
>> आयपीएल जेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्सशी गाठ
अफगाणिस्तानच्या राशिद खान याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या अकराव्या पर्वाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. कोलकातामध्ये काल शुक्रवारी झालेल्या दुसर्या क्वॉलिफायर लढतीमध्ये सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा १४ धावांनी पराभव केला. आता २७ रोजी हैदराबादची लढत चेन्नई सुपर किंग्सशी होईल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल.
हैदराबादने दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या केकेआरला ख्रिस लिन-सुनील नारायणने केवळ ३.२ षटकांत ४० धावांची सलामी दिली. कोलकाताची ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरु असताना सिद्धार्थ कौलने नारायणचा अडथळा दूर करत हैदराबादला पहिले यश मिळवून दिले. यानंतर लिन (४८) व नितीश राणा (२२) यांनी ४७ धावांची भागीदारी करत संघाचा कोसळता डोलारा सावरत हैदराबादच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. मात्र राशिद खान गोलंदाजीला येताच हे चित्र बदलले. त्याने आपल्या ४ षटकांत अवघ्या १९ धावांच्या मोबदल्यात रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन आणि आंद्रे रसेल या तीन महत्त्वाच्या शिलेदारांना बाद केले. रसेलसाठी तर कर्णधार विल्यमसनने शॉटर् लेग व स्लिप लावताना दाखवलेले नेतृत्वकौशल्य वाखाणण्याजोगे होते. राशिदची ‘गुगली’ कट् करण्याच्या नादात रसेल स्लिपमध्ये झेलबाद झाल्यानंतर केकेआरचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. राशिदने नितीश राणाला धावबाद करतानाच तसेच शेवटच्या षटकामध्ये शिवम मावी आणि शुभमन गिल यांचे सीमारेषेवर झेल घेत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले.
तत्पूर्वी, आपल्या अचूक फिरकीसाठी प्रसिद्ध असलेल्या अफगाणिस्तानच्या राशिद खानने हाणामारीच्या षटकांत केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर १७५ धावांचे आव्हान उभे केले. राशिदने अवघ्या १० चेडूंत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३४ धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीमुळेच चाचपडणार्या हैदराबादला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून आव्हानात्मक धावसंख्या रचणे शक्य झाले.
शिखर धवन आणि वृध्दिमान सहा यांनी हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने एकाच षटकामध्ये सुरुवातीला शिखर धवन आणि नंतर लगेच केन विल्यमसनला बाद करत हैदराबादला दोन धक्के दिले. मधल्या फळीत शाकिब अल हसन (२४ चेंडूंत २८) व हुडा (१९ चेंडूंत १९) यांना अपेक्षित वेगाने धावा जमवता आल्या नाहीत. त्यामुळे हैदराबादचा संघ रडतखडत दीडशेच्या आसपास जाईल, असेच चिन्ह दिसत होते. मात्र शेवटच्या दोन षटकात राशिदने आपल्या बॅटने केकेआरला तडाखा दिला. कोलकाताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक २ गडी बाद केले.
हैदराबादने या सामन्यासाठी आपल्या संघात तीन बदल करताना मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी व संदीप शर्मा यांना वगळताना दीपक हुडा, वृध्दिमान साहा व खलिल अहमद यांना संंधी दिली. दुसरीकडे कोलकाताने केवळ तीन विदेशी खेळाडू उतरवण्याचा निर्णय घेत जेव्होन सर्ल्सच्या जागी शिवम मावीला संघात घेतले.
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः वृध्दिमान साहा यष्टिचीत कार्तिक गो. चावला ३५, शिखर धवन पायचीत गो. कुलदीप ३४, केन विल्यमसन झे. कार्तिक गो. कुलदीप ३, शाकिब अल हसन धावबाद २८, दीपक हुडा झे. चावला गो. नारायण १९, युसूफ पठाण झे. चावला गो. मावी ३, कार्लोस ब्रेथवेट धावबाद ८, राशिद खान नाबाद ३४, भुवनेश्वर कुमार नाबाद ५, अवांतर ५, एकूण २० षटकांत ७ बाद १७४
गोलंदाजी ः शिवम मावी ४-०-३३-१, प्रसिद्ध कृष्णा ४-०-५६-०, आंद्रे रसेल १-०-९-०, सुनील नारायण ४-०-२४-१, पीयुष चावला ३-०-२२-१, कुलदीप यादव ४-०-२९-२
कोलकाता नाईट रायडर्स ः ख्रिस लिन पायचीत गो. राशिद ४८, सुनील नारायण झे. ब्रेथवेट गो. कौल २६, नितीश राणा धावबाद २२, रॉबिन उथप्पा त्रि. गो. राशिद २, दिनेश कार्तिक त्रि. गो. शाकिब ८, शुभमन गिल झे. धवन गो. ब्रेथवेट ३०, आंद्रे रसेल झे. धवन गो. राशिद ३, पीयुष चावला त्रि. गो. कौल १२, शिवम मावी झे. राशिद गो. ब्रेथवेट ६, कुलदीप यादव नाबाद १, प्रसिद्ध कृष्णा नाबाद ०, अवांतर ३, एकूण २० षटकांत ९ बाद १६१
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ४-०-३८-०, खलिल अहमद ३-०-३८-०, सिद्धार्थ कौल ४-०-३२-२, राशिद खान ४-०-१९-३, कार्लोस ब्रेथवेट २-०-१६-२, शाकिब अल हसन ३-०-१६-१