इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे काल रविवारी जाहीर केले. कौटुंबिक कारणास्तव त्याने आपली अनुपलब्धता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाला कळवली आहे. ‘स्टोक्स येत्या काही दिवसांत इंग्लंडहून न्यूझीलंडसाठी रवाना होईल त्यामुळे एजिस बाऊल येथे १३ ऑगस्टपासून व २१ ऑगस्टपासून सुरू होणार्या कसोटींना तो मुकेल, असे ईसीबीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडचा संघ द. आफ्रिका दौर्यावर असताना ‘बॉक्सिंग डे’ कसोटीपूर्वी स्टोक्स याचे वडील डेब यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. सध्या ते न्यूझीलंडमध्ये उपचार घेत आहेत. स्टोक्स याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते. परंतु, या कसोटीत इंग्लंडला पराभूत व्हावे लागले होते. सध्या प्रगतीपथावर असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत स्टोक्सला फलंदाजीत चमक दाखवता आली नव्हती. परंतु, गोलंदाजीत दोन बळी घेत त्याने ही कसर भरून काढली होती.