– सौ. माधुरी र. शे. उसगावकर
(फोंडा)
माझ्या जीवनात आलेल्या व्यक्तींपासून हेच शिकायला मिळाले. वाटतं तेवढं जीवन सोपं नाही. तसंच ते कठीणही नाही. निखळ प्रेमाने बर्याच गोष्टीतील गुंता सुटतो. यासाठी नम्रता ही अत्यंत आवश्यक असते. नम्र मनच लवचिक होऊ शकतं.
अलीकडेच दूरदर्शनवर श्री. भिंगीचा नकलांचा कार्यक्रम पाहिला. विविध राजकीय नेते, सिनेनटांच्या वेगवेगळ्या नकला करून दाखविल्या. त्यात माजी मुख्यमंत्र्यांची नक्कल एकदम झक्कास वाटली.
मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. जुन्या स्मृती उचंबळून आल्या. अर्थशास्त्र शिकवणारे सर वर्गात आल्या आल्या टेबलाला मागे रेलून उभे राहायचे. नोंदवहीत डोकं पुनः पुनः घालायचे. एकदा ते वर्गात आले. माझी वर्गसखी हळूच म्हणाली, ‘टेबल लॅॅॅम्प विदाऊट टेबल’. उंची त्यांची फार, डोकं खाली आणि शरीरयष्टी किडकिडीत. ते जवळच बसलेल्या विद्यार्थ्यांना ऐकू आलं. ते पटकन हसले. त्यांचं लक्ष जाताच लगेच म्हणाले ‘सायलेन्स, पीनड्रॉप सायलेन्स’. ते केरळचे कॅथलिक समाजातील होते. त्यामुळे विषय शिकविताना काही काही इंग्रजी शब्दांचे उच्चारण त्यांचे मजेशीर व्हायचे. मग आम्ही खूप हसायचो. आम्ही तसाही कॉलेजमध्ये खूप धिंगाणा घालायचो. आजकालच्या मानाने त्यावेळी मुली कॉलेजमध्ये कमी असायच्या.
आयुष्याच्या वळणावर भेटलेल्या काही व्यक्ती म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळचे स्मृतीपटलच असतात. मी मुख्याध्यापिका असताना एक व्यक्ती माझ्या चांगलीच स्मरणात राहिली. ती म्हणजे सूरजीत (नाव बदलून) काळी सावळी नाकी डोळी नीटस, सूरजीत हा ‘क’ वर्गाचा कर्मचारी असला तरी नेहमी व्यवस्थित नीटनेटके परीटघडीचे कपडे, चमकदार बूट घालून ‘ड्युटी’वर असायचा. कुठं कसं बोलायचं हे संधान त्याला बेमालूम जमायचं. हजरजबाबीपणामुळे तर तो कित्येकांच्या गळ्यातला ताईत बनला. विश्वासास पात्रही ठरला. त्याच्या हजरजबाबीपणात कुठेतरी विनोद दडलेला असे.
एकदा शाळासमुहातील मुख्याध्यापिका ऑफिशिअल कामानिमित्त मला भेटायला आली होती. तिला काही कागदावर हायस्कूलचे स्टॅम्प्स हवे होते. चर्चेनंतर त्या कागदपत्रांवर मी सह्या केल्या व सूरजीतला सह्यांच्या ठिकाणी स्टॅम्प्स मारायला सांगितले.
‘‘कळतं ना तुला स्टॅम्प मारायला’’, मध्येच तिने आवेशाने त्याला विचारले.
‘‘कुठं मारू? कसा मारू?’’, तो अज्ञान पांघरून. वाटलंच… तिच्या विचारण्याचा ढंग पाहून याचं काहीतरी बिनसलं. तिने स्वतःच स्टॅम्पिंग केलं.
‘‘अरे एवढी वर्ष झाली तरी स्टॅम्प मारता येत नाही तुला?’’ – ती
‘‘माझं काम तुमच्यासारखीच करू लागल्यावर मी स्टॅम्प मारायचा प्रश्न येतोच कुठे!’’ निश्चित स्वरात तो. ती दात-ओठ खात फणकार्याने उठून निघून गेली. अज्ञानाचं सोंग पांघरून त्याला फिरकी घेणंही जमत असे. मी नाहीशी पाहून ठरावीक लोकांच्या समूहात त्याच्या गळ्याला कंठ फुटायचा. कधी कधी गुणगुणतानाही मी त्याला ऐकलंय… ‘सांज जाली काय ना त्या तिथे वडाकडे येतात चेडवां वाजयत मंद मंद पांयजणा’ बा.भ. बोरकरांची प्रसिद्ध कविता आहे हे त्याला माहीतही नसेल. इयत्ता ८वी पास झालेला तो, त्याचा वांङ्मयाशी काही संबंधच नव्हता. केवळ विनोदी वातावरण निर्माण करायचं आणि स्वतःच्या आनंदात इतरानांही सामावून घेण्याचा त्याचा कल असायचा. त्यामुळे मी तणावग्रस्त असले तरी त्याच्या अशा वागण्याने तणाव कुठल्याकुठे नाहीसा व्हायचा. नेहमीच त्याला माझ्याबद्दल आदरयुक्त भीती असायची हे वेळोवेळी मला जाणवत होते.
