हिमाचल प्रदेशमध्ये बसवर दरड कोसळून दहा मृत्यू

0
38

हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये बसवर दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत अनेक गाड्या ढिगार्‍याखाली दबल्या गेल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत दहाजणांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती आहे. ही दुर्घटना हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात काल दुपारी घडली. या घटनेत एक ट्रक, एक सरकारी बस आणि इतर वाहने दबली असावीत अशी भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी भारत-तिबेट सीमा पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

चौरा आणि किन्नूर जिल्ह्यांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये एक डोंगर कडाच तुटून बसवर पडल्याने संपूर्ण बस या ढिगार्‍याखाली सापडली. ही बस किन्नूरमधून हरिद्वारकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग पाचवर ही दुर्घटना घडली असून हा महामार्गच बंद करण्यात आला आहे.

ही बस हिमाचल राज्य परिवहनची होती. या दुर्घटनेच्यावेळी एक बस, एक ट्रक, बोलेरो आणि ३ टॅक्सी ढिगार्‍याखाली सापडल्या आहेत.

हिमाचल सरकारने बचावकार्यासाठी उत्तराखंड आणि हरयाणा सरकारकडून हेलिकॉप्टर मागितले असून भारतीय लष्कराकडूनही दोन हेलिकॉप्टर पाठवण्यात आली आहेत. या दुर्घटनेतून बसचा चालक व वाहक हे दोघे वाचले आहेत. त्या दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. रस्त्यावर पडलेल्या दगड पाहून ते बसमधून खाली उतरले होते. यावेळी भूस्खलन झाले आणि बस ढिगार्‍याखाली दाबली गेली. दोघांनी पळून आपला जीव वाचवला. बसमध्ये २५ प्रवासी होते, अशी माहिती वाहकाने दिली.
दरम्यान, या दुर्घटनेची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही, असे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या घटनेबाबत मुख्यमंत्री ठाकूर यांच्याशी संवाद साधला असून मदत आणि बचावकार्यात सर्व मदत केली जाईल, असे सांगितल्याचे ट्विट करून माहिती दिली आहे.

गेल्या महिन्यात दि. २५ जुलै रोजी ही हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यावेळी सांगला-छितकूल मार्गावर झालेल्या दुर्घटनेत ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेत तीनजण जखमी झाले होते. हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत.