- डॉ. फ्रान्सिस फर्नांडिस
‘‘दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं. डॅनी हँडसम, प्रामाणिक व सरळ स्वभावाचा म्हणून मी लग्न केलं. तो सधन घराण्यातला, पण दुर्दैवानं आई निधन पावताच वडिलांनी दुसरं लग्न केलं. तिनं त्याचा छळ केला. वडिलांना त्याच्यापासून दूर केलं.’’
‘‘ओ गॉड! काय झालं, सगळी पार्सलं रस्त्यावर! नीट चालवता येत नाही स्कूटर?’’ हायवेच्या डिलाईट हॉटेलमधून जेवणाची दहा पार्सलं घेऊन स्कूटरवरून डॅनी वेगाने जॉली गेस्टहाऊसकडे चालला होता. डॅनीला रडू कोसळले. दीपक बघतच राहिला. चूक त्याचीच होती. मध्ये आलेल्या कुत्र्याला वाचविण्यास तो डॅनीच्या गाडीच्या मार्गात आला.
‘‘घाबरू नका, मी देतो नुकसानी.’’
‘‘माझी नोकरी जाईल.’’
‘‘कुठं काम करता?’’
‘‘डिलाईट.’’
‘‘मी ओळखतो मिसेस बाब ना. हे कार्ड घ्या, जरूर या.’’
डॅनी घाबरतच हॉटेलकडे परत आला. मिसेस बॉबने हसतच सांगितले, ‘‘अपघात होतात. पुन्हा घेऊन जा पार्सल.’’ त्याला हायसं वाटलं. दीपकने सांगितलं असावं, नाहीतर ही बाई कडकलक्ष्मी. त्याला आनंद झाला.
दुसर्याच दिवशी लिडिया- डॅनीची मिसेस- दीपकच्या ए वन सेन्टरमध्ये गेली. कॉप्म्युटर टायपिंग व लिगल डॉक्युमेंटेशन सेंटर होतं ते. लॉच्या तिसर्या वर्षातील शेवटच्या सेमिस्टरला असलेल्या लिडियाला काम करण्याची चांगली संधी होती. दीपकने तिला कामावर येण्यास सांगितले. वेळप्रसंगी ती ड्राफ्टिंग करे. त्यामुळे तो तिला जास्त पगार देई. काही दिवसांनी दीपकला ती कसल्यातरी दडपणाखाली असल्यासारखे दिसू लागले. त्याने विचारताच ती म्हणाली,
‘‘दीड वर्षाची मुलगी आहे. डॅनी माझा नवरा, दिवसा सांभाळतो तिला व रात्री हॉटेलमध्ये काम करतो. दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं. डॅनी हँडसम, प्रामाणिक व सरळ स्वभावाचा म्हणून मी लग्न केलं. तो सधन घराण्यातला, पण दुर्दैवानं आई निधन पावताच वडिलांनी दुसरं लग्न केलं. तिनं त्याचा छळ केला. वडिलांना त्याच्यापासून दूर केलं. काही महिन्यांत वडील निधन पावले. लगेच सावत्रआईने डॅनीला हाकललं. तिने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या व आपल्या मुलांच्या नावावर करून घेतली होती. अगोदर तो कारमधून कॉलेजला येत असे. सर्व मुलांना तो हवा असे. त्याच्यावर संकट येताच कुणीही सोबत करण्यास पुढे आला नाही. मी मात्र त्याच्याबरोबर होते. मी त्याला स्वीकारले, तो निर्धन असतानादेखील. त्याने कॉलेज सोडले. मिळेल ते काम केले. मी शिक्षण सुरूच ठेवले. आता काम करून शिकणारच.’’
‘‘सगळं भलं होईल तुमचं. जिद्द असू दे!’’
काही महिन्यांतच लिडिया सांगू लागली, ‘‘आम्ही सनसिटीत राहणार, डॅनीला विजय इस्टेट एजन्सीत जॉब मिळाला.’’ दीपकला लिडिया, एक हुशार टायपिस्ट जॉब सोडते म्हणून वाईट वाटले. सनसिटीत सुदैवाने त्यांना राहायला चांगली जागा मिळाली. डॅनीने बरेच कष्ट केले. धावपळीला तो तयार असायचा. प्रवासाला गाडी होती. बोलण्यात तो हुशार. इतरांना गोड बोलून आपलंस करण्याची कला त्याच्याकडे होती. अल्पावधीत त्याने एजन्सीला चांगले दिवस प्राप्त करून दिले. चार वर्षांत एजन्सीच्या सर्व कामांची माहिती त्याने मिळवली. स्वतःची एजन्सी छोट्या जागेत सुरू केली. लिडिया खूश झाली. तिने शेवटचे सेमिस्टर पूर्ण केलंच.
