बॉक्सिंग डे कसोटीत भारत ‘अजिंक्य’

0
109

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारताने काल मंगळवारी ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणार्‍या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणेने विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने ७ चौकारांसह ३५ तर रहाणेने ३ चौकारांसह २७ धावा केल्या. या विजयामुळे भारताने ‘बॉर्डर-गावसकर’ कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी साकारणार्‍या अजिंक्य रहाणेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसर्‍या डावात २०० धावांवर सर्वबाद झाला. महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चौथ्या दिवशी कॅमेरून ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी तिसर्‍या दिवशी केलेल्या ६ बाद १३३ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र भारताच्या गोलंदाजीसमोर ते जास्त तग धरू शकले नाही. मोहम्मद सिराजने ३ तर, अश्‍विन, बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

धावफलक
ऑस्ट्रेलिया सर्वबाद १९५
भारत पहिला डाव ः सर्वबाद ३२६
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव (६ बाद १३३ वरून) ः कॅमेरून ग्रीन झे. जडेजा गो. सिराज ४५, पॅट कमिन्स झे. अगरवाल गो. बुमराह २२, मिचेल स्टार्क नाबाद १४, नॅथन लायन झे. पंत गो. सिराज ३, जोश हेझलवूड त्रि. गो. अश्‍विन १०, अवांतर ८, एकूण १०३.१ षटकांत सर्वबाद २००
गोलंदाजी ः जसप्रीत बुमराह २७-६-५४-२, उमेश यादव ३.३-०-५-१, मोहम्मद सिराज २१.३-४-३७-३, रविचंद्रन अश्‍विन ३७.१-६-७२-२, रवींद्र जडेजा १४-५-२८-२
भारत दुसरा डाव ः मयंक अगरवाल झे. पेन गो. स्टार्क ५, शुभमन गिल नाबाद ३५, चेतेश्‍वर पुजारा झे. ग्रीन गो. कमिन्स ३, अजिंक्य रहाणे नाबाद २७, अवांतर ०, एकूण १५.५ षटकांत २ बाद ७०
गोलंदाजी ः मिचेल स्टार्क ४-०-२०-१, पॅट कमिन्स ५-०-२२-१, जोश हेझलवूड ३-१-१४-०, नॅथन लायन २.५-०-५-०, मार्नस लाबुशेन १-०-९-०

ऑस्ट्रेलियन भूमीवरील टीम इंडियाचा आठवा कसोटी विजय
भारताने कांगारूंच्या भूमीत आठवा कसोटी विजय काल मंगळवारी संपादन केला. ऑस्ट्रेलियात ८ विजय मिळवणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला आहे. भारताने ऑस्ट्रेलियातील ४ विजय मेलबर्नमध्ये २ ऍडिलेड येथे तर पर्थ आणि सिडनीमध्ये प्रत्येकी १ विजय मिळवला आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक विजय मिळवणार्‍या आशियाई संघांमध्ये पाकिस्तान संघाचा दुसरा क्रमांक येतो. पाकिस्तानने ४ वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे. श्रीलंका व बांगलादेश संघाला ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.

शुभमनची कमाल
आशिया बाहेर पदार्पण करताना दोन्ही डावात २५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा शुभमन गिल हा केवळ चौथा भारतीय फलंदाज आहे. शुभमनने पहिल्या डावात ४५ तर दुसर्‍या डावात नाबाद ३५ धावांची खेळी केली. शुभमनपूर्वी नाउमल जिउमल यांनी १९३२ साली आपल्या पदार्पणात ३३ व २५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर १९७१ साली लिट्ल मास्टर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना ६५ आणि नाबाद ६७ धावांची खेळी केली होती. शुभमन सोबत सलामीसाठी आलेल्या मयंक अगरवालने २०१८साली मेलबर्न येथेच कसोटी पदार्पण करताना ७६ आणि ४२ धावांची खेळी केली होती.

डाव्यांवर अश्‍विन भारी!
भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विन हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा डावखुर्‍या फलंदाजाला बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. मेलबर्न कसोटीच्या दुसर्‍या डावात जोश हेझलवूड याचा त्रिफळा उडवत त्याने श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरन याला मागे टाकत अव्वल स्थान मिळविले. अश्‍विनच्या नावावर डावखुर्‍या फलंदाजांचे तब्बल १९२ बळी नोंद झाले आहेत. मुरलीधरनच्या ८०० कसोटी बळींपैकी १९१ हे डावखुर्‍यांचे होते. विशेष म्हणजे अश्‍विनने केवळ ३७५ बळीनंतर मुरलीला पछाडले. जलदगती गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्या जेम्स अँडरसन याच्या नावे १८६ ‘डावखुरे’ बळी आहेत.

१९८८ नंतर प्रथमच
मायभूमीत कसोटीच्या एका डावात एकाही खेळाडूला अर्धशतकी वेस ओलांडता न आल्याची घटना काल ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या डावात घडली. कांगारूंकडून कॅमेरून ग्रीन याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत १९८८ नंतर असे प्रथमच घडले. ३२ वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध कांगारूंच्या बाबतीत असे घडले होते.