– सोमनाथ कोमरपंत
हिरव्यागार आंब्याच्या झाडाच्या सावलीत काळ्या आईची पाटी करून, आंब्याच्या वाळक्या काडीची पेन्सिल करून जोतिराव सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देत होते. हे कल्पनाचित्र नव्हे; ती त्यांच्या जीवनाची वास्तव घटना होती. निसर्गाच्या सान्निध्यात सावित्रीबाईंचे फार दिवसांचे स्वप्न आकारास आले.
प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ध्येयपूर्तीसाठी घट्ट पाय रोवून राहिलेल्या व्यक्तींपैकी सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या अग्रणी म्हणून त्यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. ज्या खडतर काळात रूढिग्रस्त समाजाविरुद्ध त्या ठामपणे उभ्या राहिल्या, स्त्रीवर्गाचे अज्ञाननिवारण व्हावे म्हणून ज्या परीने त्यांनी कष्ट उपसले आणि प्रतिगामी शक्तींकडून ज्या प्रकारची अवहेलना पत्करली त्या काळाची आज आपल्याला कल्पना येणे शक्य नाही. आजच्या आधुनिक लोकशाहीच्या युगात पुरुषाबरोबर स्त्रीला समानतेचे सर्व प्रकारचे हक्क प्राप्त झाले आहेत. संपूर्ण भारतात थोड्याशाच व्यक्ती स्त्री आणि पुरुष यांमधील विषमता नष्ट करण्यासाठी पुढे सरसावल्या आणि त्यांनी पायाभूत असे विधायक कार्य सुरू केले त्यात महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई हे दांपत्य सर्वंकष स्वरुपाच्या विरोधाला न जुमानता धडाडीने आघाडीवर राहिले. त्यांची द्रष्टेपणाची पावले पुढे पडली म्हणून पूर्वपरंपरेतील जीर्ण-शीर्ण रूढी नाहीशा होण्यास मोलाचे सहाय्य झाले. त्या सामाजिक चळवळीचे प्रगल्भ आकलन करून घेणे आणि त्या व्यक्तींविषयीची कृतज्ञता बाळगणे हे आजच्या समाजाचे परम कर्तव्य आहे. सावित्रीबाई फुले या केवळ ज्योतिराव फुले यांच्या ध्येयमार्गातील सहचारिणी नव्हत्या; काही बाबतीत त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र विचारसरणीचे होते. नंतरच्या काळात त्यांच्याविषयी अनेकांनी केलेल्या संशोधनातून ते सिद्ध झालेले आहे. त्यावेळच्या.. किंबहुना आजच्याही मानसिकतेनुसार त्यांचे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व झाकोळले गेले असावे.
सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यापूर्वी त्यांचा जीवनपट थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे शिरवळजवळच्या नायगाव या गावचे ते पाटील. ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. खंडोजी पाटलांच्या चार मुलांपैकी सावित्री हे पहिले भावंड. नंतरचे सदूजी, सखाराम व श्रीपती हे तीन भाऊ. सावित्री ही सुलक्षणी मुलगी होती. भावी आयुष्याची प्रसादचिन्हे बालपणापासून दिसायला लागतात. सावित्रीच्या बाबतीत असे घडत गेले. धीटपणा, सतत कामाची आवड, सेवाभावी वृत्ती, जिद्द आणि चिकाटी इत्यादी गुण तिच्या स्वभावात बालपणापासूनच वसत होते. सुशील मातापित्यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. आपल्या उपजत गुणांची चुणूक ती अनेकदा दाखवत असे. गोरगरिबांविषयी तिला कणव वाटत असे. अनेक गोष्टींची उत्तम जाण लहानपणापासूनच तिला होती. आपणास वाचता येत नाही याची खंत तिच्या मनात होती. शिक्षणाची ओढ तिच्या मनाला लागून राहिली. कोणतीही दैनंदिन कामे आनंदाने, उत्साहाने आणि विशेष जबाबदारीने करण्याची तिची सतत धडपड असे. अनेकांना ती मदतीचा हात देत असे.
वाढत्या वयात तिचे लग्न गोविंदराव फुले यांचे चिरंजीव जोतिराव यांच्याशी झाले. दोन समविचारी व समान धर्मी व्यक्तींचा हा विवाह ठरला. युगप्रवर्तक क्रांतिकार्याची मुहूर्तमेढ या विवाहाने रोवली गेली. कारण पुढील आयुष्यात समाजक्रांतीच्या दिशेने उभयतांची पावले उचलली गेली.
विवाहानंतर सावित्रीबाई फुले यांनी गृहकृत्यदक्षतेचा आदर्श निर्माण केला. सासु-सासर्यांची सेवा करून त्यांची मने त्यांनी जिंकली. शेतातील पिकांची आणि फुलांची त्या काळजी घेत असत. शेतीसाठी राबण्याचे बाळकडू त्यांना माहेरीच प्राप्त झाले होते. पण सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य प्रकट होण्याचा सुवर्णक्षण जवळ येऊन ठेपला होता. फुललेल्या फुलांच्या मळ्यात काम करताना दीन-दुबळ्या स्त्रियांच्या जीवनाची फुलबाग फुलविण्याचे संकल्प त्यांच्या मनात जन्म घेत होते. सावित्रीबाई आणि जोतिराव काळ्या मातीत राबत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी विश्रांतीचा क्षण लाभत असे. हिरव्यागार आंब्याच्या झाडाच्या सावलीत काळ्या आईची पाटी करून, आंब्याच्या वाळक्या काडीची पेन्सिल करून जोतिराव सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देत होते. जोतिरावांची मावस बहीण सगुणाबाई ही धनकवडीच्या पाटलांची मुलगी. तीही या दांपत्यासोबत शिक्षणाचे धडे घेत असे. हे कल्पनाचित्र नव्हे; ती त्यांच्या जीवनाची वास्तव घटना होती. निसर्गाच्या सान्निध्यात सावित्रीबाईंचे फार दिवसांचे स्वप्न आकारास आले.
