स्त्रियांमधील वंध्यत्व ः कारणे व उपचार

0
16
  • डॉ. मनाली महेश पवार

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, सतत वाढत जाणारा ताणतणाव, स्पर्धा, करिअरच्या मागे धावणे इत्यादीतून वाढत जाणारे लग्नाचे वय वंध्यत्व निर्माण करत आहे. खरे तर गर्भधारणा ही नैसर्गिक आहे, पण आजच्या काळात वंधत्वाचे वाढते प्रमाण पाहता हा एक चिंता वाढवणारा विषय बनत चालला आहे.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, सतत वाढत जाणारा ताणतणाव, स्पर्धा, करिअरच्या मागे धावणे इत्यादीतून वाढत जाणारे लग्नाचे वय वंध्यत्व निर्माण करत आहे. खरे तर गर्भधारणा ही नैसर्गिक आहे, पण आजच्या काळात वंधत्वाचे वाढते प्रमाण पाहता हा एक चिंता वाढवणारा विषय होत चालला आहे.
वंध्यत्व म्हणजे काय?
वंध्यत्व ही एक वैद्यकीय स्थिती आहे. एक वर्षाचा काळ लोटला तरी, सतत शारीरिक संबंध येऊनही गर्भधारणा होत नाही, अशी तक्रार असते. पूर्वी जेव्हा लग्ने विसाव्या-एकविसाव्या वर्षी व्हायची तेव्हा अगदी दोन वर्षे पाळणा हलला नाही तरी औषधोपचार करायची गरज नव्हती. काहींची गर्भधारणा उशिरा व्हायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. लग्नाचे वय आता तिशी-पस्तिशीत आले आहे. या काळात गर्भधारणेस योग्य अशा अंड्याचीही उत्पत्ती होत नाही. त्याचबरोबर लठ्ठपणा, थायरॉइडचा त्रास, शूगरचा त्रास, ‘पीसीओएस’ इत्यादी आजार तिशीतच मान वर काढायला लागले आहेत. त्यामुळे पस्तिशीत लग्न होणाऱ्यांनी मात्र सहा महिनेच वाट पाहावी व नंतर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

वंध्यत्व हे दोन प्रकारचे असते. प्रायमरी वंधत्व व सेकंडरी वंध्यत्व. प्रायमरी इन्फर्टिलिटीमध्ये कधीच गर्भधारणा होत नाही व सेकंडरी इन्फर्टिलिटीमध्ये स्त्रीस एखादं मूल झालेलं असतं पण नंतर गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा होते व वारंवार गर्भपात होतो यालाही सेकंडरी इन्फटिलिटी म्हणतात.

वंध्यत्वाची कारणे
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ऋतू, क्षेत्र, अम्बू व बीज हे चार घटक उत्तम असल्यास निरोगी, सुदृढ गर्भाची उत्पत्ती होते व यातील एखाद्या जरी घटकामध्ये दोष निर्माण झाला तर अनपत्यता संभवते.
1) ऋतू ः ऋतू म्हणजे मासिक धर्म- गर्भधारणेसाठी सुयोग्य काळ. अनियमित पाळी हे वंध्यत्वाचे आजचे मुख्य कारण आहे, आणि या अनियमित पाळीचे मुख्य कारण म्हणजे ‘पीसीओएस.’ या ‘पीसीओएस’मध्ये पाळी येण्यासाठी लागणारे व बीजनिर्मितीसाठी लागणारे योग्य हार्मोन्स तसेच गर्भाशयाच्या आतील अस्तरासाठी (एंडोमेटियम) लागणारे हार्मोन्स यांमध्ये बिघाड (असंतुलन) होतो व टेस्टोस्टेरोनसारखे पुुरुषी हार्मोन्स वाढतात व त्यामुळे पाळी येत नाही. ओव्युलेशन होत नाही. चेहऱ्यावर व इतर ठिकाणी दाट केस येतात, ज्यामुळे परत तणाव वाढतो व पाळी अजूनच पुढे ढकलली जाते. वास्तविक तीस दिवसांच्या योग्य ऋतुचक्रामध्ये पाळीपासून 10 व्या ते 20 व्या दिवसांपर्यंतचा काळ गर्भधारणा होण्यास योग्य ऋतुकाल असतो. पण हा ऋतुकाल बिघडल्याने बीजनिर्मिती योग्य काळी होत नाही.

