स्नेह जपूया…

0
22
  • पौर्णिमा केरकर

सूर्याचा मकर राशीतील प्रवेश हा अनेक दृष्टीने शुभ मानला जातो. या दिवशी समुद्रस्नान, त्याचबरोबर नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करणे पुण्यवान मानले जाते. जप, तप, दान इत्यादीला प्राधान्य दिले जाते. या दिवशी दिलेले दान सत्पात्री लागते म्हणून ही हळदीकुंकवाची परंपरा सुरू झाली.

मार्गशीर्षाची चाहूल लागते ती वातावरणातील गारवा अनुभवूनच. अलीकडे कुडकुड्याची थंडी पडत नाही. सृष्टीचे ऋतुचक्रच बदललेले दिसते. सध्या आहे ऋतू हिवाळ्याचा. दिवस मात्र वाटतात पावसाळ्याचे, तर वातावरणात जाणवते गर्मी. अशा जरी घडामोडी घडत असल्या तरी या छोट्या प्रदेशाला सण-उत्सवांची मोठी असोशी.

मार्गशीर्ष हा विविध गंधांचा, मोहोरांचा ऋतू. याच मासात आंब्या-फणसाला मोहोर येतो. वातावरणात प्रसन्न नितळता भरून राहिलेली असते. या पार्श्वभूमीवर गावागावांतील कालो, जत्रा संपून ‘धालो’ची लगबग सुरू झालेली असते. मालनी पुनवेच्या आगेमागे गावागावांतील महिला ‘धालो’च्या मांडावर आपल्या सख्यांसोबतीने जमू लागतात. आणि जाणवते, की पौष मास सुरू झालेला आहे. ऋतू एकमेकांच्या हातात हात गुंफूनच येत असतात. सण-उत्सवांची गुंफण ही तशीच असते. ‘धालो’ आणि ‘हळदीकुंकू’ हे दोन्हीही स्त्रियांशी निगडीत असलेले. एकात नृत्य-नाट्य-काव्य-अभिनयाची अभिव्यक्ती तर दुसरा संवादाची, एकमेकींना जवळून अनुभवण्याची संधी देत नात्यांचे अनुबंध अधिक घट्ट करण्याचे सामर्थ्य असलेला सण. वर्षे सरतात, त्यात प्रवाहाप्रमाणे बदल जाणवतो, त्याचप्रमाणे सण-उत्सवांतही बदल होताना दिसतो. आपली समाजव्यवस्था पुरुषप्रधान संस्कृतीला प्राधान्य देणारी. या व्यवस्थेने स्त्री-पुरुषांचे कार्यक्षेत्र मर्यादित करून तिला घर- संसार- मुलाबाळांची जबाबदारी दिली. तिने आयुष्यभर गोतावळा जपला; जपत आहे. पती, मुले, घरातील इतर माणसे यांचे करता करता तिचे आयुष्य सरून जायचे. तिच्या स्वतःच्या हौसामौजा असतात, तिलाही बाहेर जावेसे वाटू शकते. चारचौघांत मिळून मिसळून ती मन मोकळे करू शकते असा विचार कधी कोणाच्या मनात अभावानेच आला असेल.

पौष मासात ती तशी बाहेरच्या कष्टाच्या कामातून मोकळीच झालेली असायची. हळदीकुंकूच्या निमित्ताने एकत्रित येऊन परस्परांच्या सुख-दुःखाची देवाण-घेवाण व्हायची. आणि हेच या सणामागचे मोठे उद्दिष्ट. हळदीकुंकवाची सुरुवात कशी झाली? ती कोणी केली? हे नाही सांगता येणार. मात्र हळद आणि कुंकू यांचे पावित्र्य आपल्या संस्कृतीने पूर्वापार जतन केलेले आहे. अलीकडच्या काळात तर हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात, सजून-धजून, प्रसंगी श्रीमंतीचे प्रदर्शन करून साजरा केला जात आहे. सूर्याचा मकर राशीतील प्रवेश आणि माघ मासाची सुरुवात अशी दुहेरी किनार या सणाला आहे. पोंगल, संक्रांती, तील संक्रांती, उत्तरायण, माघी, भोगाली बिहू, पौष संक्रांती अशा नावांनी भारताच्या विविध राज्यांत प्रसिद्ध असलेला हा सण गोवा-महाराष्ट्रात महिलांच्या हळदीकुंकूसाठी प्रसिद्ध आहे.
सूर्याचा मकर राशीतील प्रवेश हा अनेक दृष्टीने शुभ मानला जातो. या दिवशी समुद्रस्नान, त्याचबरोबर नद्यांच्या पवित्र संगमावर स्नान करणे पुण्यवान मानले जाते. जप, तप, दान इत्यादीला प्राधान्य दिले जाते. या दिवशी दिलेले दान सत्पात्री लागते म्हणून ही हळदीकुंकवाची परंपरा सुरू झाली असावी. या दिवसात इतर कोणती कामं हातात घेतली जात नाहीत. मालून महिन्यात शुभकार्याची सुरुवात केली जात नाही, लग्नाची बोलणी केली जात नाहीत. म्हणून हा महिना खास करून महिलावर्गाला आरामदायी असाच असतो. हळदीकुंकवाच्या निमित्ताने घरातून बाहेर पडून एकमेकींशी सुसंवाद साधला जातो. स्नेह जतन करण्यासाठी तीळ-गुळाची चव जिभेवर रेंगाळती ठेवत एकमेकींना वस्तुरूपी दान दिले जाते.

