चेन्नईनला लोळवण्याचा मुंबई एफसीचा प्रयत्न

0
234

सातव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर मुंबई सिटी एफसीची चेन्नईन एफसीविरुद्ध लढत होत आहे. सलग तीन विजय मिळविलेल्या मुंबईचे मनोधैर्य उंचावले असून चेन्नईनला लोळविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. मुंबईला सलामीस नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने सलग तीन सामने जिंकून शैलीदार पुनरागमन केले. मंगळवारी एटीके मोहन बागानला जमशेदपूर एफसीविरुद्ध पराभूत व्हावे लागले. या निकालामुळे तसेच सरस गोलफरकामुळे मुंबईचे अग्रस्थान कायम राहिले.

मुंबईचा संघ सखोल आहे. लॉबेरा खेळाडूंना आळीपाळीने खेळवत आहेत. या धोरणाचे त्यांना फायदे होत आहेत. अहमद जाहू, ह्युगो बुमूस, रॉलीन बोर्जेस आणि ऍडम ली फॉंड्रे यांनी आतापर्यंत चमक दाखवली आहे. त्याचवेळी गोलरक्षक अमरिंदर सिंग याच्या नेतृत्वाखालील बचाव फळीनेही आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. मुंबई सिटीने आतापर्यंत एकच गोल पत्करला आहे आणि तीन क्लीन शीटची नोंद केली आहे. आघाडीवरील संघ म्हणून या सामन्याला सामोरे जात असल्यामुळे लॉबेरा यांचा आत्मविश्वास उंचावला आहे, पण स्पेनचे हे प्रशिक्षक गुणतक्त्यातील स्थानाला फारसे महत्त्व देण्यास तयार नाहीत. त्यांनी सांगितले की, आमचे लक्ष सामन्यावर केंद्रीत असले पाहिजे. गुणतक्त्याचे निरीक्षण करणे ही आमच्यासाठी फार मोठी चूक ठरेल. आम्हाला जिंकायचे आहे. आम्ही अग्रस्थानावर आहोत आणि याबाबत आम्हाला आनंद आहे, पण पुढील सामना जिंकणे कसे शक्य होईल ही आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. गुणतक्त्‌यातील स्थान कोणते असावे हे उद्दीष्ट असू शकत नाही. आम्हाला एका वेळी एक सामना खेळावा लागेल. मोसम संपेल तेव्हा सर्वोत्तम स्थान मिळालेले असेल अशा दृष्टिने वाटचाल करावी लागेल.
दुसरीकडे चेन्नईनची स्थिती गुंतागुंतीची झाली आहे. दोन वेळच्या माजी विजेत्यांनी जमशेदपूर एफसीला २-१ असे हरवून मोहिमेला सुरुवात चांगली केली. त्यानंतर मात्र दोन सामन्यांत त्यांना विजय मिळालेला नाही व गोलही करता आलेला नाही.

क्साबा लॅसझ्लो यांचा संघ गोलक्षेत्रातील अंतिम टप्प्यात धडाडीने खेळतो आहे आणि संधीही निर्माण करतो आहे, पण गोलमध्ये रुपांतर करण्यातील खराब टक्केवारी त्यांना भोवते आहे. मुंबईविरुद्ध त्यांना गोल करण्याची क्षमता दाखवावी लागेल. मुंबईविरुद्ध यंदा आतापर्यंत खुल्या खेळातून गोल झालेला नाही. अनिरुध थापा दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्यामुळे रॅफेल क्रिव्हेलारो याला संघासाठी कल्पक खेळ करण्याकरता पुढाकार घ्यावा लागेल. लॅसझ्लो यांनी सांगितले की, मुंबई सिटीचा बचाव भेदण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्याकडे गोल करण्याची क्षमता आहे. आम्हाला प्रतिस्पर्ध्याचे बलस्थान माहित आहे. आपला संघ भक्कम असल्याचे मुंबईने दाखवून दिले आहे, पण आमचाही संघ कमकुवत नाही. आम्ही आमच्या शैलीनुसार खेळू शकतो आणि गोल करू शकतो हे दाखवून दिले आहे.