दलित बांधवांना आधार देण्यातही या दयाळू दांपत्याचे एकमत होत असे. त्यांचे आचार-विचार आणि वर्तन एकरूप झाली होती. एकीकडे समाजसेवेचे व्रत स्वीकारून सार्वजनिक जीवनाच्या नव्या तेजस्वी पर्वाला या दांपत्याने प्रारंभ केला. घरापासूनच ही सुधारणा सुरू झाली. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात जोतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांचा हा नवा संकल्प तात्या भिडे यांना आवडला. त्यांनी जागेचे भाडे न घेता शाळेसाठी जागा दिली. शिवाय दरमहा पाच रुपये देण्याची त्यांनी आपली इच्छा प्रकट केली. एकशे एक रुपये देणगी म्हणून सुरुवातीला दिले. या स्त्रियांच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरूवात केली. सहा विद्यार्थिनींनी या शाळेत प्रवेश घेतला.
पुण्यात शाळा सुरू झाली आणि त्यामुळे धर्ममार्तंडांचे पित्त खवळले. त्यांनी फुले दांपत्यावर शिव्याशापांचा वर्षाव सुरू केला. तेवढ्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी त्यांना सर्वतोपरी छळायला सुरुवात केली. त्यातही आगडोंब उसळायला आणखी एक कारण घडले. दलितवस्तीतील मुलामुलींसाठी १५ मे १८४८ रोजी त्यांनी शाळा सुरू केली. सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली. एकतर स्त्रीशिक्षणाला त्यांचा सक्त विरोध होता. त्यांना गुलामांचे जिणे प्राप्त व्हावे असे त्यांचे मत होते. स्त्री शिकली तर ती सुधारेल. त्यातून अनर्थ निर्माण होईल, असे त्यांना वाटे. फातिमा शेख यांनी त्यांना या कार्यात सहाय्य केले.
जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याला या त्यांच्या अध्यापनकार्यामुळे गोविंदराव फुले यांचा सक्त विरोध झाला. या दांपत्याला गृहत्याग करावा लागला. सावित्रीबाई घराबाहेर पडताच त्यांनी डोक्यावर पदर घेतला. त्यांच्या डोक्यावर पाण्याचा वर्षाव झाला. मागाहून शेणगोळ्याचा मारा त्यांच्यावर झाला. अपशब्दांचाही मारा झाला. एक दगडही भिरभिरत त्यांच्या कानशिलापर्यंत आला. रक्त आले. पण सावित्रीबाईंनी स्थितप्रज्ञ राहून या प्रकाराकडे पाहिले. त्यांना ध्येयावरील अविचल निष्ठेमुळे केवढे मोठे मनोधैर्य प्राप्त झाले होते! जोतिरावांना आपल्या पत्नीच्या कृत्याबद्दल अभिमान वाटला. गृहत्यागानंतर या दांपत्याला समर्पणशील वृत्तीने अध्यापनकार्य करायला आणि सार्वजनिक क्षेत्रात सेवाकार्य करायला मुक्त क्षेत्र लाभले. गफार चाचांनी त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. दुसर्या दिवसापासून गंजपेठेतील एका ओळखीच्या ठिकाणी जोतिरावांसाठी जागा पाहण्यात आली. त्या दोघांचे शिक्षणकार्य पुढेही न डगमगता चालू राहिले. त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही करण्यात आले. पण त्यांचे कार्य अविरत चालू राहिले.
१६ नोव्हेंबर १८५२ रोजी सरकारने जोतिराव व सावित्रीबाई यांचा गौरव केला. त्यावेळी सावित्रीबाईंनी उद्गार काढले, ‘‘बंधू-भगिनींनो, आपल्या समाजातील स्त्रिया व शूद्रातिशूद्र यांची संख्या मोठी आहे. या सार्या समाजाला आजवर शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. या लोकांच्या घरात ज्ञानगंगा पोचवावी या उद्देशाने मी काम सुरू केलं…’’. ‘‘सावित्रीने अनेक अडीअडचणींना तोंड देऊन सर्व कार्यभार सांभाळला’’, असे जोतिराव म्हणाले. आपल्या पतीच्या अंत्ययात्रेत गाडगे धरणारी पहिली भारतीय स्त्री म्हणून सावित्रीबाईंचा उल्लेख करावा लागेल.
सावित्रीबाईंनी लेखनही केले आहे. काव्यफुले (१८५४) आणि ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह. ‘जोतिबांची भाषणे’, सावित्रीबाईंची जोतिबांस पत्रे’ व ‘मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे’ ही पुस्तके त्यांनी संपादित केली. १८९६ मध्ये पुण्याला उद्भवलेल्या भीषण दुष्काळात आणि नंतरच्या प्लेगच्या साथीत त्यांनी अनेकांना सहाय्य केले. १० मार्च १८९७ ला प्लेगमुळे त्यांना मृत्यू आला. हा दुर्दैव दुर्विलास होय.