एकदा स्कूल इन्स्पेक्टर आले होते. सूरजीतला पाहुण्यांना चहा देण्यास सांगितले. चहापान झालं. इन्स्पेक्टर गेले. ते गेल्यानंतर त्याने मला विचारले ‘‘मॅडम् कसली चित्रा?’’
‘‘मला काय माहीत?’’, इति मी
‘‘तुम्ही म्हणाला ना की चित्रातून चहा पाहुण्यांना दे’’
अरे चित्रातून नव्हे चिक्रातून (कप)- माझं समजावून सांगणं. त्याने माझ्या टेबलावर हळूच एक चित्र काढलेला कागद ठेवला. सूरजीत चहाचा ट्रे घेऊन येत आहे आणि पाहुण्यासमोर ठेवतो, असं ते चित्र होतं. आता हसू नको तर काय करू? अधूनमधून कल पाहून तो आपले विनोदी फासे चपखलपणे टाकण्यात तरबेज होता.
सूरजीतचं शिक्षण जेमतेम आठवीपर्यंत. पण ‘क’ वर्गातील कर्मचार्यात त्यालाच कॉम्प्युटर ज्ञान होते. दहावीपूर्वी मराठी पण तो बिनचूक टाइप करायचा. पत्रकं काढण्यात मदत करायचा.
विद्यालयात पूजा, प्रदर्शन, स्नेहसंमेलन कुठलाही कार्यक्रम असो, सजावटीत सूरजीतचं योगदान लय भारी. सजावटीत त्याच्या काल्पनिक कोषांतून नवनिर्मिती व्हायची. विनोद आणि थोडा खट्याळपणा याचे त्याच्या स्वभावात मजेदार मिश्रण झाले होते. गंभीर विषय जरी असला तरी त्याला विनोदी वळण द्यायचे, हा त्याचा स्थायीभाव होता. अशी ही हरहुन्नरी व्यक्ती दुर्देवाने अल्पायुषी ठरली. एकाएकी त्याच्या कायमच्या जाण्याने विद्यालयात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली.
कडू-गोड आठवणी साठवून जीवन कालक्रमण करीत असतं. आमच्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एकदम गंभीर मुद्रेचे होते. त्यांच्या नाकावरची माशी हलणे मुश्कील. गणित विषयाचे ते शिक्षक. विषयाप्रमाणेच त्यांचं बोलणं कसं गणिती होतं, जेवढ्यास तेवढं. काही तडकाफडकीचं काम असलं तर लगेच नोटीस काढून शिक्षकांच्या सह्या घेऊन मोकळे. वायफळ संभाषण टाळत असत.
एकदा सुट्टीविषयी मी पृच्छा केली. मला एका दिवसाची रजा पाहिजे होती. ‘तुला परवा नववीला क्लास आहे. तेव्हा उद्या तू रजा…….’ पुढचे शब्द त्यांच्या तोंडातच घुमत राहिले. पण त्यातून होकारार्थ निघाला हे मी समजले. अशी अगांतुक बोलण्याची त्यांची लकब होती. सवयीनुसार आम्ही त्यांच्या बोलण्याचा योग्य अचूक मथितार्थ काढत असू.
एक प्रसंग आठवला. माझ्या सहकारीने मस्टररोलवर दुसर्या शिक्षकाच्या चौकटीत सही केली हे माजी मुख्याध्यापकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला बोलावलं आणि विचारलं, ‘‘ही सायन् तुझी न्ही?’’
‘‘हय सर’’ ती उत्तरली.
‘‘ख्खी……मारता तू? दिसता न्ही….’’
तिने होकारार्थी मान हलवली.
‘‘मागीर… लक्ष तुजे ख्खी… आसता, कळना माका’’, त्यांच्या भाषेत स्वरमाधुर्य कधी नव्हतेच.
