बलात्कार खून प्रकरणातील सर्व आरोपी एनकाऊंटरमध्ये ठार

0
287

गेल्या आठवड्यात हैदराबाद येथे एका पशुवैद्य असलेल्या २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून ठार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व चारही आरोपी काल (शुक्रवारी) पोलिसांच्या कथित एनकाऊंटरमध्ये मृत्यूमुखी पडले. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी ही माहिती दिली.

घटनेनंतर देशभर मोठी खळबळ उडाली. देशाच्या विविध शहरांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर येऊन मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. याप्रकरणी विविध थरातील नागरिकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रकरणानंतर राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात निदर्शनेही झाली.

२० ते २४ या वयोगटातील चारही आरोपींना या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणी २९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. चौघाही आरोपींना शुक्रवारी सकाळी तपासकामासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. तेथे आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाले.

जखमी पोलिसांची प्रकृती स्थिर
एन्काऊंटरच्या वेळी आरोपींच्या हल्ल्यात जखमी झालेले दोन्ही पोलीस कर्मचारी इस्पितळात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. याविषयी राज्य प्रशासनाने पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार
आयोगाकडून दखल
दरम्यान, या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. एनकाऊंटरचा हा प्रकार हा चिंतेचा विषय असून त्याची काळजीपूर्वक चौकशी व्हायला हवी असे आयोगाने मत व्यक्त केले आहे. आयोगाने म्हटले आहे की आरोपींना घटनास्थळी घेऊन गेलेले पोलीस तेथे कोणत्याही संभाव्य अनुचित घटनेसंदर्भात सावध नसावेत किंवा त्या दृष्टीने पोलिसांची सज्जता नसावी. त्याच्या परिणामस्वरूप आरोपी मृत्यूमुखी पडले. महिलांवरील वाढत्या अत्याचारांची दखल आयोगाने घेतली असून आयोगाने अशा प्रकरणांचे अहवाल देण्याचे निर्देश सर्व राज्यांना तसेच केंद्र सरकारला दिले आहेत.

जगण्याचा हक्क तसेच कायद्यासमोर सर्वांना समानता हे मूलभूत मानवी हक्क आहेत याकडे आयोगाने लक्ष वेधले आहे. महिलांवरील पाशवी, हीन अत्याचारांमुळे देशभरात भीतीचे तसेच तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

सायबराबाद पोलिसांविरुद्ध
वकिलांकडून याचिका
मुंबईस्थित वकील गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांनी भारताचे सरन्यायाधीश, तेलंगण हायकोर्ट, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे पोलिसांनी चार आरोपींना ठार केल्याप्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत.

एनकाऊंटरचे बळी, जल्लोष
आणि चिंतेचेही सूर!
हैदराबादमधील या एनकाऊंटरमध्ये सर्व आरोपी ठार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वत्र विद्यार्थी, युवक-युवती, महिला, पुरुष अशा सर्वच थरातील नागरिकांनी उघडपणे आनंद व्यक्त केल्याचे जाहीर झाले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळावर लोकांनी हैदराबाद पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांना खांद्यावर घेऊन जल्लोषही केला. महिलांनी पोलिसांना राख्या बांधून आपल्या भावना व्यक्त केल्या. एकमेकांना लोकांनी मिठाई वाटपही केले.

आनंदाच्या भावना व्यक्त केल्या जात असताना पोलिसी कारवाईबद्दल काहींनी चिंताही व्यक्त केली. संयमाचे सूरही ऐकू आले. आरोपी पळून जात होते असे पोलिसांचे म्हणणे होते, तर त्यांना पोलिसांना गुडघ्याखाली गोळ्या घालायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली. पोलीसच कायदा हातात घेतात हा भयानक प्रकार अहे असेही काहींचे म्हणणे होते.

बलात्कार्‍यांना दया याचनेची
संधी नको ः राष्ट्रपती

महिलांवर होत असलेल्या राक्षसी अत्याचारांमुळे आपल्या देशातील नागरिकांची सद्सद्विवेकबुद्धी हादरली आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये तसेच पोक्सो कायद्याखाली दोषी ठरलेल्या आरोपींना दया याचनेची संधीच मिळता कामा नये असेही कोविंद यांनी म्हटले आहे. याबाबत निर्णय संसदेने घ्यावा लागेल. त्यासाठी घटनेत आवश्यक ती सुधारणा करावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. राजस्थानमध्ये महिला सुरक्षा विषयावरील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुलांमध्ये महिलांप्रती आदर भावना निर्माण करण्याची प्रत्येक पालक तथा नागरिकांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

स्वसंरक्षणार्थ आरोपींना
गोळ्या झाडल्या ः पोलीस

आरोपींनी पोलिसांवर काठ्यांनी हल्ला करत त्यांच्याकडील बंदूक खेचून घेऊन गोळीबार सुरू केल्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करीत त्यांना गोळ्या घातल्याची माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपींच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविणार असल्याचेही ते म्हणाले.

सज्जनार यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की, बर्‍याच तपासानंतर आम्ही चार आरोपींना ३० नोव्हेंबरला अटक केली. ४ डिसेंबरला त्यांची कस्टडी मिळाली. यावेळी आम्ही आरोपींनी गुन्हा कसा केला त्याची चौकशी सुरू केली. यावेळी त्यांनी पीडितेचा मोबाईल व अन्य गोष्टी घटनास्थळी लपविल्याचे सांगितले. आरोपींना घेऊन पोलीस घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या बंदुका खेचून घेतल्या. आमच्या अधिकार्‍यांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला त्यात चौघेही आरोपी ठार झाले. असे सज्जनार यांनी स्पष्ट केले.