2) क्षेत्र ः क्षेत्र म्हणजे जमीन. महिलांचा विचार करता क्षेत्र म्हणजे प्रजनन संस्था. बाह्य योनी, मध्ययोनी, गर्भाशय, बीजवाहिन्या, बीजकोष या संपूर्ण अवयवांना क्षेत्र समजावे. ही संपूर्ण प्रजनन संस्था प्राकृत असणे गरजेचे असते.

  • बाह्य योनीमध्ये विस्फोट, सूज, इन्फेक्शन इत्यादी असता कामा नये. फिरंग, उपदंशसारख्या व्याधीही वंध्यत्वाला कारणीभूत असतात.
  • मध्य योनीमध्ये बऱ्याच वेळा संकोच असतो. ही मध्ययोनी संकुचित असल्यास संभोग-कष्टता येते व भीती मनात घर करते. त्यामुळेही वंध्यत्व उद्भवू शकते. बऱ्याच वेळा मध्ययोनीमध्ये श्वेतप्रदरसारखे इन्फेक्शनही वंधत्वास कारणीभूत ठरू शकते.
  • गर्भाशय ः गर्भाशयामध्ये फायब्रोइडसारख्या गाठी उत्पन्न होणे, त्याचबरोबर एंडोमेट्रिओसिससारखा आजार होणे, ज्यामध्ये गर्भाशयातील आतील स्तराचा गर्भाशय, बीजवाहिन्या आणि अंडाशयामध्येही गाठी वाढू लागतात, हेही वंध्यत्वाचे एक कारण आहे.
  • त्याचप्रमाणे बीजवाहिन्यांमध्ये ब्लॉक असणे, बीजकोषामध्ये गळू असणे ही सर्व क्षेत्राशी निगडित कारणे आहेत.

3) अम्बू ः झाडाच्या वाढीसाठी जसे खत-पाणी आवश्यक आहे, तसेच निरोगी गर्भधारणेसाठी गर्भाशय व गर्भाच्या पोषणासाठी लागणारे सर्व पोषक घटक म्हणजे ‘अम्बू.’ यामध्ये आधुनिक शास्त्राप्रमाणे विचार केल्यास सर्व हार्मोन्सचा समावेश करता येतो. हे हार्मोन्स ऋतुस्राव, गर्भधारणा, गर्भपोषण, स्तन्यनिर्मितीसाठी महत्त्वाचे ठरतात. यामध्ये असमतोल घडल्यास वंध्यत्वाला कारणीभूत ठरते.

4) बीज ः जन्मतः स्त्रीबीजकोषात ठरावीक संख्येने सूक्ष्म स्वरूपात स्त्रीबीजे दडलेली असतात. दर महिन्याला ठरावीक दिवशी एक-एक बीज परिपक्व होते व त्याचे पुरुष शुक्राणूबरोबर मीलन झाले तर गर्भधारणा संभवते, अन्यथा मासिक स्रावाच्या वेळी स्त्री-शरीरातून हे बीज बाहेर टाकले जाते. हे बीज चांगल्या प्रतीचे (गूड क्वालिटी), परिपक्व होणे गरजेचे असते. जसजसे वय वाढते तसतसे अंड्याची गुणवत्ता खालावत जाते व ही बिजे गर्भधारणेसाठी असमर्थ ठरतात.
ऋतू, क्षेत्र, अम्बू व बीज हे चारही घटक जेव्हा दूषित होतात तेव्हा अनपत्यता संभवते. पण हे चारही घटक दूषित होण्याचे मुख्य कारण हे मिथ्याचरण म्हणजे मिथ्या आहार-विहार. मिथ्या आहार-विहाराने लठ्ठपणा, ‘पीसीओएस’, डायबिटिस, क्षयरोग इत्यादी आजार उद्भवतात व या व्याधी वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात.

वंध्यत्वामध्ये करावयाच्या चाचण्या

  • ब्लड टेस्ट ः सीव्हीसी, ब्लडशूगर, थायरॉइड, प्रोलाक्टीन, एएमएच इत्यादी.
  • सोनोग्राफी ः गर्भाशय व इतर अवयवांतील दोष पाहण्यासाठी तसेच ओव्युलेशन अभ्यासासाठी सोनोग्राफी करावी.
  • लॅपरोस्कोपी याने दूर्बिणीद्वारे फॅलोपिअन ट्यूब, गर्भाषय व इतर भागामध्ये काही दोष असल्यास पाहिला जातो. रुग्णांमध्ये एक किंवा अधिक दोष असतात. त्यांचे निदान करण्यासाठी या तपासण्या कराव्या लागतात.

