हेरगिरीचा खटला आणि पाक अण्वस्त्रांची सुरक्षा

0
126
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या हेरगिरीच्या प्रकरणात पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचे लाडके सावज आणि आयएसआय, पाकिस्तानी सेना व सरकारचा आदिम शत्रू असलेल्या भारताचे नाव कुठेही आले नाही. या हेरगिरीचा उगमकर्ता, पाकिस्तानला १४५ बिलियन डॉलर्सची सैनिकी व आर्थिक मदत देणारा पाकिस्तानचा अनेक वर्षांपासूनचा मित्र, अमेरिका आहे. पाकिस्तान अमेरिकेपासून अनेक गोष्टी गुप्त राखतो असे अमेरिकेचे ठाम मत आहे. त्यासाठी अमेरिका पाकिस्तानची, चीन संबंधातील, सिक्रेट्स मिळवण्याच्या मागावर आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये पाकिस्तानच्या संरक्षदलातील निवृत्त लेफ्टनन्ट जनरल जावेद इक्बाल यांच्यासह एक लष्करी अधिकारी व संरक्षणदृष्ट्या अतिसंवेदनशील खात्यातील एका नागरी अधिकार्‍याला मिळालेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे ‘पाकिस्तानची अण्वस्त्र सुरक्षित आहेत’ ह्या पाकिस्तानी सेनेच्या वल्गनेचे धिंडवडे निघालेत. हेरगिरी आणि संरक्षण विषयक सुरक्षित माहिती पाकिस्तानचा शत्रूच्या इंटलिजन्स एजन्सींना देण्याच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या या तीन सैनिकी अधिकार्‍यांच्या ‘कोर्ट मार्शल’ मुळे पाकिस्तानी सेनेची इभ्रत तर धुळीला मिळालीच; पण सामान्य नागरिकांच्या नजरेत सेनेवरील विश्वासाची अवनती झाली.

वरिष्ठ सैनिकी अधिकार्‍यांनी बाह्य देशांसाठी हेरगिरी केली या आरोपाखाली झालेल्या कोर्ट मार्शलमुळे पाकिस्तानी अण्वस्त्रे तेथील सेनेच्या हातीदेखील सुरक्षित नाही हे सत्य उजागर झाले आहे. त्यामुळे सेनेला लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता येन केन प्रकारेण पुनःर्प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे लागेल. या कोर्ट मार्शलमध्ये उघडकीस आलेल्या माहितीनुसार, या अधिकार्‍यांनी अमेरिकेच्या सेंट्रल इंटलिजन्स एजन्सीला (सीआयए) ही माहिती दिली. या घटनेमुळे, पाकिस्तान व अमेरिकेचे सामरिक व राजनीतिक संबंध वरवर दिसतात त्यापेक्षा ही वाईट झाले आहेत असे मानायला मोठाच वाव आहे.

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानी ठोठावलेल्या शिक्षेचं अनुमोदन, सेनाध्यक्ष जनरल कमर जावेद बाजवांनी केलं. मात्र त्यांनी लेफ्टनंट जनरल जावेद इक्बालचा मृत्युदंड आजन्म कारावासात बदली केला आणि निवृत्त ब्रिगेडियर राजा रिझवान हैदर आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ, डॉ. वसीम अक्रमचे मृत्युदंड कायम ठेवलेत. पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी, शत्रू राष्ट्रासाठी हेरगिरी करणे व त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे किंवा विकण्याचे लोण आता पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागातील उच्चपदीय अधिकार्‍यांपर्यंत जाऊन पोचले आहे हे देखील या कोर्टमार्शलमुळे सिद्ध झाले. २०१५ मध्ये निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल जावेद इक्बाल याआधी सेनामुख्यालयात डायरेक्टर ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स व ऍडज्युएंट जनरल आणि चार पाकिस्तानी कोअर्सपैकी सर्वात महत्वाच्या भावलपूरचे स्ट्राईक कोअर कमांडर होते. ब्रिगेडियर राजा रिझवान हैदर सेना मुख्यालयात वरिष्ठ अधिकारी आणि अक्रम पाकिस्तानच्या गुप्त अण्वस्त्र संस्थेतील अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,या संबंधात अनेक लष्करी व नागरी अधिकार्‍यांची चौकशी सुरु असून यापुढे आणखी कोर्ट मार्शल्स आणि मृत्युदंड जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

