निदर्शने करणार्‍या महिलांना पणजीत अटक व सुटका

0
135

विविध देशात बोटीवर असलेल्या खलाशांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्‍वासन देऊनसुद्धा मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे, निदर्शने करणार्‍या अकरा महिलांना पोलिसांनी अटक करून त्यांची जामिनावर सुटका काल केली.

राज्यात गेल्या काही दिवसापासून विदेशात बोटीवर असलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्याचा प्रश्‍न चर्चेला विषय बनलेला आहे. राज्य सरकारकडून खलाशांच्या विषयाचा केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे.  विदेशातील खलाशांना आणण्याचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आहे. या विषयावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.

बुधवारी सकाळपासून विदेशात बोटीवर असलेल्या काही खलाशांच्या कुटुंबातील महिलांनी मुख्यमंत्री निवासस्थानासमोर खलाशांना परत आणण्याच्या प्रश्‍नावर निदर्शने करण्यास सुरूवात केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रथम दूरध्वनीच्या माध्यमातून निदर्शने करणार्‍या महिलांशी संपर्क साधून सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यानंतर निदर्शने करणार्‍या दोन महिलांशी या विषयावर थेट चर्चा करून त्यांचे म्हणणे एैकून घेतले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बाजू एैकून घेतल्याने महिलांनी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर निदर्शने करू नये, अशी सूचना पोलिसानी केली. तथापि, त्या महिलांनी निदर्शने चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्यात १४४ कलम लागू आहे त्यामुळे महिलांनी निदर्शने करण्यासाठी सरकारने निश्‍चित केलेल्या जागेत जाऊन निदर्शने करावी अशी सूचना करून पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला. निदर्शने करणार्‍या महिलांनी पोलिसांच्या सूचनेचे पालन केले नसल्याने अखेर सर्व अकराही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पणजी पोलीस स्थानकावर नेऊन प्रतिबंधात्मक अटक करून नंतर जामिनावर सुटका केली. विदेशात असलेल्या खलाशांना परत आणण्याबाबत स्पष्ट उत्तर देण्याची मागणी त्या महिलांकडून करण्यात आली आहे.