गोवा फॉरवर्डच्या अध्यक्षपदी विजय सरदेसाई

0
141

>> मंत्री जयेश साळगावकर युवा समन्वयक

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या काल झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते प्रशांत नाईक यांनी केली. पक्षाचे आमदार व मंत्री जयेश साळगावकर यांच्याकडे युवा समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या अध्यक्ष रेणुका डिसिल्वा यांना दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आलेले असल्याने आपणाला पक्षाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती त्यांनी केली होती. ती कार्यकारिणीच्या बैठकीत मान्य करण्यात आली असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
काल झालेल्या बैठकीत भाजप नेतृत्वाखालील राज्यातील आघाडी सरकारातील एक घटक पक्ष या नात्याने गोवा फॉरवर्ड पार्टीने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला असे पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व नगर आणि नियोजन व कृषी खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोवा फॉरवर्ड पक्षाची वाढ होण्याची गरज आहे असे आपणाला वाटत असून कार्यकारिणीच्या बैठकीतही त्याबाबत एकमत झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. गोव्याच्या हितासाठी काम करू इच्छिणार्‍या व स्वतःची अशी मते असलेल्या लोकांनी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करावा. त्यांच्यासाठी पक्षाची द्वारे खुली असल्याचे सरदेसाई म्हणाले.
गेल्या १०० दिवसांचा काळ हा आमचा भाजप बरोबरचा मधुचंद्राचा काळ होता असे आम्ही समजतो. आता तो काळ संपलेला असून आता खर्‍या अर्थाने पक्ष कार्यक्षमपणे कार्य करणार असल्याचे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. ट्रॉजन डिमेलो यांनी पक्षात प्रवेश करावा असे आवाहन सरदेसाई यांनी त्यांना पत्रकार परिषदेतून केले.
मंत्री पालयेंकरांकडे जबाबदारी
ओबीसी समाजातील जास्तीत जास्त लोकांना गोवा फॉरवर्ड पक्षात आणण्याची जबाबदारी मंत्री विनोद पालयेकर यांच्यावर तर युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची जबाबदारी पक्षाचे अन्य एक मंत्री जयेश साळगावकर यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. वादग्रस्त कुळ मुंडकार प्रश्‍नावर विचारले असता प्रादेशिक आराखडा व कुळ मुंडकार प्रश्‍नात आपण पावसाळी अधिवेशनानंतर लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्रार्थना स्थळांवर जे हल्ले होत आहेत त्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा हात नसावा असे आपले वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले.
कॅसिनोंना विरोध नाही
कॅसिनोविषयी विचारले असता ते म्हणाले की, आपण कॅसिनोंना कधीही विरोध केला नव्हता. मात्र, कॅसिनो मांडवी नदीत असता कामा नयेत, असे आपले म्हणणे होते व ते आजही कायम असल्याचे ते म्हणाले. कॅसिनोंमुळे मांडवी नदीचे पाणी दूषित होऊ लागले असल्याचे ते म्हणाले. मांडवीत आणखी एक नवा कॅसिनो येऊ घातला आहे त्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे असे विचारले असता कांडा यांच्या कॅसिनोला आपण विरोधी बाकावर असताना विरोधी केला होता व तो विरोध आजही कायम असल्याचे ते म्हणाले. तो कॅसिनो मांडवीत आणू नये, असे आपले म्हणणे असल्याचे ते म्हणाले.