>> व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून कारवाई
>> राज्यसभा निवडणुकीत व्हीप डावलत भाजपला केले होते मतदान
हिमाचल प्रदेशातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 6 बंडखोर आमदारांवर काल मोठी कारवाई केली. हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी राज्यसभा निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करून भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या 6 आमदारांना अपात्र घोषित केले. व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतरविरोधी कायद्यान्यवये ही कारवाई केली. दरम्यान, या निर्णयाविरोधात अपात्र आमदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मंत्री हर्षवर्धन यांनी पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत सहा आमदारांविरुद्ध तक्रार केली होती. हर्षवर्धन आणि सर्व सहा आमदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आम्ही या सहा आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पठानिया म्हणाले.
या आमदारांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवली; परंतु आता त्यांनी त्याच काँग्रेसच्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मत दिले नाही. मी दोन्ही बाजूचे दावे-प्रतिदावे ऐकून घेतले आणि तीस पानांचे निवेदन जारी केले आहे. या अंतर्गत आमदार सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंदर भुट्टो, इंदर दत्त लखनपाल या सहा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे, असे पठानिया यांनी स्पष्ट केले.
हिमाचल प्रदशमधील राज्यसभेच्या एका जागेवर 27 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. यावेळी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपाच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट होता; परंतु काँग्रेसच्या 6 आमदारांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाल्याने काँग्रेसचा पराभव झाला होता.
सरकार सुस्थितीत; ऑपरेशन लोटस अयशस्वी : शिवकुमार
हिमाचल प्रदेशातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसने काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा आणि हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू उपस्थित होते. पक्ष आणि आमदारांमधील सर्व मतभेद मिटले आहेत. सरकार सुस्थितीत असून, सुखू हेच मुख्यमंत्री राहतील. ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे. लोकसभा निवडणूक आता आमच्यासाठी प्राधान्याची आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.
अपात्रतेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान
काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांनी सभापतींच्या अपात्रतेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. व्हीपचे उल्लंघन केल्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्या निर्णयाला बंडखोर आमदारांनी आव्हान दिले आहे.