पाकिस्तानचे वरिष्ठ सैनिकी अधिकारी बाह्य देशांना पाकिस्तानची गुप्त माहिती देतात याचा संशय मे, २०११ मध्ये अमेरिकन सील कमांडोंनी ओसामा बिन लादेनला अबोटाबादच्या मिलिटरी कँटोन्मेंटमध्ये जाऊन मारल्यानंतर, पाकिस्तानी सेना व आयएसआयच्या उच्चाधिकार्‍यांना आला. पण ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये कसा व कधी आला, त्याला तेथे आणण्यात कोणी पुढाकार घेतला याच्या ऐवजी त्याला अमेरिकन कमांडोंच्या हाती कसे मरण आले याचीच चर्चा माध्यमांमध्ये सुरु करण्यासाठी आयएसआयचे पाकिस्तानी प्रोपोगंडा मशीन कंबर कसून तयार झाले. त्यासाठी सेना आणि आयएसआयने पाकिस्तानी नागरी सरकारवर दबाव आणून, सर्वप्रथम पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत, हक्कानी यांच्या वरील मोमोगेट अभियान सुरु केले. परिणामस्वरुप त्यांना राजीनामा देण्यास बाध्य करण्यात आले आणि त्यांच्यावर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. तत्कालीन, पाकिस्तानी नागरी सरकारने सीआयएच्या अधिकार्‍यांना पाकिस्तानमध्ये येण्याचा व्हिसा गुप्त रितीनी कसा दिला आणि लादेन कुठे आहे याची माहिती मिळवण्यासाठी, ब्लॅक वॉटर या अमेरिकन मर्सनरी सिक्युरिटी कॉर्पोरेशनला पाकिस्तान मध्ये कसे व कोणी कार्यरत केले याच्या सुरस व चमत्कारी कथांनी पाकिस्तानी व जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये धुमाकूळ माजवला.

अबोटाबादची अमेरिकन कारवाई पाकिस्तानच्या तत्कालीन नागरी सरकारने अमेरिकेला खुश करण्यासाठी वा त्यांच्या आर्थिक दबावाखाली केली हे धादांत असत्य अमेरिका वगळता पाकिस्तानी जनता आणि इतर जागतिक प्रसार माध्यमांच्या गळी उतरवण्यात आयएसआय व पाकिस्तानी सेना सफल झाली. अमेरिकन कमांडो अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये येऊन हल्ला करू शकतात तर ते घरभेद्यांच्या मदतीनी, कोणालाही नकळत, पाकिस्तानच्या आण्विक कोठारांवर देखील असाच हल्ला करू शकतील याची धास्ती सेना व आयएसआयनी घेतली. या सर्व धामधुमीच्या आडोश्यात लादेन पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लपला आहे याची माहिती सीआयएला कोणी दिली, अमेरिकन कमांडोंची हेलिकॉप्टर्स पाकिस्तानमध्ये गुप्त रितीनी कशी आलीत, त्या दोन तासांसाठी एयर डिफेन्स कव्हर कोणी बंद केले आणि अमेरिकेला आपली माहिती पुरवणारा आपल्यातील जयचंद कोण आहे या प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यात आयएसआय व पाकिस्तानी सेना व्यस्त झाली. त्यांना या सूत्रांची खबर तर लागली पण आपली प्रतिमा उजळ राखण्यासाठी त्यांची वाच्यता केली गेली नाही किंवा त्यांची चौकशीची बातमी कुठेही बाहेर फुटू दिली नाही. पण आमचा माणूस कुठे आहे याची माहिती आम्हाला मिळणे हा आमचा मानवाधिकार आहे या सबबीखाली, अटक झालेल्यांपैकी एकाच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर, या कोर्ट मार्शल्सची माहिती जनतेसमोर मांडण्याशिवाय आयएसआय आणि सेनेकडे पर्यायच नव्हता.

