स्पेनचा नायजर संघावर गोलांचा चौकार

0
182

सलामीच्या लढतीत ब्राझिलकडून पराभूत झाल्यानंतर स्पेनने काल मंगळवारी झालेल्या फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेतील ‘ड’ गटातील सामन्यात विशाल विजय साकारताना नायजर संघाचा ४-० असा पाडाव केला. या विजयासह स्पेन संघाचे ३ गुण झाले आहेत.

नायजरविरुद्धच्या सामन्यात स्पेन संघ सुरुवातीपासून आक्रमण करेल अशी अपेक्षा होती. परंतु, स्पेनने वातावरणाशी व परिस्थितीशी जुळवून घेण्यास काही वेळ घेतला. चेंडूवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी केवळ चेंडू न्याहाळण्यात धन्यता मानलेल्या नायजरच्या बचावफळीतील विस्कळितपणाचा फायदा उठवून आबेल रुईझ याने २१व्या मिनिटाला स्पेनचा पहिला गोल केला. बार्सिलोनाच्या या युवा खेळाडूला सलग दुसरा गोल नोंदविण्याची नामी संधी होती. परंतु, फ्री किकचा फटका धोडक्यात चुकल्याने त्याची मेहनत वाया गेली. नायजरच्या बचावफळीने काही फटके परतवून लावल्यानंतर ४१व्या मिनिटाला रुईझ याने मैदानी चपळतेेचे दर्शन घडवून स्पेनची आघाडी दुप्पट केली. मध्यंतरापर्यंत स्पेनचा संघ २-० असा आघाडीवर होता. पहिल्या सत्रात नायजरच्या आघाडीपटूंनी थोडीफार धडपड केली. परंतु, दुसर्‍या सत्रात त्यांची डाळ शिजली नाही. या सत्रात नायजरचा गोलरक्षक खालेद लवाली व स्पेनच्या आघाडीपटूंमधील तुल्यबळ झुंज पहायला मिळाली. सीझर गेलबर्ट याने स्पेनचा तिसरा (४५+१) तर सर्जियो गोमेझन (८२ वे मिनिट) चौथा गोल लगावला.