सोनेरी झुंबरांचं संध्यासूक्त

0
54
  • अंजली आमोणकर

ती उजळलेली पुरुषभर उंचीची दिवजं, त्या भकाभका पेटून आगीचे उंच लोळ आकाशात पाठवणार्‍या धुपारत्या म्हणजे चक्क सोन्याची झुंबरं भासत होती. गंगेचा काही मैलांचा किनारा अशा झुंबरांनी लखलखत होता.

हरिद्वारला सकाळी साधारण दहाला पोहोचलो अन् माझं ‘व्यॅक्-व्यॅक्’ सुरू झालं. मला गाडी लागते, बस लागते म्हणून मुद्दाम वडिलांनी सर्वांना रेल्वेनं आणलं होतं. मे महिन्याचा उन्हाचा तडाखा. या सुट्टीत मुंबई-पुणे-नाशिकची नेहमीची वारी टाळून वडिलांनी हरिद्वार- ऋषिकेश- मसुरी- देहरादून- नैनीताल अशी ट्रिप आखली होती. त्यामुळे माझ्या ओकार्‍यांनी सर्वजण चकित झाले. तेव्हा मी होते जेमतेम साताठ वर्षांची. पण आईला बरोब्बर कळलं. मला ‘घाण’-‘उकीरडा’ असल्या गोष्टी सोसायच्या नाहीत. सर्व कसं स्वच्छ, निर्मळ हवं. अन् हरिद्वार तर प्रचंड गचाळ. जागा मिळेल तिथे वेडं-वाकडं वाढलेलं. एवढ्याशा त्या गावात दोनशे-अडीचशे देवळे! त्यामुळे रस्त्यावर जागोजागी कुजलेल्या निर्माल्याचे ‘हे’ ढिगारे होते. तीर्थक्षेत्रं असल्यानं प्रचंड गर्दी. सरकारने सोयी-सुविधा न पुरवल्याने जिथे-तिथे उकीरडे माजलेले. त्यांवर असंख्य भटकी कुत्री, मांजरं, गायी, गाढवं, डुकरं, माकडं यांचा सुकाळ.

आम्ही आपली हात धरून, तोंडं उघडी टाकून, चरचरीत तापलेल्या उन्हातून राहायला जागा शोधतोय. धक्के खात, शेणात पाय बरबटून घेत, भटक्या प्राण्यांना चुकवत, जागोजागी प्रातर्विधी करायला बसलेल्या मुलांकडे कानाडोळा करत, अचानक अंगावर येणार्‍या माकडांशी आट्यापाट्या खेळत, सामानाचे बोजे संभाळत आई-नाना आम्हा चौघींना पुढे-पुढे नेत होते. मी विटून विटून हैराण झालेली असतानाच एका घरातून खरकटं पाणी फेकलं गेलं आणि ते नेमकं माझ्या फ्रॉकला मिठी मारून बसलं. अंगावर ते उष्टं-खरकटं पाहिल्यावर माझ्या ‘व्यॅक्- व्यॅक्’ला जी गती मिळाली की काही विचारू नका!

आता सर्वांना कडाडून भूक लागली होती. गर्दीत अंगावर गुलाबी रंग माखलेली नारदाच्या वेशातली मंडळी फिरत होती. त्यांच्या लांब मोठ्या शेंड्या गम लावून कडक उभ्या केल्या होत्या. त्यांचं नाव ‘चोटीवाला’ होतं. ‘चोटीवाला’ नावाच्या एका मोठ्या हॉटेलचे ते प्रतिनिधी होते व हॉटेलकरिता पर्यटक मिळवत होते. त्यांच्यापैकी एका चोटीवाल्याने आम्हाला हॉटेल मिळवून दिलं. पण तिथल्या कोणत्याच हॉटेलात तेव्हा जेवायची सोय नव्हती. फक्त राहायची होती. म्हणजे जेवण-चहा-नाश्ता करायला परत-परत या गावात यायचं. कारण आमचं हॉटेल जरासं दूर चढावर होतं. आता माझी पिपाणी पण सुरू झाली- ‘परत जाऊया…!’ घामानं थबथबलेले आई-नाना प्रचंड कावले. तेवढ्यात काही पर्यटकांनी पूर्वजांच्या नावांनं तेवणार्‍या पत्रावळी रस्त्यावर मांडल्या. अगणित कावळे आम्हाला धाड्‌धाड् आपटत झुंडीनी त्यावर तुटून पडले. भीतीनं आमच्याबरोबरची लोकंही किंचाळत होती.

