दिवाळी अंक प्रकाशन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे गौरवोद्गार
दैनिक नवप्रभा हे एक विश्वसनीय दैनिक असून आजच्या स्पर्धेच्या युगातही त्याने आपली ही विश्वासार्हता कायम राखली आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दैनिक नवप्रभाच्या 2023 च्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन करताना काढले. श्री. नाईक यांच्या हस्ते नवप्रभा दीपावली अंकाचे पाटो – पणजी येथील पर्यटन भवनात प्रकाशन करण्यात आले. दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, नवहिंद प्रकाशनसमूहाचे वरिष्ठ सरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर यांची यावेळी उपस्थिती होती.
दैनिक नवप्रभा कोणतीही बातमी प्रसिद्ध करताना तिची पूर्ण खातरजमा करून आणि कुठल्याही प्रकारची सरमिसळ न करता तारतम्य राखूनच प्रसिद्ध करते, त्यामुळेच वाचकांचा ह्या दैनिकावर विश्वास आहे, असे श्री. नाईक पुढे म्हणाले. ह्या निःपक्षपातीपणामुळे व विश्वासार्हतेमुळेच रोज सकाळी आपल्या समोर आणल्या जाणाऱ्या गोव्यातील आठ – दहा दैनिकांमधून प्राधान्यक्रमाने दैनिक नवप्रभाकडे सहज प्रथम हात जातो, असेही श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.