हाणकोण येथील खूनप्रकरणातील संशयिताचा मांडवी नदीत मृतदेह

0
6

कारवार तालुक्यातील हाणकोण गावात व्यावसायिक विनायक काशिनाथ नाईक (52) यांच्या खूनप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गुरुप्रसाद राणे (फोंडा) याचा मृतदेह काल मांडवी नदीत बेती येथे जुन्या फेरी धक्क्याजवळ आढळून आला. गुरुप्रसाद राणे याच्या पत्नीने मृतदेहाची ओळख पटवली आहे.
रविवार 22 सप्टेंबर 2024 रोजी पहाटेला चार ते पाच मारेकऱ्यांनी विनायक नाईक यांच्या हाणकोण गावातील घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्र, लोखंडी रॉडने जोरदार हल्ला केल्याने विनायक नाईक यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात विनायक नाईक यांच्या पत्नी वृषाली नाईक जखमी झाल्या आहेत.

तिघांना अटक
कारवार तालुक्यातील हाणकोण गावात विनायक नाईक यांच्या खूनप्रकरणानंतर गुरुप्रसाद राणे बेपत्ता झाला होता. उत्तर कर्नाटकातील कादरा पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी विनायक नाईक खूनप्रकरणामध्ये तिघांना अटक केली होती. या प्रकरणामध्ये बिहारमधील दोघांना दिल्लीत आणि कारवार येथे ओडिसा राज्यातील एका नागरिकाला अटक केली आहे. कर्नाटक पोलीस मागील दोन दिवसांपासून विनायक नाईक खून प्रकरणामध्ये गुरुप्रसाद राणे याचा शोध घेत होते.

मांडवी नदीत मृतदेह

काल मांडवी नदीच्या पात्रात दोन मृतदेह आढळून आले. त्यातील एक मृतदेह मांडवी नदीत दिवाडी फेरी धक्क्याजवळ सकाळी आढळून आला. सदर मृतदेह विनायक नाईक खून प्रकरणातील संशयित गुरुप्रसाद राणे याचा असल्याची चर्चा सुरू झाली. गुरुप्रसाद राणे याच्या कुटुंबीयांनी सदर मृतदेह गुरुप्रसाद याचा नसल्याची माहिती पोलिसांना दिली. त्या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही.

मांडवी नदीपात्रात बेती येथे जुन्या फेरीधक्क्याच्याजवळ काल आणखी एक मृतदेह संध्याकाळी आढळून आला. पर्वरी पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेतला. सदर मृतदेह बेपत्ता असलेल्या गुरुप्रसाद राणे याच्या कुटुंबीयांना दाखविण्यात आला. तो मृतदेह गुरुप्रसाद राणे याचा असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.