आम्ही एकदाचे हॉटेलवर पोचलो. आता परत जेवायला खाली उतरायला कोणीच तयार नव्हते. शेवटी एका चोटीवाल्याकडून ‘छोले-पुरी’ आणवून घेतली व सर्वजण जेवून आडवे झालो. संध्याकाळी माझं ‘जाऊया परत’ सुरू झालं. ‘उद्याच इथून ऋषिकेशला जाऊया, आजचा दिवस रहा, कारण जायला बस नाही’ असं सांगून आईनं मला शांत केलं. आता गर्दी बरीचशी निवळली होती. कारण बाहेरून पर्यटकांना घेऊन येणार्‍या बसेस बंद झाल्या होत्या. सगळ्यांनी परत एकदा पोटं भरली आणि आम्ही गंगेची संध्यारती बघायला गंगेवर गेलो. झपाट्यानं काळोख पडत होता. गंगेवर गार वारं वाहू लागलं. जिवाची होणारी काहिली जरा थंड झाली. काळ्या दगडी पायर्‍यांनी बांधलेला गंगेचा लांबलचक घाट लोकांनी फुलून गेला होता. अन् अचानक एक चमत्कार झाला… गंगेच्या तीरावर एका ओळीत असंख्य भटजी पाण्याकडे तोंड करून, हातात अर्धा पुरुषभर उंचीची समयांची झाडं (दिवजा) पेटवून उभे राहिले. त्यांपैकी एकानं शंख फुंकल्याबरोबर अख्ख्या हरिद्वारमधील सर्वच्या सर्व देवळांमधून अविरत घंटानाद व शंखध्वनी होऊ लागला. वातावरण गूढ मधुर ध्वनींनी भरून गेलं. लाऊडस्पीकरवर कोणीतरी गोड आवाजात गंगेची आरती म्हणत होता. टाळ व घंटा तालात वाजत होत्या. त्या पेटलेल्या शेकडो दिवजांची प्रतिबिंबे खालच्या काळ्याशार गंगेत पडली होती. गंगेच्या पायर्‍या कासवांनी गच्च भरल्या होत्या. लोक द्रोणात पेटलेल्या पणत्या त्यांच्या पाठीवर ठेवून त्यांना खायला घालत होते. कासवं थोडं अंतर पोहत जायची व पाण्यात डुबकी मारायची. त्याबरोबर पणती असलेला द्रोण डुलत-डुलत पुढच्या प्रवासाला निघायचा. बघता बघता नजरेत मावेल तितकं पूर्ण पात्रच पणत्यांनी झगमगीत होऊन गेलं. आरती संपल्याबरोबर दिवजं खाली ठेवली गेली व अशाच अवाढव्य धूपारत्या पेटवल्या गेल्या. ती उजळलेली पुरुषभर उंचीची दिवजं, त्या भकाभका पेटून आगीचे उंच लोळ आकाशात पाठवणार्‍या धुपारत्या म्हणजे चक्क सोन्याची झुंबरं भासत होती. गंगेचा काही मैलांचा किनारा अशा झुंबरांनी लखलखत होता. वर अमावस्येचं लाखो चांदण्या चमकावणारं आकाश, खाली सोन्याची झुंबरं, पात्रभर तेवणार्‍या पणत्या, शिवाय या सर्वांची चमचमती प्रतिबंब. सर्व देहाला हजारो डोळे फुटल्यासारखं वाटलं तेव्हा. स्तिमित होऊन मी हे दृष्य बघत होते. आता लाऊडस्पीकरवर खड्या आवाजात संध्यासूक्त म्हटलं जाऊ लागलं. शहरभर घंटानाद व शंखध्वनी चालूच होता. जवळ-जवळ अर्धातास चाललेली गंगेची ही संध्या-आरती दिवसभरातली सगळी चिडचिड, रडरड, मरगळ, वीट धुवून नेत होती. अनेक वर्षांनंतर जेव्हा ‘हिप्नोटाईज्ड’ हा शब्द ओळखीचा झाला तेव्हा मेंदूत गच्चमपणे बसलेली ही आरती डोळ्यांसमोरून झरझर सरकून गेली.
दुसर्‍या दिवशी पहाटेच्या गंगेच्या काकड आरतीला व उषासूक्ताला आम्ही उड्या मारत हजर राहिलो. गंगेच्या बर्फासारख्या सर्द पाण्यात बुड्या मारूनही गर्दी झाली नाही. अंगाला बसणारे कासवांचे फटकारे त्रासाचे वाटले नाहीत. हरिद्वारचं दिवसाचं रूप कुठल्या कुठे हरवून गेलं. डोळ्यांत भरून राहिलाय सोनेरी झुंबरांबरोबर पठण केलेला उषा व संध्यासूक्तांचा सोहळा!!