स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

0
104

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३० वाजता पणजीत निधन झाले. आज २० रोजी त्यांचे पार्थिव मडगाव हरिमंदिर चाळीसमोरील कामत बिल्डिंगमधील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ९.३० पासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल व दुपारी ११.३० वाजता मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

गोवा मुक्तिलढ्यात सक्रिय सहभाग घेतलेले श्री. केळेकर हे गांधीवादी विचारसरणीचे होते. साधी राहणी व उच्च विचारसरणी याचा त्यांनी सदैव अंगीकार केला. १९७७ साली झालेल्या जनमत कौलावेळी त्यांनी गोवा स्वतंत्र राहावा यासाठी विशेष भूमिका निभावली होती. कोकणीतून त्यांनी अनेक नियतकालिके चालवली. महात्मा गांधी यांच्या सत्याचे प्रयोग या आत्मकथेचा त्यांनी कोकणी अनुवाद केला होता. त्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही लाभला होता. गांधीजींविषयी अलीकडेच त्यांनी कशे आशिल्ले गांधीजी या नावाचे एक प्रश्नोत्तरीच्या स्वरूपातील पुस्तकही लिहिले होते. त्यांनी स्थापन केलेली मार्ग ही संघटना राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत होती. त्यांच्या निधनाबद्दल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी शोक व्यक्त केला आहे.