त्यांच्या इस्टेट एजन्सीचे काम वाढत होते म्हणून तिने डॅनीला मदत करावयाचे ठरविले. फ्लॅट, जमिनी घेणं-विकणं सुरूच होतं. डॅनीचं भाग्यच बदललं. लिडियाला त्याचा अभिमान वाटू लागला. गेल्या दहा वर्षांचे श्रम सार्थकी लागले असं त्यांना वाटायला लागलं. मुलीने चांगलं शिकावं म्हणून त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. दुरावलेले लिडियाचे आई-बाप चौकशी करू लागले. समाजात मान मिळाला.
सर्वप्रथम डॅनीने लिडियाला वकिली करण्याची संधी दिली. पण तिने एका संस्थेत शुक्ल कायदे सल्लागार म्हणून काम पत्करले व एजन्सीकडेही लक्ष देऊ लागली. डॅनीने आपला स्टाफ नेमला होताच. डॅनी यशाचं शिखर गाठत असतानाच त्याच्या हितशत्रूंनी त्याचा द्वेष सुरू केला. यशाच्या रेषेला स्पर्श करताच कबड्डी नियमाप्रमाणे लोक पाय खेचणे सुरू करतात, तसेच डॅनीच्या बाबतीत घडले. तो एकच फ्लॅट वा प्लॉट अनेक लोकांना विकतो असे खोटे आरोप करायला त्यांनी सुरुवात केली. बदनामी करून त्याचा व्यवसाय बंद करण्यासाठी जे काही करता येईल ते केले. आरोप खोडण्यासाठी बराच खर्च करून अनुभवी वकिलाची नेमणूक त्याने केली व आपला व्यवसाय पुन्हा सुरळीत केला. दुसर्या राज्यांतील लोक इकडे फ्लॅट वा जमीन घेण्यासाठी त्याच्याकडेच येत. डॅनी व लिडिया बहुभाषिक होते. त्यामुळे त्यांना बराच फायदा झाला.
रिटा इंटर्नशीप करत होती. ती मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये होती. नाताळसाठी घरी जाण्याच्या तयारीत होती. आज ड्युटी करून संध्याकाळी जाण्याचा विचार करत होती. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये एक साठी उलटलेली स्त्री रडत होती. रिटा तिच्या जवळ गेली. उपचारांसाठी तिच्याजवळ पैसे नव्हते. रिटाने पेपर्स पाहिले. तिला हृदयाचे त्रास होते. उपचार महाग होते. ‘आंटी, तुम्ही बसा.’ तिने डॅडीला फोन केला. डॅनी एका मिटिंगमध्ये व्यस्त होता, पण त्याने लगेच येण्याचे कबूल केले. तोपर्यंत ती पेपर्स घेऊन हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर हांडेना भेटली.
‘‘आठ दिवसांत ऑपरेशनची तयारी हवी,’’ ती दचकली, डॅडी पैसे देतील? त्या बाईचे कुणी नातेवाईक असतील ते बघतील तिला असा विचार करत ती बाहेर आली. डॅनी जवळपासच असल्याने लवकर आला.
‘‘कुठे आहे ती?’’
‘‘इथेच होती.’’ रिटाने इकडे तिकडे पाहिले, पण ती दिसली नाही.
‘‘ठीक आहे. काय झालंय? कोण ती? सगळी माहिती घे, नंतर विचार करू.’’ म्हणत डॅनी गेला. रिटा खूश झाली. आंटीला चांगली बातमी देऊ या विचाराने ती तिला शोधू लागली. ती बाई रडतच जवळपासच्या एका कोपर्यात बसली होती.
‘‘आंटी, तुम्ही कुठे राहता?’’
‘‘आसावली.’’
‘‘मी तुम्हाला फोन करून सांगते. सगळं ठीक होईल. आता घरी जा. मी लवकरच येईन. ती बाई खूश होऊन घरी जाण्यास निघाली. थोड्या वेळाने एक सफाई कामगार रिटाकडे आला. ‘‘मॅडम, ती बाई ही बॅग विसरली.’’ रिटाने बॅग उघडून पाहिली. त्यात डायरी आणि काही फोटो होते. तिचा त्यात पत्ताही होता.
घरी येताच तिने ममीला सगळे सांगितले. ‘‘हे काय मध्येच? हे नाताळचे दिवस आहेत.’’
‘‘डॅडीना माहीत आहे.’’
‘‘मग तुम्ही दोघं जा, करा हवं ते!’’
‘‘नाही, तुला त्रास नाही देणार.’’ डॅनीनं सगळं ऐकलं. ‘‘रिटा डायरी व फोटोविषयी काय सांगत होतीस?’’ आणि फोटो पाहताच तो सुन्न झाला. त्याने लिडियाच्या कानात काहीतरी सांगितले.
‘‘काय?’’
‘‘हे खरं आहे लिडिया. गेलंच पाहिजे. रिटा ओळखेल तिला. आसावली जवळ आहे. साडेसात झालेत. चला, तयार व्हा.’’
‘‘मला सांगा ना काय ते?’’
‘‘त्यांना भेटून बघू काय त्रास आहे तो!’’
