हैदराबादला ‘क्वॉलिफायर २’मध्ये स्थान

0
256

>> रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे आव्हान आटोपले

सनरायझर्स हैदराबादने ‘एलिमिनेटर’ लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा काल शुक्रवारी ६ गडी राखून पराभव करत ‘क्वॉलिफायर २’ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी गाठ पक्की केली. बंगलोरने विजयासाठी ठेवलेले १३२ धावांचे माफक लक्ष्य हैदराबादने १९.४ षटकांत केवळ ४ गडी गमावून गाठले. वेस्ट इंडीजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डर याने गोलंदाजीत केवळ २५ धावांत ३ गडी बाद करतानाच फलंदाजीत नाबाद २४ धावा करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून बंगलोरला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. अनपेक्षितरित्या विराट कोहलीने देवदत्त पडिकलसह बंगलोरच्या डावाची सुरुवात केली. परंतु, कोहलीचा हा निर्णय अंगलट आला. कोहली व पडिकल हे दोघेही अपयशी ठरले. जेसन होल्डरने या द्वयीला माघारी धाडले. २ बाद १५ अशा स्थितीतून ऍरोन फिंच व एबी डीव्हिलियर्स यांनी डाव सावरताना आक्रमक फटक्यांपेक्षा धावफलक हलता ठेवण्यावर अधिक लक्ष्य केंद्रीत केले. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ४१ धावांची भागीदारी रचली. अकराव्या षटकात फिंच बाद झाला. याच षटकात नो बॉलवर मिळालेल्या फ्री हिटवर मोईन अली धावबाद झाला. यामुळे बंगलोरची २ बाद ५६ वरून ४ बाद ६२ अशी घसरगुंडी उडाली. शिवम दुबे व वॉशिंग्टन सुंदर यांना वेगाने धावा जमवणे शक्य झाले नाही. एबीने काही आकर्षक फटके खेळत अर्धशतक लगावले. पण, १८व्या षटकात नटराजनने एका अप्रतिम यॉर्करवर डीव्हिलियर्सचा त्रिफळा उडवल्याने बंगलोरचे दीडशतकी वेस ओलांडण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. त्यांना ७ बाद १३१ धावांवर समाधान मानावे लागले.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवातही खराब झाली. गोस्वामी भोपळाही फोडू शकला नाही. १२व्या षटकात हैदराबादचा संघ ४ बाद ६७ असा चाचपडत होता. किवी कर्णधार केन विल्यमसन याने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत ४४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या. जेसन होल्डरसह पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची अविभक्त भागीदारी करत त्याने दबावाखाली खचून न जाता हैदराबादला विजयी केले.

हैदराबादला या सामन्यासाठी नाईलाजास्तव एक बदल करावा लागला. यष्टिरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा जायबंदी असल्यामुळे त्याची जागा श्रीवत्स गोस्वामी याने घेतली. बंगलोरने जोश फिलिपे याला बाहेर बसविले. दुखापतीमुळे मॉरिस खेळू शकला नाही. या दोघांची जागा ऍरोन फिंच व मोईन अली यांनी घेतली. इसुरु उदाना व शाहबाज अहमद यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर ऍडम झॅम्पा उदानाच्या जागी खेळला तर तंदुरुस्त झाल्याने नवदीप सैनी संघात परतला.

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः विराट कोहली झे. गोस्वामी गो. होल्डर ६, देवदत्त पडिकल झे. गर्ग गो. होल्डर १, ऍरोन फिंच झे. समद गो. नदीम ३२, एबी डीव्हिलियर्स त्रि. गो. नटराजन ५६ (४३ चेंडू, ५ चौकार), मोईन अली धावबाद ०, शिवम दुबे झे. वॉर्नर गो. होल्डर ८, वॉशिंग्टन सुंदर झे. समद गो. नटराजन ५, नवदीप सैनी नाबाद ९, मोहम्मद सिराज नाबाद १०, अवांतर ४, एकूण २० षटकांत ७ बाद १३१

गोलंदाजी ः संदीप शर्मा ४-०-२१-०, जेसन होल्डर ४-०-२५-३, थंगरसू नटराजन ४-०-३३-२, शहाबाज नदीम ४-०-३०-१, राशिद खान ४-०-२२-०
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर झे. डीव्हिलियर्स गो. सिराज १७, श्रीवत्स गोस्वामी झे. डीव्हिलियर्स गो. सिराज ०, मनीष पांडे झे. डीव्हिलियर्स गो. झॅम्पा २४, केन विल्यमसन नाबाद ५० (४४ चेंडू, २ चौकार, २ षटकार), प्रियम गर्ग झे. झॅम्पा गो. चहल ७, जेसन होल्डर नाबाद २४, अवांतर १०, एकूण १९.४ षटकांत ४ बाद १३२
गोलंदाजी ः मोहम्मद सिराज ४-०-२८-२, नवदीप सैनी ३.४-०-३१-०, वॉशिंग्टन सुंदर २-०-२१-०, ऍडम झॅम्पा ४-०-१२-१, युजवेंद्र चहल ४-०-२४-१, मोईन अली १-०-४-०, शिवम दुबे १-०-७-०