>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
गोवा सरकारच्या आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा या योजनेमुळे राज्यातील बागायतींचे उत्पन्न हे ४० टक्क्यांनी वाढले आहे तसेच दुग्धोत्पादनातही १० टक्क्यांची तर पुष्पोत्पादनात ६ टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
स्वयंपूर्ण गोवा ही योजना आता पंचायत स्तराबरोबरच आता पालिका स्तरावरही मूळ धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २३ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वयंपूर्ण मित्र तसेच काही पंच, सरपंच व लाभार्थी मिळून एकूण ७ जणांशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधणार आहेत अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. हा कार्यक्रम राज्यातील जास्तीत जास्त लोकांना पाहता यावा म्हणून दर एका तालुक्यात विशेष स्क्रीन बसवून तो लोकांना पाहण्यासाठीची सोय करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
सरकारने १९१ पंचायती व ११ नगरपालिकांमध्ये स्वयंपूर्ण मित्रांची नियुक्ती केली आहे असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
या स्वयंपूर्ण मित्रांमुळे केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून ८६ योजनांचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त लोकांना देता आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी, स्वयंपूर्ण गोवा या योजनेमुळे विविध सरकारी खाती एकत्र येऊन काम करू शकली व उत्पादन वाढीसाठी त्यांचा फायदा झाला अशी माहिती दिली.