- डॉ. अनुपमा कुडचडकर
त्वचारोग तज्ज्ञ
सोरीयासिस असलेल्या रुग्णांनी मॉईश्चरायझरचा भरपूर वापर करून त्वचा मऊ ठेवावी. त्वचा अजिबात कोरडी पडू देता कामा नये. ध्यान, प्राणायाम, संतुलित आहार यावरही लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.
सोरीयासिस म्हटलं की कुणालाही एकदम भीति वाटते. हल्ली सोरीयासिस हा आजार कित्येक रुग्णांना झालेला आढळतो. हा आजार जरी अनुवंशिक असला तरी हल्ली कुणालाही कधीही सोरीयासिस होऊ शकतो. या आजारात त्वचेवर वर्तुळाकार चट्टे येतात व त्यावरची त्वचा खपल्याप्रमाणे निघत राहते. या खपल्या जर ओढून काढल्या तर त्यामधून थोडं रक्त निघतं. या खपल्या रुपेरी रंगाच्या असतात. हा आजार डोक्यावर, कोपरं, ढोपरं आणि पाठीवर विशेषत्वाने आढळतो. जास्त प्रमाणात झालेला आजार कधी कधी पूर्ण अंगभर पसरू शकतो. जेव्हा डोक्यावर सोरीयासिस व्हायला सुरुवात होते तेव्हा ते कोंड्यासारखं दिसतं. पण जसजसं ते वाढायला लागतं तेव्हा खपल्या दाट होतात व त्वचेवर चिकटून राहतात. एकदा का या आजाराची सुरुवात झाली की काही महिने ते कित्येक वर्षे हा आजार कमी-अधिक प्रमाणात चालू राहतो.
कित्येक कारणांमुळे हा आजार होऊ शकतो….
* अनुवंशिकता, मानसिक ताणतणाव, त्वचेवर होत असलेले घर्षण, अल्कोहोल (दारू), काही औषधे, संसर्ग, संप्रेरकांमध्ये (हॉर्मोन्स) झालेले बदल इ. कारणे हा आजार होण्यास कारणीभूत ठरू शकतात.
* काही जीवनसत्वांची कमतरताही सोरीयासिस वाढवायला मदत करते.
काही रुग्णांना त्वचेवर झालेल्या सोरीयासिसबरोबरच, त्या रोगाचा सांध्यावरही परिणाम झालेला दिसून येतो ज्याला ‘सोरियाटिक आर्थ्रायटीस’ असं म्हणतात. त्यामध्ये सांधेदुखी, सांध्यांना सूज येऊन सांधा लाल होणे… अशी लक्षणे असतात.
एखाद्या रुग्णाला फक्त तळहातावर व तळपायावर सोरीयासिस झालेलं आढळतं. या प्रकारामध्ये तळहात व तळपायाची त्वचा जाड होते. कधी कधी भेगा पडतात व त्वचा सतत निघत राहते, त्यांना काम करणं खूप कठीण होऊन बसतं. काहींना पस्च्युलर सोरीयासिस होतं. यामध्ये त्वचेवर छोट्या छोट्या लाल, पू भरलेल्या पुळ्या येतात. त्वचा एकदम संवेदनशील बनते आणि त्वचा दुखायलापण लागते. जेव्हा सोरीयासिस पूर्ण शरीरभर होतं तेव्हा त्याला ‘एरिथ्रोडर्मिक सोरीयासिस’ म्हणतात.
कित्येक वेळा सोरीयासिस हा आजार ज्यांना होतो,, त्यांपैकी काही रुग्णांच्या नखांनाही सोरीयासिस झालेला दिसतो. यात नखं ओबडधोबड होतात. नखांच्या खालची त्वचा जाड होऊन नखं वर उचलले जातात. नखं तुटायला लागतात, नखांना भेगा पडतात. अशी काही लक्षणे नखांना सोरीयासिस झाल्यानंतर दिसतात.
उपचार –
सोरीयासिसवर हल्ली भरपूर उपचारपद्धती उपलब्ध झालेल्या दिसतात.
* गोळ्या किंवा औषधे, फोटोथेरपी, बायोलॉजिकल, इमन्युनोथेरपी, लेझर इत्यादी पद्धती आज रूढ आहेत.
* त्याचप्रमाणे सोरीयासिस असलेल्या रुग्णांनी मॉईश्चरायझरचा भरपूर वापर करून त्वचा मऊ ठेवावी. त्वचा अजिबात कोरडी पडू देता कामा नये.
* ज्या कारणांमुळे सोरीयासिस वाढू शकतं त्यांवर आळा घातला पाहिजे.
* ध्यान, प्राणायाम, संतुलित आहार यावरही लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.
* मानसिक ताणतणावावर मात केली पाहिजे.
* आपल्या वाईट व्यसनांचा त्याग केला पाहिजे.
औषधोपचार करावयाचे असतील तर ते मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केले पाहिजेत.