ही वाट दूर जाते…

0
22
  • अंजली आमोणकर

वाटेच्या या चक्रव्यूहात केवळ एकच गोष्ट महत्त्वाची आहे व ती म्हणजे आपलं शुद्ध मन! मग ती वाट बिकट असो, काट्याकुट्यांची असो, की न संपणारी असो. ‘तू चाल फुडं तुला रं गड्या भीती कशाची? पर्वा बी कुनाची?’

गडगडाट वाढून पाऊस चारी अंगांनी धो-धो कोसळू लागला. आभाळ काळेकुट्ट झालेलेच होते. सोसाट्याचा वारा सुटला व काहीच उमगेना. ओळखीच्या खुणा नजरेस पडेनात. कुठपर्यंत आलोत तेही उमजेना. ‘आपण रस्ता चुकलोय’ हे मात्र बर्‍यापैकी ध्यानात आले होते. मी तशीच हळूहळू गाडी पुढे नेत राहिले. दार उघडायची जराही सोय नव्हती… लगेच तोंडावर पाण्याचे उभे-आडवे सपकारे बसत होते. सगळीकडे चिखल व गुडघाभर पाणी. बाकी रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. तेवढ्यात पाठीवर इरले घेऊन एक छोटा पोरगा पळत जाताना दिसला. हॉर्न वाजवून-वाजवून मी त्याचे लक्ष वेधून घेतले. हातांनी खुणा करून जवळ बोलावले- ‘‘बेटा, ही वाट कुठं जाते सांगशील?’’ तो खुद्कन हसला. ‘‘वाट? वाऽऽट म्हंजे बघा, कुटंच जात नायी वो ही! वाट कुटं जातीया? ती आक्शी हितंच हाये की वो पसरल्याली. जातुया आमीच नव्हं का?’’
इरले पांघरलेले असूनही चिप्प भिजलेला तो पोरगा काळा शिसवी विठोबाच भासू लागला. त्याला बहुतेक मी चुकलेय हे लक्षात येऊन मस्करीची लहर आली असावी. त्याचं बोलणं बरोबर असूनही ती वेळ तत्त्वज्ञानाचे कौतुक करत बसण्याची नव्हती. पण रस्त्यावर कोणीच नसल्याने त्याच्या कलाकलाने घ्यायला हवे होते.
‘‘तेच रे, या वाटेनं जात राहिले तर कुठे पोचेन मी?’’
‘‘कुटं पोचेन? वाट संपते तितं…’’
मी या आडमुठ्या बाळावर मनातून खूप चिडले होते. आता रडू फुटायच्या बेतात होते. पाण्यात पाय आपटत, हसत तो पोरगा पुढे पळाला. त्याला बरेच पुढे जाऊ दिल्यावर नजरेच्या टप्प्यात ठेवत मी गाडी हळूहळू त्याच्या मागोमाग नेऊ लागले. बर्‍याच वेळानं खुणेची विहीर दिसली आणि मी निश्‍वास सोडला. आता पुढली वाट मला ठाऊक होती!