पाकिस्तानी अण्वस्त्र प्रकल्प वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सोत्रांकडून, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रकारे मिळवलेले आराखडे आणि अंगभूत घटकांच्या सहाय्यानी बनलेला आहे. पाकिस्तानने हे तंत्रज्ञान कुठून व कसे मिळवल याचा आढावा घेतल्यास असे आढळून येत की अशा धेडगुजरी भेसळीमुळे त्या अण्वस्त्रांची प्रतिबंधक/निवारक क्षमता वादग्रस्त झाली आहे. ऊर्ध्वरेखित हेरगिरी खटल्याच्या माध्यमातून सेना व आयएसआय, अण्वस्त्रांवरील आपले ‘चेक्स अँड बॅलॅन्सेस’ किती घट्ट व दृढ आहेत याचा प्रत्यय जगाला आणि देशातील जनतेला आणून देण्याचा प्रयत्न करते आहे.
असं असलं तरी, पाकिस्तान व त्यांची अण्वस्त्रं सेनेच्याच हाती सुरक्षित आहेत ही मागील अनेक दशकं चालत आलेली विश्वसनीय खात्री आर्मी ट्रिब्युनलच्या ह्या निकालामुळे रसातळाला गेली. सेनेनं दिलेल्या ह्या खात्रीवर प्रश्नचिन्ह उभे करणार्‍या, कायदे आझम महंमद अली जिन्हांची बहीण फातिमा जिन्हांसकट, सर्व लोकांना ‘देशद्रोही’ करार देण्यात आलं. यापैकी कोणालाही शत्रूला मदत करण्याच्या आरोपाखाली कोर्टासमोर आणले गेले नाही किंवा कोणाला ही शिक्षा दिली गेली नाही.

मात्र आता ज्या देशाची सुरक्षा सदैव त्या देशातील सेनेच्याच हाती होती त्याच सेनेतील वरिष्ठ सैनिकी अधिकारी व शास्त्रज्ञ याची गुप्त माहिती कोणालाही विकू शकतात हे या निकालानंतर उजागर झालं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या हेरगिरीच्या प्रकरणात पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचे लाडके सावज आणि आयएसआय, पाकिस्तानी सेना व सरकारचा आदिम शत्रू असलेल्या भारताचे नाव कुठेही आले नाही. या हेरगिरीचा उगमकर्ता, पाकिस्तानला १४५ बिलियन डॉलर्सची सैनिकी व आर्थिक मदत देणारा पाकिस्तानचा अनेक वर्षांपासूनचा मित्र, अमेरिका आहे. सांप्रत पाकिस्तान व अमेरिकेत १९५५ पासून सुरु झालेल्या अमेरिका रशियामधील शीतयुद्धाच्या वेळचं सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेलं नाही. किंबहुना ते सातत्याने अधोगतीला जातांना प्रत्ययाला येतं. अमेरिकेचं सामरिक ध्येय/ असलेल्या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये चीन त्याचा पहिला शत्रू असून भारत विषयक जन्मजात आकसामुळे अमेरिकेकडून झिडकारला गेलेला पाकिस्तान वेगानेे चीनच्या छत्रछायेखाली गेलेला दिसून पडतो.

पाकिस्तान अमेरिकेपासून अनेक गोष्टी गुप्त राखतो असे अमेरिकेचे ठाम मत आहे. त्यासाठी अमेरिका पाकिस्तानची, चीन संबंधातील, सिक्रेट्स मिळवण्याच्या मागावर आहे. वरिष्ठ सैनिकी अधिकारी व शास्त्रज्ञ, पाकिस्तानच्या अण्वस्त्र संबंधातील गुप्त बाबी अमेरिकेला विकायला तयार झालेत, एवढेच नव्हे तर त्यांनी ती अमेरिकेला दिल्यामुळे आणि तदनंतर पकडलेही गेल्यामुळे हाती असलेल्या अण्वस्त्रांद्वारे भारताच्या कोल्ड वॉर डॉक्टरीनपासून संरक्षण मिळवण्याऐवजी पाकिस्तानला आता यापुढे ती इतरांच्या हाती तर पडणार नाहीत याची काळजी करावी लागेल.