स्वातंत्र्यसेनानी शामसुंदर नायक ः एक समर्पित व्यक्तिमत्त्व

0
24
  • ऍड. प्रा. अशोक कृ. मोये

तुरुंगातील एका लहानशा खोलीत पाच-सहा जणांना डांबून ठेवले जायचे. ठरल्या वेळीच पाणी, जेवण व आंघोळ करण्यासाठी बाहेर पाठवले जायचे. बाहेर चोवीस तास पोर्तुगिजांच्या सैनिकांचा पहारा असायचा. अशा प्रकारे शामसुंदर यांनी चार वर्षे तुरुंगात काढली.

१८ जून हा गोव्याचा क्रांतिदिन असल्याने माझे भावोजी- स्वातंत्र्यसैनिक श्री. शामसुंदर रमाकांत नायक- मला त्या दिवशी हमखास पणजी येथील आझाद मैदानावर भेटायचे. ते भेटले की ‘कॅफे रियाल’मध्ये न चुकता चहासाठी घेऊन जायचे. असे हे कित्येक वर्षे चालू होते. मलाच सोडा, ते प्रत्येकालाच मित्रत्वाची वागणूक देत असत.

शामसुंदर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात- कपड्याच्या साबणांचे उत्पादन करणार्‍या घराण्यात- १२ मे १९३४ रोजी म्हापसा येथे झाला. ते एक हुशार विद्यार्थी होते. त्यांनी सारस्वत विद्यालय- म्हापसा, पोर्तुगीज प्रायमरी स्कूल- म्हापसा आणि अँग्लो पोर्तुगीज इन्स्टिट्यूटमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले व हायस्कूलचे शिक्षण घेत असताना विद्यार्थिदशेतच त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची व व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली. असे असले तरी नियतीच्या मनात काही वेगळेच होते…
शामसुंदर विद्यार्थिदशेतच आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वातंत्र्यलढ्यात उतरले आणि अर्थातच अभ्यास व इतर व्यापार-व्यवहारांकडे त्यांचे दुर्लक्षच झाले. असेच अचानक एके दिवशी ते घरातील कुणालाही न सांगता, कुणाचीही तमा न बाळगता २६ जानेवारी १९५५ रोजी म्हणजे वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या काही मित्रांसोबत म्हापसा येथील सत्याग्रहात सामील झाले आणि पोर्तुगिजांकडून पकडले गेले. तद्नंतर त्यांना आग्वाद, रेईश मागुश, आल्तिनो- पणजी येथील तुरुंगांत डांबण्यात आले. त्या दिवसापासूनच त्यांना जबरदस्त मारहाण सुरू झाली. आजेंत मोंतेरोच्या कित्येक थपडा त्यांनी खाल्ल्या. असह्य माराने अंगाला सूज यायची. तोंडाचा मुखवटा बदलून जायचा. कधी रक्तस्रावही व्हायचा.

तुरुंगातील एका लहानशा खोलीत पाच-सहा जणांना डांबून ठेवले जायचे. ठरल्या वेळीच पाणी, जेवण व आंघोळ करण्यासाठी बाहेर पाठवले जायचे. ठरलेल्या वेळेशिवाय बाहेर जाण्यास मज्जाव असायचा. चोवीस तास पोर्तुगिजांच्या सैनिकांचा पहारा असायचा. अशा परिस्थितीत केव्हा तरी कुणाला ओकारी आली किंवा लघुशंकेस झाल्यास हाताची ओंजळ करून खिडकीतून बाहेर टाकली जायची. म्हणूनच आपल्याला वीट-विटाळ लागत नसल्याचे ते सांगत. वास्तविक हे वाचायलासुद्धा विचित्र वाटेल, पण प्रत्यक्षात तसे घडून गेले होते. आजेंत मोंतेरोला अशा लोकांची जास्तीत जास्त विटंबना करायची होती व ती तो करत असे. अशा परिस्थितीत शामसुंदर यांनी तुरुंगात चार वर्षांचा काळ घालविला आणि १९६१ साली गोवा स्वतंत्र झाल्यावर त्यांना मुक्त करण्यात आले.

शामभाईंचा विवाह १९६७ साली शिवोली येथील सरोज कृष्ण प्रभू मोये यांच्याशी पार पडला. त्यानंतर शामभाई स्वतंत्र गोव्यात मजेत दिवस घालवू लागले. त्यांना समाजकार्याची मुळातच आवड होती, त्यामुळे त्यांनी स्वतःला समाजकार्यात वाहूनच घेतले. त्यांच्या कार्यातून निपजलेल्या व पूर्णत्वास आलेल्या कामांवरून अजूनही लोक त्यांची आठवण काढतात.

