स्व. शांताराम नाईक ः कॉंग्रेसचा आधारवड हरपला

0
263
  • शंभू भाऊ बांदेकर

गोव्याचे, देशाचे अनेक प्रश्न संसदेत मांडून श्री. शांताराम नाईक त्यांचा सातत्याने पाठपुरावा करीत राहिले. राज्यसभा खासदार म्हणून दोनवेळा झालेली त्यांची निवड ही त्यांच्या त्या कार्याची पोचपावतीच होती. लोकसभेत सर्वाधिक विधेयके त्यांच्या नावावर होती ही देखील त्यांच्या कार्याची पावतीच म्हणता येईल.

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष स्व. पुरुषोत्तम ऊर्फ भाऊ काकोडकर, स्व. श्रीमती सुलोचना काटकर, श्रीमती निर्मला सावंत या तिन्ही अध्यक्षांच्या कारकिर्दीत मी शांताराम नाईक यांना असंख्य वेळा कॉंग्रेस कचेरीत पाहिले आहे. त्यांची चर्चा केवळ कॉंग्रेस पक्षाबद्दलच असे. पक्ष बळकट कसा करायचा, कुठे, केव्हा बैठक घ्यायची, बैठकीस बाहेरून कोणाला बोलवायचे, अशा प्रकारची ती चर्चा असे. त्यावेळी त्यांना जवळून पाहायची संधी मला मिळाली खरी, पण आम्हा उभयतांची खरी नाळ जुळली ती १९८४ च्या निवडणुकीच्या वेळी. मी पेडणे मतदारसंघातून विधानसभेसाठी, तर ऍड शांताराम नाईक उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. पेडणे मतदारसंघाचा संपूर्ण दौरा आम्ही एकत्र करीत होतो. शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, शिक्षणमंत्री हरिष झांट्ये, कृषी मंत्री फ्रान्सिस सार्दिन खास आमच्या प्रचारासाठी येत असत. सभा, बैठकांना हजेरी लावत असत.

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते स्व. रघुराज ऊर्फ भाऊसाहेब देशप्रभूही पेडणे तालुक्यात जेथे त्यांची वट आहे तेथे फिरत असत. सर्वश्री जितेंद्र देशप्रभू, राजू बापू तळवणेकर, गोपाळ परब, कै. सुधीर देशप्रभू, उल्हास प्रभुदेसाई आदी कॉंग्रेसजन आमच्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळत होते. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आम्ही दोघेही विजयी झालो आणि मग पेडणे तालुक्यातील लोकांची गार्‍हाणी ऐकण्यासाठी, विकासाच्या कामांसाठी आम्ही एकत्र फिरू लागलो आणि आमची मैत्री वाढत गेली व शेवटपर्यंत टिकून राहिली. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आम्ही आमच्या कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ होतो.

त्यानंतर शांतारामजींनी कधी मागे वळून पाहिले नाही. लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे चिटणीस, विविध राज्यांत पक्षाचे निरीक्षक आदी कामे त्यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने व सचोटीने करीत पक्षासाठी, गोव्यासाठी, देशासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

शांताराम नाईक यांचा जन्म १२ एप्रिल १९४६ रोजी कुंकळ्ळी येथे झाला. मडगावच्या पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले व त्यानंतर मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी वकिली सुरू केली. त्यांना वाचनाची आवड होती. अधूनमधून त्यांचे वृत्तपत्रीय लेखनही चालू असे. राज्याचे विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून त्यांनी काम पाहिले. वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षात विविध पदांवर काम केले व दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय कॉंग्रेस अधिवेसनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता ज्यांचे वय झाले आहे त्यांनी राजकारणातून स्वेच्छेने निवृत्त व्हावे असे आवाहन करताच प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे ते भारतातील पहिले कॉंग्रेस नेते ठरले. मी त्यांना तेव्हा म्हटले, ‘‘शांतारामबाब, तुम्ही सत्तरी ओलांडली असली तरी तुमची स्मरणशक्ती, आरोग्य तुम्हाला चांगली साथ देत आहे. तुमच्या पत्नी बिनावहिनीही आता पक्षकार्यात सक्रिय झालेल्या आहेत. तुमचा पुत्र अर्चितही तुमच्याबरोबर कॉंग्रेस कार्यालयात हजर राहतो, तेथील कामाची माहिती घेतो. आपण पक्ष बळकटीसाठी प्रदेशाध्यक्षपदावर अजून थोडे थांबला असता तर…’’

