हनुमंत परब मारहाण प्रकरणी खात्यांतर्गत चौकशीचा आदेश

0
23

>> पोलीस महासंचालकांकडून आदेश जारी

पोलीस महासंचालक डॉ. इंद्रदेव शुक्ला यांनी पिसुर्ले-सत्तरी येथील खनिज वाहतूकविरोधी आंदोलनातील नेते हनुमंत परब यांना पोलीस स्थानकात झालेल्या मारहाण प्रकरणी खात्याअर्तंगत चौकशीचा आदेश काल दिला. या प्रकरणामुळे डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

हनुमंत परब यांना पोलीस स्थानकात झालेल्या मारहाण प्रकरणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेऊन चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. गोवा पोलिसांच्या खास शाखेकडून मारहाण प्रकरणी खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

पिसुर्ले येथील खनिज वाहतुकी विरोधात शेतकर्‍यांसमवेत आंदोलन करताना १२ मार्च रोजी वाळपई पोलिसांनी हनुमंत परब आणि आंदोलक काही शेतकर्‍यांना ताब्यात घेतले होते. त्यानंत पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर, वाळपई पोलीस निरीक्षक व इतर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप परब यांनी केला होता.