स्पोर्टिंग-ऐझवाल लढत गोलशून्य

0
79

पाहुण्या स्पोर्टिंग क्लब दी गोवाने हिरो फेडरेशन कप स्पर्धेच्या फर्स्ट लेग उपांत्य लढतीत यजमान ऐझवाल एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले. लवडे एनयिनाया आणि सुभाशिश बोस यांनी अभेद्य बचावात ऐझवालच्या जोएल संडे आणि कंपनीला समर्थपणे रोखले. विशेष म्हणजे स्पोर्टिंगने स्पर्धेतील सलग पाचव्या सामन्यात गोल स्वीकारला नाही.

पूर्वार्धात स्पोर्टिंगने बव्हंशी नियंत्रण राखले होते पण ऐझवालचा बचाव भेधण्यात त्याना यश आले नाही. पहिल्याच मिनिटाला स्पोर्टिंगला संधी मिळाली पण महमूदच्या पासनंतर निकोलस फर्नांडिसचा लेफ्टफूटर फटका गोलवरून गेला. पाचव्या मिनिटाला ऐझवालला संधी मिळाली पण जोएल संडेचा फटका गोलरक्षक अरिंदमने सतर्कपणे डावीकडे ढकलत संकट टाळले. उभय संघानी जोखीम न पत्करण्याकडे कल ठेवल्याने नंतर खेळ मधल्याफळीतच झाला.
उत्तरार्धात यजमानानी आक्रमक पवित्रा अवलंबिला आणि ५२व्या मिनिटाला गोलसंधी मिळाली पण कर्णधार डेविड लालरिनमौनाच्या फ्रीकिकवरील नायजेरियन इमानुएलची हेडर बाहेर गेली. स्पोर्टिंगच्या पासीने ३० यार्डवरून हाणलेला फटका थेट गोलरक्षकाच्या हाती गेला. चुकवुमा आणि व्हिक्टोरिना फर्नांडिसचेही प्रयत्नही निष्फळ ठरले. अखेरच्या सत्रात ऐझवालला नामी संधी मिळाली होती पण कर्णधार डेविडने १८ यार्डवरून हाणलेला फटका गोलरक्षक अरिंदमने सतकर्ंपणे थोपविला. उभयतांमधील सेकंड लेग उपांत्य सामना येत्या दि. १५ रोजी गोव्यात होईल.