३ मध्ये २१ लोक ठार, तर १३० जखमी झाले होते. त्या स्फोटांच्या तपासाअंती यासिन भटकळचा व इंडियन मुजाहिद्दीनचा त्यात हात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये यासिन भटकळ याला बिहारमध्ये नेपाळच्या सीमेवर अटक झाली. या स्फोट प्रकरणातील पहिला आरोपी व यासिनचा भाऊ महंमद रियाझ ऊर्फ रियाझ भटकळ हा फरारी आहे. तो पाकिस्तानात असावा असा कयास आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने हैदराबादच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. नुकतेच न्यायालयाने भटकळ याला दोषी ठरवले होते. काल त्याला तसेच त्याच्या साथीदारांना फाशीची सजा सुनावणारा निवाडा विशेष न्यायालयाने दिला. असदुल्ला अख्तर ऊर्फ हड्डी, झिया उर रेहमान ऊर्फ वकास, महंमद तहसीन अख्तर ऊर्फ हसन, अहमद सिद्दिबाप्पा झर्रार ऊर्फ यासिन भटकळ व अजाझ शेख अशी आरोपींची नावे आहेत. इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकांनी दिलसुखनगर बस स्टॉपजवळ संध्याकाळी सातच्या सुमारास गर्दी असताना लागोपाठ दोन बॉम्बस्फोट घडवले होते. तेथील एका दुकानातील सीसीटीव्हीत व वाहतूक खात्याच्या कॅमेर्यात स्फोटाची दृश्ये चित्रीत झाली होती. त्या आधी इंडियन मुजाहिद्दीनचा एक हस्तक सायकलवरून टिफीन बॉक्स ठेवून पसार झाल्याचे त्यात दिसले होते.