राज्यातील गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या सरकारी नोकरीपासून वंचित असलेल्या मुलांना येत्या नोव्हेंबर अखेर नोकरी न दिल्यास आझाद मैदानावर १ डिसेंबरपासून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट यांनी काल पत्रकार परिषदेत दिला. स्वातंत्र्यसैनिकांची सरकारी नोकरीपासून वंचित मुले गेले कित्येक दिवस नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत.
आझाद मैदानावर काही दिवसांपूर्वी आमरण उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्यापपर्यत मागण्यांची पूर्ती करण्यात आलेली नाही. स्वातंत्र्यसैनिकांच्या केवळ २३ मुलांना नोकरी देण्यात आली आहे. आणखी स्वातंत्र्यसैनिकांची २२७ मुले नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे डॉ. शेट यांनी सांगितले.