विदेशी जहाजांवर अडकून पडलेल्या खलाशांना राज्यात परत आणण्यास राज्य सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ मुख्ममंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी उपोषणाला बसलेल्या ११ खलाशांच्या पत्नींना पणजी पोलिसांनी अटक केल्याची घटना ही दुर्दैवी असल्याचे विरोधी पक्षतेने दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
या संबंधी बोलताना श्री. कामत म्हणाले की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच एक पत्र लिहिलेले असून त्यात त्यांना विविध देशांतील १९९ जहाजांवर भारतातील २१ हजार खलाशी लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले आहेत. त्यांना विनाविलंब देशात आणण्याची व्यवस्था केली जावी असे म्हटलेले आहे. आपल्या माणसांना विनाविलंब देशात आणले जावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या महिलांना अटक करणे हे दुर्दैवी असल्याचे कामत यांनी पुढे म्हटले आहे.