स्मरणशक्तीवर प्रभावी होमिओपॅथी

0
62
  • डॉ. आरती दिनकर
    होमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशक पणजी

आजकाल तरुण मुलामुलींचीच नव्हे तर लहान मुलांचीही स्मरणशक्ती कमी झालेली आढळते. तरुण मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते कारण अतिमद्यपान, तंबाखूचे अतिसेवन, सिगरेटचे व्यसन, गांजा, अफू अशा मादक पदार्थांचे सेवन करणे तसेच सतत मोबाईलचा वापर करणे.

एक जोडपं आपल्या पंधरा वर्षीय मुलाला घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये आले. या मुलाचे नाव वेद. वेदला मी काही प्रश्‍न विचारले, तेव्हा लक्षात आले की त्याची स्मरणशक्ती कमी झाली होती. अभ्यास केलेला लक्षात राहत नसे, चार- पाचवेळा जरी पुस्तकातील एखादे प्रकरण वाचले तरी काही केल्या लक्षात राहत नसे. लिहिताना गडबड करायचा, शब्द विसरून जायचा. परिणामी खूप चुका व्हायच्या. तो साधा सरळ व्यवहारसुद्धा करू शकत नसे, त्यामुळे पंधरा वर्षांचा होता तरी अजून सातवीतच शिकत होता. त्याला आत्मविश्वास असा नव्हताच. त्याची मानसिक शक्ती क्षीण झालेली आढळली. पण खाण्यापिण्यामध्ये मात्र काहीच कमी आढळले नाही. भूक व्यवस्थित लागत होती. वेदला केबिनच्या बाहेर थांबायला सांगितले आणि त्याच्या आईवडिलांना आत थांबवून आवश्यक ते प्रश्‍न विचारले. वेदचा स्वभाव कसा आहे? त्याची तुमच्याशी वागणूक कशी आहे? मित्रांशी कशी आहे? त्याच्या आवडी-निवडी वगैरे प्रश्‍न विचारून त्यांना बाहेर बसण्यास सांगितले व नंतर वेदला केबिनमध्ये बोलावून त्यालाही काही प्रश्‍न विचारले- ‘तू काही ड्रग्ज वगैरे घेतोस का? खरं सांग’. तो म्हणाला ‘नाही. हे मला फक्त ऐकून माहीत आहे’. अभ्यासाविषयी, मित्रांविषयी, आईवडिलांव्यतिरिक्त घरात राहणारे त्याचे बहीण-भाऊ यांच्याविषयी याचे संबंध कसे आहेत विचारले. यावरून त्याच्या स्वभावाची, स्वभाव वैशिष्ट्यांची थोडीफार कल्पना आली. शारीरिक त्रास कुठलाही दिसला नाही. फक्त कधी-कधी डोके दुखते एवढेच. त्याला पंधरा दिवसांचे औषध दिले व पंधरा दिवसानंतर परत भेटण्यास सांगितले. अर्थात आईवडिलांनी बरोबर यावे असे सुचवले.

पंधरा दिवसांनी त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की त्यांना वेदच्या स्वभावात थोडा फरक आढळला. जेव्हा मी वेदला विचारले की, तुला हे औषध घेतल्यानंतर काही जाणवले का?- यावर वेद म्हणाला, ‘मला काहीच फरक आढळला नाही’. यावरून मी काय समजायचे ते समजले. औषधांची मात्रा वाढवली. १५-१५ दिवसांनी येऊन तो व त्याचे आईवडील त्याच्या स्वभावात, आवडीनिवडीत, त्याच्या अभ्यासामध्ये होणारी एकाग्रता, स्मरणशक्ती यात झालेला फरक येऊन सांगत होते, त्यानुसार मी औषधयोजना व मात्रा देत होते.

