- डॉ. मनाली म. पवार
(सांत इनेज, पणजी)
हिवाळ्यात लोक थंडी वाजू नये म्हणून खिडक्या-दरवाजे बंद करूनच घरात बसलेले असतात. त्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो. त्यात शरीराचे स्वतःचे एक घड्याळ असते त्यामध्ये घोटाळा होतो, गडबड होते व उदास वाटू लागते.
हल्लीच्या काळात सुशिक्षित, सुसंस्कृत, नावाजलेल्या व्यक्तींच्या आत्महत्यांच्या घटनांनी मन विचलित होते. काही अंशी ह्या काळात आत्महत्येचे विचार मनात डोकावत आहेत असे सांगणारे रुग्णदेखील दवाखान्यात येत आहेत. आळशीपणा, झोप न येणे, नैराश्य यांसारखी लक्षणे घेऊन येणार्या रुग्णांचीही संख्या वाढते आहे. पण या सर्वांना कोरोना व्हायरस हे कारण नाही, बरं का! हे तर ऋतूबदल किंवा वातावरण बदलाचे परिणाम आहे.
ऋतुमान किंवा वातावरण बदलाचे परिणाम शरीरात चटकन दिसून येतात कारण ते दृश्य स्वरूपातील असतात पण बदलत्या हवामानाचा परिणाम हा मनःस्वास्थ्यावरही होतो. असे वातावरणातील बदल हे आपल्या मनाच्या आरोग्यावर परिणाम करतात, ते चटकन दिसून येत नाहीत. अनेकदा हिवाळ्यात व्यक्तीचे मानसिक संतुलन डळमळीत असते. त्यांना नैराश्य येते. मनाचे संतुलन घटल्याने अनेकांना त्यांच्यासोबत नेमके काय होते आहे, त्यांना कसला त्रास होतो आहे, हेच कळेनासे होते. नैराश्य किंवा उदासीनता इतक्या उच्च पातळीला जाऊन पोचते की काही व्यक्ती आत्महत्येच्या निर्णयाप्रत येऊन पोचतात. आपण एकंदर आत्महत्यांची आकडेवारी पाहिल्यास हिवाळ्याच्या दिवसात आत्महत्यांचे प्रमाण अधिक असते. हिवाळ्यातील या समस्येचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.
वातावरणातील बदलांमुळे येणार्या नैराश्याला ‘सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर’ म्हटले जाते. त्यात या दिवसात म्हणजे हिवाळ्यात दिवस छोटा व रात्र मोठी असते. त्यामुळे झोपण्या-उठण्याचे चक्र बिघडून जाते. त्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने आपल्या मेंदूत मेलॅटोनिन संप्रेरके अधिक प्रमाणात तयार होते. त्याचा संबंध झोपेशी असल्याने ते सतत आपल्याला झोप आल्याची जाणीव करून देते. कारण झोपेशी निगडित या हॉर्मोनचा संबंध सूर्यप्रकाश आणि अंधार यांच्याशी असतो.
हिवाळ्यात सूर्य लवकर मावळत असल्याने मेंदूमध्ये मेलॅटोनिन तयार होते. त्यामुळेच संध्याकाळ होताच आपल्याला झोप यायला लागते. आपण लवकर झोपण्याचा प्रयत्नही करत असतो. हिवाळ्यात शरीराची सक्रियता कमी होते. आपल्याला लवकर दमायलाही होतं. आळशीपणे व थकवा ही ‘विंटर डिप्रेशन’ या आजाराची लक्षणे असू शकतात.
मुख्य कारणे –
- नैसर्गिक प्रकाशाची कमतरता ः
हिवाळ्यात लोक थंडी वाजू नये म्हणून खिडक्या-दरवाजे बंद करूनच घरात बसलेले असतात. त्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो. त्यात शरीराचे स्वतःचे एक घड्याळ असते त्यामध्ये घोटाळा होतो, गडबड होते व उदास वाटू लागते. तसेच मेंदूत आढळणार्या सेरॅटोनिनची पातळीही खालावते. मेंदूतील हे रसायन आपला कल किंवा मूड ठरवत असते आणि निराशा किंवा उदासी या भावनांना उद्दीपीत करत असते.
