‘स्वच्छ भारत’साठी गोव्याची उत्स्फूर्त साथ

0
106
स्वच्छता मोहिमेंतर्गत सचिवालयात साफसफाईची पहाणी करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, करमळी रेल्वे स्थानकावर स्वच्छतेच्या कामात सहभागी झालेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व मडगाव येथे कचरा गोळा करताना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व खासदार शांताराम नाईक.

लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, विद्यार्थ्यांचा साफसफाईसाठी प्रतिसाद
सरकारने राबविलेल्या स्वच्छ गोवा सुंदर गोवा मोहिमेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुतेक सर्व सरकारी कर्मचारी काल सकाळी झाडू घेऊन आपापल्या कार्यालयात हजर झाले. राज्यातील सर्व शाळा विद्यालयांनी स्वच्छतेच्या कार्यक्रमाबरोबरच गांधी विचारांचा प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर विविध कार्यक्रम राबविले.
गांधी जयंती म्हणजे सार्वजनिक सुटी त्यामुळे सरकारी कर्मचारी या सुटीचा उपयोग सहलीसाठी किंवा अन्य कारणासाठी करीत होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्‍या अर्थाने गांधी जयंतीला वेगळे स्वरुप दिले व त्यांच्या आदेशानुसार राज्य सरकारने काढलेल्या स्वच्छतेसंबंधीचा आदेशाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही कर्मचार्‍यांनी बुधवारी संध्याकाळीच स्वच्छतेचे काम हाती घेतले होते.
सर्वच सरकारी कार्यालयातील वेगवेगळ्या फाईल्स धुळीत माखलेल्या अवस्थेत होत्या. अनेकांना धुळीची ‘एलर्जी’ असते त्यामुळे अनेक महिला व पुरुष कर्मचारी, अधिकारी नाकाला रुमाल बांधून कपाटे स्वच्छ करीत असल्याचे दिसून आले. गांधी जयंतीदिनी कार्यालयात कशा पध्दतीने स्वच्छता केली याची माहिती सरकारला देणे सक्तीचे असल्याने कर्मचार्‍यांना या मोहिमेपासून अलिप्त राहणे अशक्य झाले. राज्यातील अनेक बिगर सरकारी संघटनानीही स्वच्छतेचे कार्यक्रम राबविले.
विरोधी कॉंग्रेस पक्षानेही उत्स्फूर्तपणे या मोहिमेत भाग घेऊन कदंब बस स्थानकाचा परिसर स्वच्छ करण्याच्या कामात सहभाग दर्शविला.
‘स्वच्छता दूत’ होण्यासाठी मोदींचे नऊ जणांना निमंत्रण
‘स्वच्छ भारत’ अभियानाचा संदेश देशभर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जणांना ‘स्वच्छता दूत’ होण्याचे निमंत्रण दिले आहे. यात गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा समावेश आहे. अन्य जणांत भारत रत्न सचिन तेंडुलकर, बॉलीवूड कलाकार सलमान खान, प्रियांका चोप्रा, उद्योगपती अनिल अंबानी, कॉंग्रेस खासदार शशी थरूर, योग गरू बाबा रामदेव, अभिनेता कमल हसन तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या गाजणार्‍या मालिकेतील कलाकार चमुचा समावेश आहे. या लोकांनी आणखी नऊ जणांना निमंत्रण द्यावे त्यांनी पुढे ही साखळी वाढवावी, असे मोदींनी म्हटले आहे.