वेदला कौन्सिलिंगची म्हणजेच समुपदेशनाचीही गरज होतीच. त्याप्रमाणे त्याला समुपदेशन व काही सल्ले, मनाचे व्यायाम आणि बरोबरीने होमिओपॅथीचे औषध दिले. यामुळे वेदच्या स्मरणशक्तीमध्ये खूप चांगला फरक जाणवला. त्याला अभ्यासाला बसले की आळस यायचा, हा त्याचा आळशीपणा कमी झाला. तोच म्हणाला की, मला आता फ्रेश वाटते आहे. यानंतर साधारण आठ महिन्यांनी त्याची ट्रीटमेंट बंद केली व त्यानंतरसुद्धा मी पंधरा पंधरा दिवसांनी त्याला दोनदा बोलावले. त्याला फक्त सल्ला देत गेले त्यानुसार त्याच्या मानसिक तक्रारी कमी झालेल्या आढळल्या व स्मरणशक्तीत सुधारणा झाली. परीक्षेमध्ये तो नापास होत होता तो आता पास झाला. त्याच्या आईवडिलांनी सांगितले की त्याच्यामध्ये, त्याच्या वागण्या-बोलण्यात व स्वभावात खूप चांगला बदल झाला आहे. होमिओपॅथीमध्ये यासाठी निरनिराळी अनेक औषधे आहेत ती त्या त्या लक्षणानुसार देता येतात.
हा रोग बहुधा म्हातारपणात होतो पण आजकाल तरुण मुला-मुलींना एवढेच काय लहान मुलांनाही झालेला आढळतो. तरुण मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते कारण अतिमद्यपान, तंबाखूचे अतिसेवन, सिगरेटचे व्यसन, गांजा, अफू अशा मादक पदार्थांचे सेवन करणे तसेच सतत मोबाईलचा वापर करणे किंवा लहान मुलं सारखे टीव्ही बघतात यामुळे अभ्यासातील एकाग्रता कमी होते. आत्यंतिक मन:क्षोभ, झळ लागणे, मेंदूचे रोग (रक्तस्राव) वगैरे, हृदयाचे रोग, लकवा, फिट येणे, मेंदूतील ग्रंथी इत्यादी कारणांनीही हा रोग होतो. आनुवंशिक प्रवृत्ती हे या रोगाचे महत्त्वाचे कारण बर्‍याचवेळा असते.

बर्‍याचदा अनेकांना परीक्षेला जाताना, इंटरव्ह्यूला जाताना एक प्रकारची भीती वाटते. त्यांची स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे ते मिळणारे यश हरवून बसतात. जीवनद्रव्याची हानी झाल्यामुळे रोग्यास मानसिक अशक्तता आलेली असते. चारचौघांत बोलण्याची, चारचौघांत मिसळण्याची या लोकांना भीती वाटते, स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. मानसिक असहिष्णुता असते. यामुळे रोगी निराश,ं उदासीन, भावनाशून्य, अबोल किंवा मितभाषी असतो. त्याला जीवनाचे आकर्षण वाटत नाही. कोणतेही काम करण्याचा उत्साह नसतो. कामात लक्ष लागत नाही. शारीरिक तसेच मानसिक श्रम करावेसे वाटत नाहीत. डोक्यात अनेक विचार येतात त्यामुळे झोप लागत नाही. ज्या गोष्टींचा त्याच्याशी संबंध नाही अशा गोष्टींविषयी टेन्शन घेतो. अशातूनच अखेर आत्महत्येचे विचार मनात येतात पण मानसिक दुर्बलतेमुळे तो आत्महत्या करण्याचे टाळतो. (अर्थात आत्महत्येचा आणखी खोल विषय आहे) सतत गोंधळलेला, अतिशय उतावीळ, अविचारी असतो. निर्णयशक्तीचा अभाव असतो. ज्ञानेन्द्रिय बधीर झालेले असतात. बर्‍याचदा शरीराचा थरकाप होतो. मनाची चलबिचल वाढते. या सगळ्या लक्षणांवर होमिओपॅथीच्या औषधांनी चांगले कार्य केले आहे.