भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश उपाध्यक्ष व उद्योजक श्री. अनिल होबळे यांच्याविरुद्ध सुनेचा हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. होबळे, त्यांची पत्नी संध्या तसेच मुलगा मिलिंद होबळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबई येथील सुचित्रा शिरोडकर यांनी आपल्या मुलीचा २००९ सालापासून होबळे कुटुंबाकडून हुंड्यासाठी छळ चालल्याची तक्रार नोंदवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ४ तसेच भारतीय दंड संहितेचे कलम ४९८, ३२३ व ५०६ खाली गुन्हा नोंदवला गेला आहे. आपल्या मुलीला होबळे कुटुंबाने मारहाण केल्याचा आरोप सुचित्रा शिरोडकर यांनी केला आहे. दरम्यान, होबळे कुटुंबियांचे वकील अमित पालेकर यांनी आपल्या अशिलावरील आरोप फेटाळले आहेत. ही घरगुती बाब असून एक दोन दिवसांत सोडवली जाईल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचे उपाध्यक्ष अनिल होबळे यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार नोंद होणे ही गंभीर बाब असून महिला कॉंग्रेस याविरुद्ध आवाज उठविणार असल्याचे नवनियुक्त महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले.