स्पोर्टिंग क्लब दी गोवाने काल मंगळवारी गुणतक्त्यात अव्वल स्थानावर पोहोचण्याची संधी दवडली. गोवा प्रो लीग स्पर्धेतील धुळेर मैदानावर झालेल्या या सामन्यात वास्को स्पोटर्स क्लबविरुद्ध त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. स्पोर्टिंगला त्यांचा आघाडीचा खेळाडू मार्कुस मास्कारेन्हास व विदेशी खेळाडू फिलिप यांच्यविना उतरावे लागले. त्यामुळे प्रशिक्षकांनी २० वर्षांखालील खेळाडू स्टेन्डली फर्नांडिस व शेनन व्हिएगस यांचा समावेश केला.
स्पोर्टिंग क्लब दी गोवा व वास्को एससी यांनी संथ खेळ करताना गोल नोंदविण्याचे फार कमी प्रयत्न केले. स्पोर्टिंगचे प्रशिक्षक सावियो यांनी काही वेळातच शेनन याला बाहेर बसवून अकेराज मार्टिन्सला उतरवत अचंबित केले. परंतु, त्यांच्या या निर्णयाचा काडीमात्र फायदा संघाला झाला नाही. पहिल्या ४५ मिनिटांत स्पोर्टिंगला केवळ एक संधी मिळाली. जॉर्जची फ्री किक वास्कोच्या गोलरक्षकाने ढकलल्यानंतर चेंडूवर ताबा मिळवूनही स्टेन्डलीचा फटका दिशाहीन ठरला. स्पोर्टिंगला आपल्या खेळामध्ये वैविध्यता दाखवता आली नाही तर वास्कोने बचावात्मक खेळावर समाधान मानले.
दुसर्या सत्रात स्पोर्टिंगला कॉर्नरवर चांगली संधी मिळाली होती. परंतु, पीटर कार्व्हालोला जॉर्जच्या फ्लॅग किकला योग्य दिशा दाखवता आली नाही.
नागोवा मैदानावर साळगावकर एफसीने गार्डियन एन्जल एससीला ४-० असे पराजित केले. स्टीफन सतरकर याने दोन तर सेल्विन मिरांडा व फेझर गोम्स यांनी प्रत्येकी एक गोल केला.