
>> देशातील पहिला स्मार्ट – ग्रीन महामार्ग
दिल्लीला मेरठशी जोडणार्या दिल्ली – मेरठ एक्सप्रेस वेचे आणि उत्तर प्रदेशच्या बागपत येथील ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवे (ईपीई)चे उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ईपीई देशातील पहिला स्मार्ट आणि सौरऊर्जायुक्त महामार्ग असून १३५ किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या निर्मितीसाठी ११ हजार कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी ६ कि. मी. पर्यंत रोड शोही केला.
मोदींच्या रोड शोला मोठा प्रतिसाद लाभला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने उपस्थित असलेले लोक मोदींना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. मोदींनी अनेकांचे हात हातात घेऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. दिल्लीतील तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असतानाही लोकांची प्रचंड गर्दी होती.
दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवे ९६ किलोमीटर लांब असून त्यामुळे अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत दिल्ली ते मेरठ प्रवास करता येणार आहे. हा महामार्ग ६ पदरी असून त्याच्या दोन्ही बाजूंना २.५ मीटर रुंद असे सायकलिंग ट्रॅक आहे. तसेच पदपथासाठी १.५ मीटर रुंद ट्रॅक आहे. ‘ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवे’चे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी कॉंग्रेसवर तोफ डागली. सर्जिकल स्ट्राईक्स करणार्या देशाच्या सेनेने दाखवलेल्या साहसाला हे लोक नाकारतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय एजन्सीज भारताचे कौतुक करतात तेव्हा हे लोक त्यांच्याही मागे दांडके घेऊन मागे लागतात. त्यामुळे एका कुटुंबाची पुजा करणारे, कधी लोकशाहीची पुजा करू शकत नाहीत अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसचा समाचार घेतला.