गावागावांतील बोलीभाषेचे उच्चारण वेगळे असते. ते कुडतरी गांवचे. कुडतरी बोलीभाषेचा अस्सल हेल काढून बोलताना ऐकले म्हणजे माझ्याकडून नकळत त्यांची नकल होत असे. इतरही नकलेचा मनमुराद आस्वाद घेत असत. कधी कधी मधल्या सुट्टीत त्यांचा विषय निघायचा.
आमच्या स्टाफमधील सहकारीही त्यांची लकब साधण्याचा प्रयत्न करीत असत. शेवटी त्यांच्या आवाजात बोलणं नेमकं माझ्यावरच येऊन टपकायचं. आणि नंतर मी अगदी त्यांच्या आवाजात हेल काढून आविर्भावासह सादरीकरण करायची. त्यावेळी स्टाफची हसता हसता पुरेवाट व्हायची. हसताना त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून मला सरांची नक्कल तंतोतंत जमल्याची पावती मिळायची.
सरांच्या निरोपसमारंभाचा दिवस उजाडला. बोंडला अभयारण्यात त्या दिवशी ते सपत्नीक हजर होते. हायस्कूलचे कर्मचारी हिरीरिने आपापली कामे बजावीत होते. सुंदर अशा नैसर्गिक वातावरणात कार्यक्रम संपन्न होत होता. शिक्षण वर्गानी मनोगते व्यक्त केली. एका शिक्षिकेने सुरेल आवाजात दर्दभरे गीत गायले. वातावरणात गांभीर्य आलं. काही भावनिक झाले. एवढ्यात सरांची पत्नी, आम्ही वहिनीच म्हणायचो, त्यांनी मला चक्क सरांची नक्कल करण्याची कळकळीची विनंती केली. त्याला स्टाफचा दुजोरा मिळाला. मी सरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आब आणायची. हळूच मी आदरयुक्त भीतीने सरांकडे पाहिले. सरांच्या हास्यातून मंजुरी मिळाली. बायकोची फर्माईश होती ती. सिंह असला म्हणून काय झालं! त्याला सिंहिणीच्या धाकात कधी कधी रहावंच लागतं.
मीही उत्सुक झाले. लगेच आढेवेढे न घेता त्यांची बोलण्याची ढब, चालण्याची लकब व मुद्रेवरील प्रसंगानुरूप भावरंग अगदी सहजतेने वठविला. मला जास्त प्रयास करण्याची आवश्यकता वाटली नाही. मी घटना, प्रसंग अभिव्यक्त केले आणि बाकीचे अनुभूती घेत होते. त्यांची नक्कल हुबेहूब सादर होत आहे हेे मला सर्वांच्या चेहर्यावरून जाणवत होते. सगळ्यांबरोबर सरांना पहिल्यांदाच दिलखुलास मनसोक्त हसताना पाहिलं. मी कृतकृत्य झाले. वहिनीतर किती वेळ हसतच होत्या. एका गंभीर व्यक्तीला दिलखुलास हसताना पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. पूर्वानुभव, धास्ती त्यांच्या मनसोक्त हसण्याने निपटून काढली.
आयुष्याच्या उतरणीवर अशा व्यक्तीच्या स्मृतींचे पापुद्रे अलगद उलगडत जातात. मनातील सुप्त ऊर्जा शोधून काढणे म्हणजेच आपणच आपल्याला शोधून काढण्यासारखे आहे. व्यक्तिविशेष सुखदुखाःचे धागे निर्माण करतात.
आनंदी कसे रहावे ही एक कला आहे आणि ती कला विकसित करणे हा एक ध्यास आहे. मन जर उत्साही असेल तर तो क्षण सेलिब्रेट करण्यात अर्थ आहे. यासाठी तुमचा मूड कसा आहे याला फार महत्त्व आहे.
माझ्या जीवनात आलेल्या व्यक्तींपासून हेच शिकायला मिळाले. वाटतं तेवढं जीवन सोपं नाही. तसंच ते कठीणही नाही. निखळ प्रेमाने बर्याच गोष्टीतील गुंता सुटतो. यासाठी नम्रता ही अत्यंत आवश्यक असते. नम्र मनच लवचिक होऊ शकतं.
माणसांच्या सवयी, लकबी न्याहाळण्यात माझं मन मनस्वी रमतं. असेल ती माझी जन्मजात आवड. नक्कल किंवा लकब सादर करताना त्या व्यक्तीला जाच होणार नाही याची सावधानता मी पाळते. मन दुखावत असेल तर मी म्हणेन व्यक्तीचा अभिनय करूच नये. आनंदनिर्मिती होण्याऐवजी मन कलुषित होण्याचीच शक्यता असते.