दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर
हरियाणात भाजपला 48, तर काँग्रेसला 37 जागांवर यश
नॅशनल कॉन्फरन्सचा 42, तर काँग्रेसचा 6 जागांवर विजय
जम्मूमध्ये भाजपला 29 जागा; काश्मीरमध्ये पाटी कोरीच
‘पीडीपी’ला अपयश; आम आदमी पक्षाने खाते खोलले
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. एक्झिट पोल्सचे अंदाज खोट ठरवत भाजपने हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली. भाजपने बहुमताचा आकडा पार करत 48 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसचे स्वप्न भंगले. दुसऱ्या बाजूला कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारली. नॅशनल कॉन्फरन्स (42) आणि काँग्रेस (6) यांच्या युतीचे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन होणार आहेे.
एक्झिट पोल्समध्ये व्यक्त झालेल्या अंदाजानंतर हरिणाया विधानसभेचे हाती आलेले निकाल धक्कादायक ठरले. भाजपने बहुमताचा 46 हा आकडा पार केला, तर काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले. इंडियन नॅशनल लोक दल पक्षाला 2 आणि 3 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
एक्झिट पोल्सचा अंदाज खोटा
शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचे बोलले जात होते. सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपने घवघवीत यश मिळवले. निकालात सकाळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती, पण नंतर भाजपने मोठी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर हरियाणात भाजपचा हा पहिला मोठा विजय आहे.
भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्तेत!
केंद्रातल्या सत्तेप्रमाणेच हरियाणातही जवळपास 6 दशकांनंतर कुठल्याही पक्षाला सलग तिसऱ्यांदा राज्यात सत्ता मिळाली आहे. त्यासाठी प्रचारादरम्यान विद्यमान मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केलेल्या घोषणा आणि दिलेली आश्वासने यांचा महत्त्वाचा वाटा होता, असे मानले जात आहे. त्या आश्वासनांद्वारे ओबीसी व अनुसूचित जातींपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता. जाट समुदाय शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे झुकल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सैनींचे हे धोरण भाजपसाठी महत्त्वाचे ठरले.
मुख्यमंत्र्यांचा 16 हजार मतांनी विजय
कुरुक्षेत्रातील लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी विजयी झाले आहेत. या जागेवर भाजप उमेदवार म्हणून असलेल्या नायब सिंह सैनी यांना एकूण 70 हजार 177 मते मिळाली. त्यांनी 16 हजार 54 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली.
8 मंत्री पराभूत; केवळ 2 विजयी
हरियाणात मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या सरकारमधील 8 मंत्री आणि सभापती पराभूत झाले. केवळ 2 मंत्री निवडणूक जिंकू शकले. विजयी मंत्र्यांमध्ये पानिपत ग्रामीण मतदारसंघातून राज्यमंत्री महिपाल धांडा आणि बल्लभगड मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री मूलचंद शर्मा यांचा समावेश आहे.
हरयाणात शपथविधी कधी?
हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी 12 ऑक्टोबरला होऊ शकतो. संभाव्य मंत्रिमंडळाला अंतिम रूप दिल्यानंतर तारीख ठरवली जाईल; मात्र 12 तारखेला शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नायब सिंह सैनी हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील.
जम्मू-काश्मीरमध्ये ‘एनसी’ला घवघवीत यश
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने घवघवीत यश मिळवले. 2014 मध्ये अवघ्या 15 जागा जिंकणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्सने यावेळी तब्बल 42 जागांपर्यंत मजल मारली. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीने एकूण 48 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे निश्चित झाले आहे.
काँग्रेसच्या जागा घटल्या,
पीडीपीच्या पदरी मोठे अपयश
काँग्रेस पक्ष नॅशनल कॉन्फरन्ससोबत सत्ता स्थापन करणार असला, तरी गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा जवळपास निम्म्याने घटल्या आहेत. गेल्यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीला केवळ 3 जागा जिंकता आल्या. आम आदमी पक्ष, जेपीसी आणि सीपीआयएमला प्रत्येकी 1 जागा मिळाली. 7 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून पराभव झाला.
भाजपच्या 4 जागा वाढल्या
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने 29 जागा जिंकल्या असून, त्यांना गेल्या वेळच्या तुलनेत त्यांच्या 4 जागा वाढल्या आहेत. भाजपने जिंकलेल्या सगळ्या जागा या जम्मूमधल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात भाजपला खातेही खोलता आलेले नाही.
भाजप प्रदेशाध्यक्षांचा पराभव
विशेष म्हणजे भाजपचे जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या सुरिंदर चौधरी यांनी रैना यांचा 7,819 मतांनी पराभव केला.
जम्मू-काश्मीरमध्ये ‘आप’ने खाते उघडले!
डोडा (पूर्व) विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी विजय मिळवला. मेहराज यांच्या रुपाने आपने जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये खाते उघडले आहे. मलिक यांनी या मतदारसंघात भाजप, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीवर मात केली. त्यांना 23,228 मते मिळाली.
कुस्तीपटू विनेश फोगाट यांचा दणदणीत विजय
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विनेश फोगट यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. विनेश फोगट यांनी भाजपच्या कॅप्टन योगेश बैरागी यांच्यावर मात करत मोठा विजय मिळवला. याशिवाय इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पक्षाकडून कविता देवी यांच्यासह एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. त्या सर्वांना धुळ चारत विनेश फोगाट यांनी बाजी मारली. 2005 नंतर जवळपास 19 वर्षांनी जुलानामधून विनेश फोगट यांच्या रुपाने काँग्रेसला ही जागा जिंकता आली आहे.
काँग्रेसचे पितळ उघडे : नरेंद्र मोदी
मंगळवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीत कृतज्ञता सोहळा आयोजित केला. हरियाणाच्या लोकांनी चमत्कार केला आहे. काँग्रेसचे गुपित जनतेसमोर उलगडले आहे. त्यांची बत्ती गुल झाली आहे. काँग्रेसचा डबा गुल झाला आहे, तसेच त्यांचे पितळ उघडे पडले आहे, अशी टीका मोदींनी केली.
ओमर अब्दुला होणार मुख्यमंत्री
ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी काल स्पष्ट केले. ओमर अब्दुल्ला यांनी दोन जागांवर (बडगाम आणि गंदरबल) निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर विजय मिळवला. ओमर अब्दुल्ला हे 11 किंवा 12 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
हरियाणातील निकाल अनपेक्षित : काँग्रेस
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. हरियाणातील निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच एका वाक्यात या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाल्यास, हा व्यवस्थेचा विजय असून लोकशाहीचा पराभव आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही, असेही ते म्हणाले.