हिंमतबाज नेता

0
63

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळचे भाजपचे हिंदुत्वाचे पोस्टर बॉय कल्याणसिंग यांचे निधन ही देशाच्या इतिहासातील एका धगधगत्या पर्वाची समाप्ती आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीचे आंदोलन शिगेला पोहोचले होते तेव्हा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून त्या आंदोलनाला कल्याणसिंग यांनी सर्वतोपरी सहकार्य तर केलेच, परंतु सहा डिसेंबर १९९२ रोजी करसेवकांनी केलेल्या बाबरी ढॉंचाच्या विद्ध्वंसाची जबाबदारी लालकृष्ण अडवाणींसह भाजपच्या भल्या भल्या नेत्यांनी नाकारली असताना कल्याणसिंग हे पक्षातील एकमेव असे नेते होते ज्यांनी हा विद्ध्वंस करसेवकांच्या संतापाच्या उद्रेकाची परिणती असल्याचे सांगून त्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. बाबरी विद्ध्वंसाशी भाजपचा काही संबंधच नाही असे जेव्हा अडवाणींसह सर्व पक्षधुरीण म्हणू लागले, तेव्हा कल्याणसिंग यांच्या व्यतिरिक्त केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच होते ज्यांनी ते करसेवक भाजपचे नसतील तर शिवसैनिक असतील आणि त्यांचा आपल्याला सार्थ अभिमान वाटत असल्याचे धाडसी उद्गार काढले होते. कठीण परिस्थितीमध्ये अशी खंबीर भूमिका घेण्यास हिंमत लागते आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असताना तर अशा प्रकारची भूमिका घेणे म्हणजे त्याची किती जबरदस्त किंमत आपल्याला चुकवावी लागेल ह्याची कल्याणसिंग यांना पुरेपूर कल्पना होती. अयोध्येत रणकंदन झाले तेव्हा रक्तपात टाळण्यासाठी पोलिसांना करसेवकांवर गोळीबार न करण्याचे ठाम निर्देश कल्याणसिंग यांनी दिलेले होते आणि त्यांनी ते कधीही नाकारले नाही. सर्वोच्च न्यायालयात दिलेली हमी पाळली नाही म्हणून एका दिवसाच्या लाक्षणिक तुरुंगवासालाही ते सामोरे गेेले आणि तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी भाजपाची सरकारे बरखास्त केली, तेव्हा आपले पहिलेवहिले मुख्यमंत्रिपद गेले म्हणूनही कल्याणसिंग कधी हळहळले नाहीत, एवढे ते अयोध्या आंदोलनाशी एकरूप झाले होते.
भारतीय जनता पक्षाने अयोध्या आंदोलनानंतरच राष्ट्रीय पातळीवर खर्‍या अर्थाने मुळे धरायला सुरुवात केली. तत्पूर्वी विश्वनाथ प्रतापसिंह पंतप्रधानपदी असताना त्यांनी मंडल आयोगाची वावटळ उडवून देशाला जातीपातींच्या आरक्षणाच्या गलीच्छ राजकारणात ढकलले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्वाचा विचार राजकीय क्षितिजावर पुढे आणण्यात कल्याणसिंग यांच्यासारख्यांचे मोठे योगदान होते. देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातूनच जात असतो. कल्याणसिंग यांनी उत्तर प्रदेशात हिंदुत्वाच्या विचारांचे बीजारोपण करण्यासाठी सुपिक जमीन तयार केली, त्यातूनच पुढील काळात भाजपच्या यशाचा विजयरथ दौडला. यादवांचे प्राबल्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये यादवेतर इतर मागासवर्गीय छोट्या छोट्या जनजातींना एकत्र करून हिंदुत्वाच्या मुद्‌द्यावर जवळ करून जातीपातीच्या राजकारणाला कल्याणसिंग यांनी काटशह दिला होता. त्याचाच फायदा घेत भारतीय जनता पक्षासारखा उजव्या विचारांचा पक्ष उत्तर प्रदेशमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवू शकला.
आपल्या विचारांप्रती ठामपणा हा कल्याणसिंग यांचा विशेष होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असताना त्यांच्याशी कडव्या कल्याणसिंगांचे बिनसले आणि त्यातून त्यांची मुख्यमंत्रिपदाची दुसरी कारकीर्दही अकाली संपली. पुढे त्यांनी भाजप सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. पुन्हा काही काळाने भाजपात आले. पुन्हा पक्षाशी बिनसल्याने बाहेर पडले, पुन्हा पक्षात आले आणि राज्यपालपदाने त्यांच्या योगदानाची कदर पक्षाने केली. परंतु ह्या आत बाहेर येण्याजाण्यातून कल्याणसिंग यांच्याभोवती जे वलय होते ते मात्र संपले. मुलायमसिंग यादव यांनी सोशलिस्ट पार्टीतून आणि कल्याणसिंग यांनी जनसंघातून ६७ साली राजकीय जीवनात पाऊल ठेवले होते. पुढे जनता पक्षाच्या सरकारमध्ये दोघे एकमेकांचे सहकारी काय झाले, अयोध्या आंदोलनात परस्परांचे प्रतिस्पर्धी बनले, भाजपने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर मुलायम यांच्याशी हातमिळवणी काय केली, पुन्हा दूर झाले, हा सगळा नाट्यमय प्रवास एखाद्या राजकीय चित्रपटातल्यासारखाच आहे. परंतु एवढे सगळे होऊनही आज त्यांच्या मृत्युसमयी कल्याणसिंग यांची प्रतिमा उजळच राहिलेली आहे. एक ठाम विचारांचा विश्वासू नेता हीच कल्याणसिंग यांची सदैव ओळख राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘कल्याणसिंग यांनी आयुष्यभर जनकल्याणाचा विचार केला’ असे जे उद्गार काढले, ते नक्कीच सार्थ आहेत.