वंध्यत्वामध्ये आयुर्वेदीय चिकित्सेचा उपयोग

  • वंध्यत्वाची चिकित्सा करताना शोधन, शमन, रसायनाद्वारे आयुर्वेदिय चिकित्सा करावी.
  • प्रजनन संस्था ही अधो भागात अपान वायूच्या कक्षेत येते. त्यामुळे वातदोषाचा मुख्यत्वे करून संबंध येतो.
  • त्याचप्रमाणे रज, रक्त, बीज यांचा रस, रक्त, शुक्र धातूशी संबंध येतो.
  • त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या बाजूलाच मलाशय असल्याने मलावरोधसारख्या आजाराचा अडथळा असल्याने मलाचाही विचार करावा लागतो. त्यामुळे हे दोष, धातू दूषित झाल्यास बस्ती, विरेचन, नस्यसारख्या संशोधनाचा जास्त उपयोग करावा लागतो.
  • त्याचप्रमाणे योनीधावन, योनीपिचू, शिरोधारा यांसारख्या उपक्रमांचा वंध्यत्वामध्ये विशेष फायदा होतो.
  • वंध्यत्वामध्ये कषाय बस्ती, स्नेह बस्तीबरोबर उत्तर बस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर बस्तीमध्ये स्नेह हा गर्भाशयामध्ये प्रविष्ट केला जातो. उत्तर बस्तीने फॉलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉक असल्यास तो ब्लॉक दूर करण्यास मदत होते. बिजाची क्वॉलिटी सुधारण्यासाठीही उत्तर बस्तीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे योनी संकोच असल्यास उत्तर बस्तीने संकुचितपणा जातो.
  • नस्याद्वारे हार्मोनल बॅलन्स प्रस्थापित होण्यास मदत होते.
  • अशोक, लोध्र, कुमारी, शुंठी, शतावरी, अश्वगंधा, यष्टीमधू, ब्राह्मी, हरिद्रा, गोक्षुर इत्यादीसारखी औषधी दृश्ये वंधत्वामध्ये उपयुक्त ठरतात.
  • त्याप्रमाणे चंद्रप्रभा वटी, चंद्रकला रस, कामरधा रस, फलघृत, आमलक रसायन, शतावरी कल्प, अशोकारिष्ट, वसंत कल्प, पुष्यानुग चूर्ण, रसपाचक, रक्तपाचक यांसारखी औषधे वंध्यत्वामध्ये उपयुक्त ठरतात
    .
    वंध्यत्वामध्ये आहार-विहार
  • रज हा रसधातूचा उपधातू असल्याने रसाचे प्रीणन हे सर्व तऱ्हेच्या फळरसाने होते म्हणून रोज एखादे तरी रसाळ फळ खावे.
  • उत्तम, निरोगी, परिपक्व बीजनिर्मितीसाठी सगळ्या प्रकारची बिजे खावीत, म्हणजेच बदाम, शेंगदाणा, तीळ, भोपळ्याच्या बिया, सूर्यफळाच्या बिया, खाटीक, चारोळी, पिस्ता, काजू इत्यादी म्हणजेच बिजाने बिजाची वृद्धी होते.
  • सगळ्या तऱ्हेच्या हिरव्या भाज्या- पालक, मेथी, लालमाठ, क्लॉलिफ्लॉवर, कोबी, ब्रोकोली, ढबू मिरची, भोपळा, भेंडी, टॉमॅटो, पडवळ इत्यादीचे सेवन करावे.
  • पेरू हे बहुबीज असल्याने बीजनिर्मितीमध्ये विशेष फायदेशीर ठरते.
    आधुनिक शास्त्राप्रमाणे देशील जी व्हिटामिन- इ, कोएन्झाइम लाइकोपीन, मल्टी व्हिटामिन, मल्टी मिनरल्स, प्रोटिनयुक्त आहार वंधत्वामध्ये सांगितला आहे. त्याची पूर्तता वरील आहारामध्ये होते.
  • व्यायामामध्ये योगासने करावीत. भद्रासन, मालासन, हस्तपाद अंगुष्ठासन, सेतुबंधासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम इत्यादी वंध्यत्वामध्ये विशेष लाभकारी ठरतात.
    गर्भधारणा ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे ताण न घेता सकारात्मक दृष्टीने वंधत्वाकडे पाहिल्यास व योग्य आहार-विहाराचे आचरण केल्यास वंध्यत्वाची चिकित्सा करता येते व गर्भधारणा होऊ शकते.