रात्री अंथरुणावर पडल्यावरही त्या खट्याळ विठोबाचे शब्दच मला आठवत राहिले. ‘वाट कुटं जातीया? ती तितंच आसतीया. जातुया आपूनच, नव्हं का?’ खरंच, या वाटा आपल्याला कुठेच नेत नसतात. त्या तर असतात तशाच- तिथेच. वळणांनी, खड्यांनी भरलेल्या. काहीवेळा सरळ, तर काहीवेळा वाकड्या. त्यांच्यावरून प्रवास करतो आपण! तरी वाट चुकली की वाटांनाच शिव्या देतो. सर्वांनी रुळलेल्या धोपटमार्गावरूनच जावे अशी घरच्यांचीदेखील इच्छा असते. कारण बिकटवाट ही वाटसरूला बहुतेक करून आडमार्गाला नेते ही समाजाची ठाम समजूत आहे. ते बर्‍याच अंशी सत्यही आहे. शाहीर अनंत फंदी तर कैक वर्षांपूर्वी माणसाला सांगून गेलेत-
‘‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस माणसा, उगाच भटकत फिरू नको!’’
अशी ही वाट खरंच बिकट असते का, की आपल्या मनाजोगी सरळसोपी नसते म्हणून आपण तिला बिकट म्हणतो? रुळलेल्या धोपटमार्गाला सोडून नवीन पायवाटेला मळवू इच्छिणारा प्रत्येक शास्त्रज्ञ, राजकारणी, कलाकार, साहित्यिक, खेळाडू, वैज्ञानिक यांची मात्र कायम ससेहोलपट झालेली आहे. त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनादेखील जीवनभर कुत्सितपणाला, अडचणींना तोंड देत-देत जीवनाचा मार्ग आखावा लागला आहे. कोणतेही नवे तत्त्वज्ञान, वैज्ञानिक शोध, वैद्यकीय संशोधन हे अचानक लागलेले नाही. नटसम्राट, थोर नेते, गगनभरारी मारणारे कलाकार जन्मतःच तसे नसतात. त्या साधनेकरिता, शोधाकरिता, अधिकारपदाकरिता, उत्तम वा आदर्श राजकारणी सिद्ध होण्याकरिता, सफल डॉक्टर होण्याकरिता अनेक वाटा चोखाळत उभे आयुष्य त्यांना वेचावे लागलेले आहे. त्याकरिता प्रत्येक वाटेवर पसरलेल्या अपमानाला, मानहानीला, मनस्तापाला, तर कित्येक वेळेला अन्नान्नदशेलाही त्यांना सामोरे जावे लागलेले आहे. जगाच्या दृष्टीने ते वाट चुकलेले वाटसरू असतात. पण त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने त्या अचूक वाटा असतात. आपल्याला भरकटवणारी, वाईट वळण लावणारी ‘वाट’ नसते. ते आपले ‘मन’च असते. आपण मात्र वाटेवर ठपका ठेवतो, तिच्यावरच्या वळणांना नावे ठेवतो. ‘वाट चुकलेला प्राणी’- असे म्हणत सर्व अपयश, सर्व चुका वाटेच्या पदरात घालून मोकळे होतो. आपली आवडती व्यक्ती जर त्या वाटेवर आपली सहप्रवासी असेल तर ती वाट कधी संपते व मुक्काम कधी येतो हेदेखील कळत नाही. पण तेच जर नावडते व अनोळखी सहप्रवासी असतील तर वाट संपता संपत नाही.

आयुष्यातील अशीच आणखीन एक वाट संपत नाही, ती म्हणजे- ‘वाट पाहण्याची वाट!’ प्रत्येक उशिरा येणार्‍या व कधीकधी न येणार्‍या आवडत्या माणसाची, वस्तूंची, संधींची, यशाची, स्वप्नांची, वाट पाहाण्याची वाटदेखील जन्मभर संपत नाही. नशिबाशी आट्यापाट्या खेळत, सुख-दुःखाला डाव्या-उजव्या कुशीला घेत घेत संकटांच्या काट्याकुट्यांतून ती आपला मार्ग आक्रमित राहते. म्हणूनच ‘नको’ असलेल्या सर्व गोष्टींबाबत आपण ‘वाटेला लाव’चे फर्मान काढतो. वाटेच्या या चक्रव्यूहात केवळ एकच गोष्ट महत्त्वाची आहे व ती म्हणजे आपलं शुद्ध मन! मग ती वाट बिकट असो, काट्याकुट्यांची असो, की न संपणारी असो. ‘तू चाल फुडं तुला रं गड्या भीती कशाची? पर्वा बी कुनाची?’
केवळ शुद्ध हेतू ठेवणारे शुद्ध मनच आपल्याला या बनचुक्या वाटांवरून अलगद सुखरूप पार करून देते!