>> ईडीचा अहवाल, विरोधकांची योगी सरकारवर टीका
हाथरस येथे झालेल्या बलात्कार व पीडित मुलीच्या मृत्यूप्रकरणी हिंसाचार घडवण्यासाठी मॉरिशसमधून ५०कोटींचा निधी भारतात आल्याचा अहवाल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केला आहे. ईडीच्या प्राथमिक अहवालानुसार, हाथरस प्रकरणानंतर या जिल्ह्यात हिंसाचार भडकावण्यासाठी आणि जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (पीएफआय) हा निधी मिळाला होता. दरम्यान, या घटनेला वेगळेच वळण देण्याचा योगी सरकारकडून प्रयत्न होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
हाथरसमध्ये दंगल घडवून आणण्यासाठी कट रचण्याच्या आरोपाखाली चार संशयित आरोपींना मंगळवारी मेरठमधून अटक करण्यात आली होती. यामध्ये एका केरळच्या पत्रकाराचाही समावेश आहे. कार्ड को नावाच्या बेवसाईटचा संचालक असलेल्या या पत्रकारासहीत चारही आरोपींविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघे दिल्लीतून हाथरसकडे निघाले होते. त्यांचा ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंध असल्याचंही सांगण्यात येतंय. यापूर्वी उत्तर पोलिसांनी एका वेबसाईटद्वारे दंगलीचा कट रचण्याचाही आरोप केला आहे.
या अगोदर, जातीय दंगली भडकावण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी ‘जस्टिस फॉर हाथरस’ नावाची वेबसाईट तयार करण्यात आली. विरोध प्रदर्शनाच्या नावाखाली दंगल घडवून आणल्यानंतर, बचावासाठी विविध मार्गांवरही चर्चा केली होती, असा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला होता.