हैदराबाद-गोवा आज आमनेसामने

0
124

सातव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी वास्को येथील टिळक मैदानावर हैदराबाद एफसी आणि एफसी गोवा आमनेसामने येतील. हैदराबादसाठी आतापर्यंतची मोहिम संमिश्र ठरली आहे. मॅन्युएल मार्क्वेझ यांचा संघ पाच सामने झाल्यानंतर अपराजित होता. त्यानंतर मात्र सलग दोन सामने गमवावे लागल्यामुळे त्यांची गुणतक्त्यात आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. अशावेळी गोव्याच्या रुपाने त्यांच्यासमोर कडवे आव्हान असेल, मात्र गोव्याच्या बचावातील समस्यांमुळे हैदराबादला मोहिमेची गाडी रुळावर आणण्याची आशा असेल.

गोवा सहाव्या क्रमांकावर आहे. यंदाच्या मोसमात सर्वाधिक धोकादायक आक्रमण करणारा संघ असा लौकीक त्यांनी निर्माण केला आहे. त्यांनी आतापर्यंत दहा गोल केले आहेत, पण बचावाच्या पातळीवर कडेकोट खेळ करणे त्यांच्यासाठी अवघड ठरले आहे. त्यांना नऊ गोल स्वीकारावे लागले असून केवळ एक क्लीन शीट राखता आली आहे. त्यांच्याविरुद्ध सात गोल सेट-पिसेसवर झाले असून सहभागी संघांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. गोव्याला बचावात झगडावे लागत असल्याची मार्क्वेझ यांना कल्पना आहे. त्यामुळे आपल्या संघाला जिंकण्याची संधी असेल हे सुद्धा त्यांना ठाऊक आहे. यंदा हैदराबादचा संघ अनेक वेळा संधी दवडण्याबद्दल दोषी ठरला. यावेळी नेटसमोर सफाईदार खेळ होण्याच्यादृष्टीने त्यांना खबरदारी घ्यावी लागेल.