
>> ढगफूटीनंतर महामार्गावरील दुर्घटनेत दोन बसेस गाडल्या
मंडी-पठाणकोट महामार्ग परिसरात शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन झाल्याने त्यात हिमाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या दोन बसगाड्या सापडल्याने सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याची भीती राज्य प्रशासनाने व्यक्त केली आहे, या दुर्घटनेतील ८ जणांचे मृतदेह सापडले असून बसेसमधील अन्य प्रवाशांचा पत्ता लागलेला नाही असे सांगण्यात आले. मृतांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
हिमाचल प्रदेशचे वाहतूकमंत्री जी. एस. बाली यांनी या दुर्घटनेतील मृतांची संख्या ५० वर जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दुर्घटनाग्रस्त बसेसपैकी एक बस मनाली येथून कट्रा येथे व दुसरी बस मनालीहून चंबा येथे जात होती. शनिवारी रात्री या दोन्ही बसेस कोटरूपी येथे चहासाठी थांबवण्यात आल्या होत्या. याचवेळी ही दुर्घटना घडली अशी माहिती राज्याचे आपत्कालीन विभागाचे सचिव डी. डी. शर्मा यांनी दिली. दोन्ही बसेसमध्ये प्रत्येकी ३० ते ४० प्रवासी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत म्हणून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा हिमाचल प्रदेश सरकारने केली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने आपत्कालीन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पाठविण्यात आली. लष्कराचे जवान तसेच राष्ट्रीय आपत्कालीन यंत्रणांचीही मदत या कामी घेण्यात आली आहे. मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक सोमेश गोयल यांनी माहिती दिली की मनाली कट्रा या बसमध्ये आठ प्रवासी होते. तर दुसर्या बसमध्ये ४७ प्रवासी होते.