स्पोर्टिंग-गोवन एफसी लढत बरोबरीत

0
101

नवख्या गोवन फुटबॉल क्लबने धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्पोर्टिंग क्लब दी गोवाला १-१ बरोबरी रोखत गोवा फुटबॉल संघटना आयोजित प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत प्रत्येकी एक गुण विभागून घेतला.

याझिर मोहम्मदने नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर १३व्याच मिनिटाला गोवन एफसीने आपले खाते खोलले होते. तर दुसर्‍या सत्राच्या प्रारंभचीच ४६व्या मिनिटाला व्हिक्टोरिनो फर्नांडिसने स्पोर्टिंग क्लब दी गोवाला १ -१ अशी बरोबरी साधून दिली होती.
सामन्याच्या सुरुवातीलाच १३व्या मिनिटाला गोवन एफसी संघाने आपले खाते खोलण्यात यश मिळविले. यासिम मोहम्मदने डी कक्षेत चेंडूवर नियंत्रण मिळवित स्पोर्टिंगचा गोलरक्षक ओझेनला चकविले व चेंडूला जाळीची दिशा दाखवित संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. इंज्युरी वेळेत गोवन एफसीने आपला दुसरा गोल नोेंदविला होता. परंतु लिस्टन कुलासोने घेतलेल्या कॉर्नवरील आरेन डिसिल्वाने नोंदविलेला हा गोल रेफ्री परमानंद मांद्रेकरने बाद ठरविला.

दुसर्‍या सत्राच्या प्रारंभीच स्पोर्टिंग क्लब दी गोवाने बरोबरी साधली. कॅजेटन फर्नांडिसने ३० यार्डावरून घेतलेल्या फ्रीकिकवरील चेंडू गोवन एफसीचा गोलरक्षक इप्रोतिप अचूकपणे थोपवू शकला नाही आणि त्याच संधीचा फायदा उठवित व्हिक्टोरिनोने जोरकस फटक्याद्वारे गोएन एफसीच्या गोलपोस्टची जाळी भेदली. ५२व्या मिनिटाला ग्लॅन मार्टिन्सने प्रिन्सटन रिबेलोला धोकादायकरित्या रोखण्याचा प्रयत्न केल्याने रेफ्रीने दुसरे यलो कार्ड दाखवित मैदानाबाहेर काढल्याने स्पोर्टिंगला उर्वरित सामन्यात १० खेळाडूंनिशी खेळावे लागले.
आज या स्पर्धेत धेंपो स्पोटर्‌‌स क्लब आणि वास्को स्पोटर्‌‌स क्लब यांच्यात सायं. ४ वा. धुळेर मैदानावर सामना होणार आहे.