वातावरणातील बदलांमुळे शरीरातील मेलॅटोनिनच्या पातळीत बदल घडवून आणते. त्यामुळे आपल्या झोपेचे वेळापत्रक आणि मूड किंवा स्वभाव, कल याविषयी महत्त्वाची भूमिका बजावते.
पुरुषांच्या तुलनेत दुःखी महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आहे पण पुरुषांमध्येही याची गंभीर लक्षणे पहायला मिळतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांपेक्षा तरुणाईमध्ये हे सिझनल नैराश्य दिसून येते.
आनुवंशिकतासुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यांच्या रक्ताच्या नात्यातील कोणी व्यक्ती दुःखी किंवा निराश झालेली असेल तर त्या व्यक्तीला नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते.
नैराश्याची प्रमुख लक्षणे – - सुस्ती किंवा उत्तेजित होणे
- थकवा किंवा शक्तिपात होणे
- नकार भावना उत्पन्न होणे
- झोप येण्यात अडचण
- भुकेचे स्वरूप बदलणे, कर्बोदकांचे प्रमाण अधिक असलेला आहार घेणे
- हताश वाटणे
- इतर गोष्टी किंवा आपल्या कामातील रुची कमी होणे
- लक्ष केंद्रित न होणे
- सतत आत्महत्येचे विचार डोकावणे
या लक्षणांकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे. काही वेळा नैराश्याची पातळी कमी असेल किंवा सर्वसाधारणपणे येणारे नैराश्य असते. पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण काही वेळा ही लक्षणे गंभीर होतात.
बचाव कसा कराल? – - नैराश्य दूर करण्यास सूर्यनारायणाला साकडे घातले म्हणजेच नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळविण्याचा प्रयत्न करावा. सकाळी दहा वाजण्यापूर्वीच्या सूर्यप्रकाशाचा अधिक फायदा होतो. आपल्याला जो सूर्यप्रकाश दिसतो त्याहीपेक्षा वेगळ्या स्वरूपाची वेगवेगळी प्रक्षेपणे यावेळी सूर्यप्रकाशातून होत असतात. सूर्योदयाच्या वेळी आसमंतात असलेला प्रकाश तो खूप प्राणानुकूल असतो. सकाळच्या वेळचा सूर्यप्रकाशही आल्हाददायक असतो. जसजसा सूर्य आकाशात वर येईल तसतशी सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते आणि त्यातील उपयोगी किरणे कमी होतात. ११- १२ वाजता सूर्यप्रकाश तीव्र झाला की मग त्याचा प्रकाश सरळ अंगावर घेणे उपयोगाचे नसते. मात्र त्याआधीच्या सूर्यप्रकाशाची किरणे आपल्याला आवश्यक असतात. सैलसर कपडे घालून सूर्यप्रकाशात बसावे किंवा शक्य तेवढा शरीराचा भाग उघडा ठेवून सूर्यप्रकाश घ्यावा, त्याचा अधिक फायदा होतो.
- नियमित व्यायाम व ध्यानधारणा करावी. त्यातही सूर्यनमस्कारासारखा व्यायाम हा सर्वोत्तम आहे.
- संतुलित व पौष्टिक आहाराचे सेवन करावे.
- पुरेसा आराम करावा व ६ ते ८ तास झोप घ्यावी.
- ताणतणाव लांब ठेवावा.
- मित्र, नातेवाईक यांच्या संपर्कात राहून त्यांच्याशी मनातील गोष्टी मोकळेपणाने बोलाव्यात.
- सर्जनशील आणि मनोरंजनात्मक गोष्टी कराव्यात.
- काही वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी काढावा जेणेकरून स्वतःला प्रसन्न वाटेल.
हिवाळ्यात अनेकांना नैराश्य येत असल्याने आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल करावा.