म्हापसा येथील सारस्वत विद्यालयाची भव्यदिव्य इमारत व त्या विद्यालयाचा विस्तार, संगीत साईनाथ विद्यालय व ‘स्वरशृंगार’ या संगीत विद्यालयाच्या स्थापनेसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. ते एक चांगले बासरीवादकही होते, त्यामुळेच असेल कदाचित, त्यांचा संगीताकडे जास्त ओढा होता. म्हापसा येथील लक्ष्मी नारायण देवस्थानात दर शुक्रवारी भजनाचा पायंडा त्यांनीच पाडला. नेहरू उद्यानात अभिनव पद्धतीने रंगपंचमी उत्सव त्यांनीच सुरू केला व त्या उत्सव समितीचे सदस्य व पदाधिकारीही बनले. सिरसाट लॉज म्हापसा येथे त्यांनीच पुढाकार घेऊन योग-साधना वर्ग सुरू केले व आपणही त्यात सहभाग घेऊ लागले.

खोर्ली- म्हापसा येथील स्मशानभूमीचीही शामभाईनी जबरदस्त सुधारणा केली. त्यांनी तिथे कित्येक जळाऊ लाकडांची झाडे लावली व त्या झाडांच्या सावलीतच लोकांना अंत्यविधी पार पाडण्यास सुसह्य असे वातावरण तयार केले. त्यासाठी कशाचीही पर्वा न करता ते पहाटे चार वाजता त्या झाडांना एकटेच पाणी द्यायला जायचे. अशी काही माणसे समाजकार्यात धडपडण्यातच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात, त्यांतीलच ते एक होते.

शामभाई हे एक धीट व न डगमगणारे व्यक्तिमत्त्व होते. एके दिवशी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर एक नागीण ऐटीने डोलत असल्याचे त्यांनी पाहिले. ताबडतोब त्यांनी तिला आपल्या उजव्या हाताने पकडले आणि सौ. सरोजला बोलावून आपला पराक्रम दाखवू लागले. तिने तर किंचाळीच फोडली. मग शामभाईनी वेळ न दवडता एक बाटली घेऊन तिला त्यात भरण्याचा प्रयत्न केला; मात्र ती जायला कशीच तयार होईना. या झटपटीत शेवटी नागीण जमिनीवर पडली आणि तिने क्षणार्धात शामभाईंच्या पायाचा चावा घेतला. पण तरीही ते डगमगले नाहीत. नंतर त्यांना ताबडतोब इस्पितळात नेण्यात आले. वेळीच नेल्याने त्यांचा जीव वाचला. त्यांना नेण्यात आणखी थोडा उशीर झाला असला तर कदाचित ते प्राणास मुकले असते असे डॉक्टरांचे म्हणणे होते.

शामभाईंनी त्यांचे बंधू बाबूराव यांच्याबरोबर समान भागीदारीवर कपडे धुण्याचे साबण, गोल्ड फिश सोप, डिटर्जंट पावडर, डिटर्जंट चिप्स अशी साबणावर आधारीत उत्पादने बनवण्यासाठी ५-६ आस्थापने उभी केली. या व्यवसायात बाबूराव यांनी प्रचंड मेहनत घेतली. विविध प्रयोग केले. त्यांच्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी व्यवसायात जबरदस्त उंचीही गाठली. शामभाई जरी या आस्थापनात रस घेत असले तरी सामाजिक कार्य हाच त्यांचा ध्यास होता. त्यासाठी पैसेही खर्च होत. कुणा गरिबाला जेवण दे, कुणाला औषधे दे, हॉस्पिटलच्या सवलती मिळवून दे ही कामे तर शामभाईंची नित्याचीच झाली होती. परंतु या सगळ्याची पुरेपूर जाणीव असतानासुद्धा बाबूरावने त्यांना पैशांबाबत कधीच आडकाठी केली नाही. शामभाई बिनदिक्कत कॅशपेटीमधून हवे तेवढे पैसे काढून घ्यायचे आणि निघून जायचे व गरजवंताला देऊन टाकायचे.

असे हे गोव्याचे महान सुपुत्र ११ मार्च २०२१ रोजी निवर्तले. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गोव्याने शामभाईंच्या रुपाने गोव्याचा एक लखलखता हिरा गमावला आहे.