स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली कामे निकृष्ट ः बाबूश

0
12

राजधानी पणजी महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या सुरू असलेली विकासकामे नित्कृष्ट दर्जाची आहेत, अशी टीका काल महसूलमंत्री, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना येथे केली.
मंत्री मोन्सेरात गेले कित्येक दिवस पणजी स्मार्ट सिटीमध्ये सुरू असलेल्या कामांबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. तथापि, आता, मंत्री मोन्सेरात स्मार्ट सिटीतील कामांबाबत आक्रमक बनले आहेत.
पणजीतील स्मार्ट सिटीतील विविध कामांत आपण हस्तक्षेप करणार नाही. कारण, स्मार्ट सिटीच्या कामांसाठी सल्लागार जबाबदार असून एका सल्लागाराला सुमारे 8 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

एवढी मोठी रक्कम खर्च केल्यानंतर नागरिकांना त्रास होता कामा नये, असेही मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीच्या कामांसाठी सल्लागार नियुक्ती किमान पीडब्ल्यूडीअंतर्गत असायला हवी होती, असे मंत्री मोन्सेरात यांनी म्हटले आहे. पणजीत या पावसाळ्यात पूर येणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांच्या आश्वासनाबद्दल विचारले असता बाबूश म्हणाले की मुख्यमंत्र्यांचे विधान त्यांना देण्यात आलेल्या माहितीवर आधारित आहे.

पणजीत पूरस्थिती निर्माण झाल्यास कंत्राटदार आणि अभियंत्यांना जबाबदार धरले पाहिजे. स्मार्ट सिटीअंतर्गत विविध खात्याकडून कामे सुरू आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर कामे बंद करण्यात आलेली नाहीत, असे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.

मोन्सेरात यांनी राजीनामा द्यावा ः उत्पल
पणजीवासीयांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा पणजीचे आमदार, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आपल्या जबाबदारीपासून दूर जात आहेत, अशी टीका उत्पल पर्रीकर यांनी काल केली. स्मार्ट सिटीतील कामाबाबत कित्येक महिन्यांपासून आवाज उठवला जात आहे. स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेल्या भागात आत्तापर्यंत पंधराच्या आसपास वाहने रुतून पडण्याचे प्रकार घडलेले आहेत, असेही पर्रीकर यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीची कामे नित्कृष्ट दर्जाची केली जात असल्याची टीका केली जात असताना मंत्री मोन्सेरात मूग गिळून गप्प बसले होते. आता, वेट ॲण्ड वॉच अशी भूमिका घेणाऱ्या मंत्री मोन्सेरात यांनी मंत्रिपद, आमदारकीचा राजीनामा देऊन घरी जाऊन बसावे आणि वेट ॲण्ड वॉच करावे, असा टोला उत्पल पर्रीकर यांनी हाणला.