मला मध्येच अडवत ते म्हणाले, ‘‘शंभू भाऊ, हे सर्व सकारात्मक असतानाच आपण त्यातून बाजूला होणे याला महत्त्व आहे. आणि मी जरी पद सोडत असलो, तरी पक्ष थोडाच सोडत आहे! तो तर माझा श्वास आहे.’’ आणि पदत्याग केल्यानंतरही ते कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात येत होते. राजभवनवर आम्ही हल्लीच धरणे धरले त्यालाही ते हजर राहिले होते व घटक राज्य दिनानिमित्त पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून लोकसभेत शून्य प्रहराला २९ एप्रिल १९८७ रोजी आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्याला राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन कसे दिले आणि महिन्याभरात ३० मे १९८७ रोजी आश्वासनपूर्तीचे सोपस्कार पूर्ण कसे केले याची विस्तृत माहिती दिली व टाळ्यांच्या गजरात आपले भाषण संपवले होते. पक्षाने जो ‘जन गण मन, नमन तुका गोंयकारा’ हा कार्यक्रम गोवाभर राबवला त्या कार्यक्रमातही ते अनेक ठिकाणी सहभागी झाले.
१२ एप्रिल रोजी त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार, कुटुंबीय व पक्ष कार्यकर्तेही जमले होते. डॉ. उल्हास परब, गुरुदास नाटेकर, आल्तिन गोम्स व मी हे त्यांचे जवळचे स्नेही एकत्र आल्यानंतर पुष्पगुच्छ देतानाचा फोटो घेतला. मी ‘जीवेत् शरदः शतम्’ म्हटले. ते हसले. मी विनोदाने म्हटले, ‘असे हसण्यावारी नेऊ नका. नपेक्षा पद सोडले तसे आम्हालाही वार्‍यावर सोडाल!’ सगळेच हसले. तेही हसत हसत म्हणाले, ‘ते कसे शक्य आहे? आम्हा सगळ्यांनाच शंभरी गाठायची आहे.’ आणि हे असे अकस्मात घडले. आम्हा सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता.

राजकारण आणि समाजकारण हे जणू त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले होते. अडलेल्या माणसांना अर्ज विनंत्या करून दे, त्यांच्यासाठी फोनाफोनी कर, मंत्र्यांना पत्र पाठव असे सारे त्यांचे चालू असायचे. दलित संघटनेचा तर ते अविभाज्य घटक बनले होते. लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार जेव्हा पहिल्यांदा खासदार झाल्या, तेव्हा शांताराम नाईक खासदार होते. त्यावेळी दलित संघटनेने पणजीत त्यांच्या उपस्थितीत मीराकुमार यांचा भव्य सत्कार घडवून आणला होता. हल्लीच १५ एप्रिलला आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. त्यावेळी त्यांनी आपण सिद्धार्थ कॉलेजात कायद्याचे शिक्षण घेत असताना आंबेडकरांचे भव्य दिव्य कार्य आपल्याला कसे प्रेरणादायी ठरले, दीन दलित, शोषित पीडितांच्या समस्या सोडवण्याबद्दल मनात कशी करुणा निर्माण झाली, त्याविषयी सांगितले होेते.

गोव्याचे, देशाचे अनेक प्रश्न संसदेत मांडून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करीत राहिले. राज्यसभा खासदार म्हणून दोनवेळा झालेली त्यांची निवड ही त्यांच्या त्या कार्याची पोचपावतीच होती. लोकसभेत सर्वाधिक विधेयके त्यांच्या नावावर होती ही देखील त्यांच्या कार्याची पावतीच म्हणता येईल. विरोधक त्यांची ‘झीरो अवरचा हीरो’ म्हणून थट्टा करीत, पण ते शांतपणे ऐकून घेत व गोव्याच्या व देशाच्या अनेक समस्यांना, प्रश्नांना झीरो अवरलाच कशी वाचा फोडली ते विस्ताराने सांगत. गोव्याच्या घटक राज्याचा प्रश्नही त्यांनी झीरो अवरलाच उपस्थित करून धसास लावला होता. त्यामुळे ते झीरो अवरचे हीरो तर होतेच, पण त्यांच्या अभ्यासू, सूक्ष्म निरीक्षण, कायद्याचा गाढ अभ्यास या गुणांद्वारे त्यांनी संसदेत स्वतःचा ठसा उमटवला होता. त्यामुळे ते गोव्याचे सांसदीय हिरो ठरतात. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाचा एक आधारवड हरपला हे तर खरेच, पण त्यांच्या निधनाने गोव्याची व देशाचीही हानी झाली आहे. त्यांच्या कर्तृत्ववान कारकिर्दीस विनम्र प्रणाम!