मकर संक्रांतीचा सण शिशिर ऋतूत येतो. पूर्वी या दिवसात कडाक्याची थंडी पडायची. तीळ आणि गूळ देऊन स्नेह वृद्धिंगत करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. तिळात स्निग्धता असल्याने त्याच्या सेवनाने शरीर लवचीक आणि हाडांना बळकटी प्राप्त होते. गुळाच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी चांगले याची जाणीव लोकमानसाला होती. आज मात्र हे चित्र बदलले आहे. हा झालेला बदल आमूलाग्र आहे. तीळ आणि गूळ यांच्याऐवजी साखरेचा पाक तीळ म्हणून वाटला जातो. आपल्या पूर्वजांनी अंधश्रद्धा म्हणून सण-उत्सवांची परंपरा सुरू केली नव्हती, तर त्यामागे त्यांची अशी खास विचारधारा होती. आता याच परंपरा पैसा, प्रतिष्ठा, मोठेपणा मिरविण्यासाठी आहेत, या विचाराने प्रेरित होत आहेत. मकर संक्रांतीच्या दिवसात जर दान दिले तर ते सत्पात्री लागते या समजातून ‘वायन’ म्हणजेच भेटवस्तू देण्या-घेण्याचे व्यवहार सुरू झाले. वस्तू माझी चांगली उंची की शेजारणीची? या स्पर्धांमधून आता तर चक्क हळदीकुंकवाच्या निमित्ताने बुफे लावले जातात. मकर संक्रांतीचा उत्सव हा सूर्याशी निगडीत आहे. आज जर या सणाचे आधुनिकीकरण करायचे असेल तर मग सौर ऊर्जेविषयीची जागृती त्यानिमित्ताने करता येते. ‘वायन’ म्हणून प्लास्टिकच्या छोट्या-छोट्या वस्तू देण्यात येतात, त्याऐवजी विविध फुलझाडांची, पारंपरिक झाडांची रोपे वाटणे शक्य आहे. कापडी पिशव्यांचे ‘वाण’ देऊन पर्यावरण जतनाचा संदेश देता येतो.
घरच्या घरी मुलांना, मोठ्यांना सोबतीला घेऊन तीळ आणि गुळाचे लाडू करून ते वाटता येतील. शिवाय मुलांना आमच्या पारंपरिक खाद्यपदार्थांची ओळखही होणार. थंडीत तीळ खाल्ले तर ते आरोग्यवर्धक आहेत हे मुलांच्या लक्षात येईल. लहान प्लास्टिक पिशव्यातून साखररूपी तीळ वाटणे, प्लास्टिकच्याच कपातून सरबत, पाणी देणे या गोष्टी इच्छाशक्तीच्या जोरावर सहज टाळता येऊ शकतात. गरज आहे ती सामाजिक संवेदनशीलतेची!

घरी येणाऱ्या महिलांचा सन्मान करताना हळदीकुंकू लावून त्यांना तिळगूळपाणी देऊन स्नेह वाढवणे हे या सणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यापासून भरकटत न जाता येणाऱ्या पिढीने डोळसपणे या परंपरांचा विचार करावा म्हणून कार्यरत राहाणे गरजेचे आहे.
आपल्याकडे चैत्रात हळदीकुंकू केला जातो तर काही ठिकाणी श्रावण मासाच्या दर मंगळवारी सुवासिनींना मंदिराच्या प्रांगणात बोलावून भेटीगाठी घडवीत हळदीकुंकू लावले जाते. महिला मंडळे, स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत हा सण साजरा केला तर समाजाचा दृष्टिकोन बदलू शकतो.

मकर संक्रातीच्या सान्निध्यातील हळदीकुंकू प्रसन्नता बहाल करतो. नवीनच लग्न करून सासरी गेलेल्या मुलीचं पाहिलं हळदीकुंकू मोठ्या थाटामाटाने साजरे केले जाते. त्यासाठी माहेरहून हळदीकुंकवासाठी लागणारे साहित्य पोहोचविले जाते. त्यात मातीच्या लहान मडक्या ज्यांना ‘सुगड’ म्हटले जाते, त्यात विविध प्रकारचे धान्य घातले जाते. पान-सुपारी, विडा, नारळाचा अर्धा भाग, हळद, पिंजर, गोडधोडाचा पदार्थ, काळी पिड्डूक, सोन्याचे मणी, अणशीच्या दोऱ्यात ओवून घेतलेले हलव्याचे दागिने इत्यादी सर्वांची मांडावळ करून
मग सर्व विधी संपले की संध्याकाळच्या वेळी महिलांना बोलावून त्यांना ‘सुगड’ आणि नारळ दिला जातो. दिलेल्या पिड्डूकीचा पोत गळ्यात बांधला जातो. सोन्याचे मणी मर्जीतील नातेवाईकांना देण्यात येतात. त्यानंतर पुढील चार वर्षे फणी, आरसा, कुंकुमाची डबी आणि हिरव्या बांगड्या हळदीकुंकवाचे ‘वायन’ म्हणून वाटायच्या, अशी पद्धत आहे.
सण समारंभांच्या निमित्ताने आपण एकत्र येतो. तिथं विचारांची देवाण-घेवाण व्हायला हवी. हळदीकुंकवासारखे सण याचसाठी गरजेचे आहेत.
तिळगूळ घ्या स्नेह जपा
नव्या प्रवाहाशी जोडून घेत
नात्यातील गोडवा वृद्धिंगत करा!