रिटा आनंदाने तयार झाली. अर्ध्या तासात ती सर्व आसावलीला पोहोचली. रस्त्याच्या बाजूला डिसाचे भले मोठे घर होते. बाजूला एक जुनं घर होतं, त्यात एका खोलीत ती होती. तिकडे जाण्यापूर्वी डॅनी डिसाच्या घरी एकटाच गेला व त्याने त्या खोलीत असलेल्या बाईविषयी चौकशी केली. डिसाने डॅनीचं स्वागत केलं व त्या बाईची व्यथा सांगितली.
‘‘गेली दहा वर्षे ती अशीच खितपत पडली आहे. चर्चच्या चॅरिटी ग्रुपतर्फे थोडीफार मदत मिळते. पण ती आजारी आहे. तिच्या देखभालीची गरज आहे. एका सधन घरातील बाई अशा अवस्थेत पाहून कीव येते. पण वेळ कुणाला आहे? आम्ही देतो जेवण, पण मी असा सत्तरी ओलांडलेला. मुलं परदेशी. असं ऐकलं की तिच्या दोन मुलांनी तिच्या संपत्तीची विल्हेवाट लावली आणि तिला घराबाहेर काढलं. कांदोळी सोडून इकडे कशी आली हे मला या वर्षी समजले.’’
‘‘सांगा ना अंकल.’’
‘‘तिच्या नावावर हरमल किनार्यावर एक फ्लॅट होता. एक बिगर गोमंतकीय तिच्या संपर्कात आला. तिने फ्लॅटचे पेपर्स त्याला दाखविले. मग तिच्या सह्या घेऊन त्याने तो प्लॅट विकला आणि ज्या आशेवर ती जगत होती तीदेखील मावळली.’’
‘‘अंकल, आभारी आहे. मी थोडीफार मदत करावी म्हणतो. भेटतो त्यांना.’’ बाय करून डॅनी कारकडे वळला. लिडियाला सर्व समजताच तीदेखील दुःखी झाली. पण रिटाला याचा बोध झाला नाही. मात्र आंटीकडे जाण्यापूर्वी ममीने रिटाला सगळं सांगितलं.
दारावर थाप मारताच बर्याच वेळाने दार उघडलं गेलं. एक अशक्त वयस्क स्त्री दारात उभी होती. ‘‘ग्रँनी, पहा कोण आलंय?’’
‘‘रिटा तू? आणि हे कोण? विश्वास नाही होत… डॅनी?’’
‘‘होय ममी मी आणि ही लिडिया.’’
डोळ्यांत अश्रू आणत ती म्हणाली, ‘‘माझ्याच सख्या मुलांनी माझा घात केला. आपले लोक त्याच कालावधीसाठी आपले असतात, जेव्हा त्यांना आपली गरज असते. मी तुला सतावले, तुझा छळ केला, तुझ्या पपांना दूर केलं तुझ्यापासून. मी पापी आहे. मला क्षमा कर. माझ्या मुलांनी मला धमकावलं तुला दूर करण्यासाठी. मला धमकावून सह्या घेतल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर.’’ ती रडतच राहिली.
‘‘ममी, मला सांग, तू कशी आलीस इकडे?’’
‘‘जे.के.मुळे!’’
‘‘जे.के.?’’ डॅनी थक्क झाला. ‘‘लिडिया, हा जे.के. कोण समजलं. जो बिगर गोमंतकीयांना नाव बदलण्यास मदत करतो. हल्लीच त्याने यूपीच्या विराणी डोसाला वीरा डिसा हे नाव बदलून दिलं.’’
‘‘माझं सगळं लुटलं या लोकांनी…’’ ती पुन्हा रडू लागली. ‘‘दुःख आलं माझ्या वाटेला.’’ ‘‘सगळ्यांच्या आयुष्यात सुख आणि दुःख आहेच. ते कसं स्वीकारतो यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतात. अनेक गोष्टी या स्वीकारण्यापाशी येऊन थांबतात,’’ डॅनी म्हणाला.
‘‘ममी, हा जे.के. सापडला पोलिसांना काही महिन्यांपूर्वी. पेडण्याची पुनव करून हरमल किनार्यावर एका रशियन युवतीची पर्स चोरून पळत होता. त्या पर्समध्ये पोलिसांना मिळाला. गांजा आणि कॅश… दोघांनीही अटक झाली.’’
‘‘बरं झालं, पण मी त्याचा पिच्छा पुरवणार! मी घेते ममीची केस.’’
‘‘ऑल द बेस्ट लिडिया.’’
नंतर डॅनी ममीकडे वळून म्हणाला, ‘‘ते विसर. नवी सुरुवात कर. नाताळ साजरा कर आमच्याबरोबर.’’
‘‘ग्रँनीचं ऑपरेशन आहे. तारीख सांगितली आहे. या आठ दिवसांतच करायला हवं.’’ रिटाने सांगितले.
‘‘हरकत नाही, हाच आमचा नाताळ,’’ डॅनी आनंदाने म्हणाला.
मग ग्रॅनीला घेऊनच सर्व घरी आले.