हरितक्रांतीचा उद्गाता

0
23

ह्या जगामध्ये बहुतेक माणसे जन्माला येतात, केवळ स्वतःपुरते आणि कुटुंबापुरते पाहत संसारकर्तव्ये पार पाडतात आणि समाजाला काहीही योगदान न देता कधीतरी राम म्हणतात. पण अशीही काही माणसे असतात, ज्यांचे अवघे जीवन समाजाला असे काही मौलिक योगदान देऊन जाते की त्यांचे नाव त्यांच्या जाण्यानंतरही अमर राहते. अशीच एक मोठी व्यक्ती काल आपल्यातून निघून गेली, तिचे नाव डॉ. एम. एस. स्वामीनाथन. ‘भारतीय हरितक्रांतीचे जनक’ म्हणून आजवर ओळखले गेलेले आणि भारताला अन्नधान्यामध्ये आत्मनिर्भर बनवणारे म्हणून अवघ्या जगात नावाजले गेलेले कृषिवैज्ञानिक डॉ. मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचे संपूर्ण जीवन आज भारताच्या ज्या अन्नसुरक्षेचा आपण सारे अभिमान बाळगतो, ती प्राप्त करण्यासाठी वाहिलेले होते असे आपल्याला दिसेल. तारुण्यात वैद्यकीय शिक्षणाची मनीषा बाळगणाऱ्या स्वामीनाथनना वयाच्या अठराव्या वर्षी 1943 च्या बंगालच्या भीषण दुष्काळाच्या बातम्यांनी प्रचंड अस्वस्थ केले आणि वैद्यकीय शिक्षणाऐवजी कृषी संशोधनाच्या क्षेत्राला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. कृषिवैज्ञानिक म्हणून नावारूपाला आल्यानंतर सुदैवाने भारतीय कृषी संशोधन संस्थेसारख्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी त्यांना लाभली. तेथे पिकांच्या विविध प्रजातींवर जनुकीय संशोधन करीत असतानाच त्यांना मेक्सिकोमध्ये गव्हावर चाललेल्या प्रयोगांविषयी माहिती मिळाली. गव्हाच्या जपानी प्रजातींची सांगड मेक्सिकोमध्ये स्थानिक प्रजातींशी घालण्याचे प्रयोग तेथे प्रचंड यशस्वी ठरले होते. ज्या व्यक्तीने हे साधले त्या डॉ. नॉर्मन बर्लो यांना भारतात निमंत्रित करावे यासाठी डॉ. स्वामीनाथन यांनी आपल्या संस्थेच्या प्रमुखांशी हट्टच धरला. अखेर तत्कालीन लालफीतीच्या कारभारातून मार्ग काढत डॉ. नॉर्मन बर्लो भारतात आले तोवर 1963 साल उजाडले होते. पण पुढे जे घडले तो इतिहास आहे! त्यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या सुधारित प्रजातींची लागवड भारतात करू द्यावी असा आग्रह डॉ. स्वामीनाथन यांनी त्यांच्यापाशी धरला. त्यासाठी ते त्यांना घेऊन पंजाब आणि हरियाणाच्या सुपीक प्रदेशांत गेले. तेथील गव्हाच्या स्थानिक प्रजातींची रोपे साडेचार – पाच फुटांपर्यंत वाढत असत. त्यांना कणसे लगडली की त्या भाराने ती वाकत व मोडत. परिणामी, उत्पन्नाची प्रचंड नासाडी होई. याउलट जपानमधील नोरीन – 10 ही गव्हाची जात केवळ दोन अडीच फुटांच्या रोपांची व अधिक उत्पन्नदायी होती. जपानी आणि मेक्सिकन गव्हाच्या संकरातून तयार करण्यात आलेल्या गव्हाच्या जातीही कमी उंचीच्या आणि प्रचंड उत्पन्न देणाऱ्या होत्या. 63-64 च्या रब्बी हंगामात उत्तर प्रदेशातील पंतनगर, कानपूर, पंजाबातील लुधियाना आणि बिहारमधील पुसा येथे त्यांची प्रायोगिक लागवड करण्यात आली जी तिप्पट उत्पन्न देणारी ठरली. ह्याच दरम्यान 1965-66 आणि 66-67 अशी लागोपाठ दोन वर्षे भारतात भीषण दुष्काळ पडला. लोक अन्नधान्याला मोताद झाले. अमेरिकेच्या पीएल 480 योजनेखालील निकृष्ट गहू मोठ्या प्रमाणावर आयात करण्याची पाळी भारतावर ओढवली. 66 सालची आयात तर तब्बल 10.36 मेट्रिक टन होती. ह्या समस्येवर उपाययोजना करून भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करायचे असेल तर नव्या सुधारित संकरित जातींची लागवड आवश्यक आहे हे डॉ. स्वामीनाथन यांनी जाणले आणि त्यासाठी व्यापक प्रयत्न केले. संकरित गव्हाची अठरा हजार बियाणी तातडीने मागवण्यात आली. त्या लागवडीतून गव्हाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. मग जनुकीय बदलांद्वारे बी बियाण्यांच्या नव्या भारतीय जाती विकसित करण्यावर भर दिला गेला. हाच प्रयोग तांदळावर करण्यात आला. गहू, तांदुळ, चणा, मका अशा विविध पिकांच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या नव्या सुधारित निरोगी जातींची लागवड भारतीय शेतकऱ्यांनी करावी यासाठी डॉ. स्वामीनाथन यांनी जिवाचे रान केले. शेती प्रदर्शने भरवली. त्यांची ही कळकळ पाहून पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना जवळ केले. आयसीएआरचे महासंचालक, कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव, नियोजन आयोगाचे सदस्य अशा अनेक पदांवरून डॉ. स्वामीनाथन यांनी देशाची कृषीधोरणे कार्यान्वित केली, जे योगदान अत्यंत मौलिक आणि क्रांतिकारक ठरले. अधिक उत्पन्नदायी संकरित बी-बियाणी, यांत्रिक शेती, शेती आणि जलसिंचनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खते, कीटकनाशके यांचा योग्य वापर यातून स्वामीनाथन यांनी भारतीय शेतकऱ्याला समृद्धी दिली आणि देशाला अन्नधान्यात आत्मनिर्भर बनवण्यात मोठे योगदान दिले. आज भारत अन्नधान्यात सरप्लस देश म्हणून जगात ताठ मानेने उभा आहे, आपल्या नागरिकांना अन्नसुरक्षा देतो आहे त्यामागे डॉ. स्वामीनाथन यांचे जीवनसमर्पण आहे याची जाणीव आपल्याला हवीच हवी.