हाफिजला सोडण्याचे आदेश

0
98

>> २६/११ हल्ल्याचा सूत्रधार

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तथा जमात-उद-दावा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद पुन्हा एकदा मोकाट सुटणार आहे. पाकमधील पंजाब प्रांताच्या न्यायिक समीक्षा बोर्डाने सईदला नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सईद व त्याच्या चार साथीदारांना ३१ जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जनसुरक्षा कायद्यान्वये दोनवेळा या सर्वांची नजरकैद वाढवण्यात आली होती. गेल्या महिन्यात सईदच्या नजरकैदेत ३० दिवसांची वाढ करण्यात आली होती. सदर मुदत या आठवड्यात संपत असल्याने सईदची नजरकैद तीन महिन्यांसाठी वाढवण्यात यावी अशी मागणी पाकच्या पंजाब सरकारकडून न्यायिक समीक्षा बोर्डापुढे करण्यात आली होती. मात्र, बोर्डाने ही मागणी फेटाळली.

सईद दुसर्‍या कोणत्याही प्रकरणात ‘वॉन्टेट’ नसल्यास सरकारने त्याची सुटका करावी असे बोर्डाने आदेशात म्हटले आहे. या आदेशानंतर सईदची आज सुटका होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या कायद्यानुसार सरकार कोणत्याही आरोपीला ९० दिवस ताब्यात ठेवू शकते. त्याच्या अटकेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय फक्त न्यायिक समीक्षा बोर्डच करू शकतो.

हाफिज सईद याचा भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात आहे. हाफिजवर अमेरिकेने १ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. इंटरपोलनेही त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिसही जारी केली आहे. पाक सरकारनेही हाफिजचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे.