सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु

0
202

>> एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून मार्गदर्शक तत्वे जारी

देशात सध्या चौथा लॉकडाऊन सुरू असून यामध्ये काही सेवांना मुभा देण्यात आलेली आहे. त्यानुसार येत्या सोमवार दि. २५ मेपासून मर्यादित मार्गांवर देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून काल गुरुवारी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली.

देशांतर्गत विमान प्रवासासाठी पुढचे तीन महिने किमान आणि कमाल तिकिट दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली असल्याचे नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विमान प्रवासासाठी लागणार्‍या वेळेवरून तिकिट दर निश्‍चित केला आहे. हे दर कमीत कमी ३ हजार ५०० आणि जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत असल्याचे ते म्हणाले. २४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे दर निश्चित असतील असे मंत्री पुरी यांनी सांगितले.

विमान प्रवासाचे सात प्रकार
या देशांतर्गंत विमान प्रवासाचे सात प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. त्यानसार विमान प्रवासासाठी ४० मिनिटांपेक्षा कमी वेळ, ४० ते ६० मिनिटे, ६० ते ९० मिनिटे, ९० ते १२० मिनिटे, १२० ते १५० मिनिटे, १५० ते १८० आणि १८० ते २१० मिनिटे वेळ यांचा समावेश आहे.

दि. २४ ऑगस्टपर्यंत हे निर्णय असतील असेही श्री. पुरी यांनी स्पष्ट केले. केबिन क्रू अर्थात विमानात असणारे कर्मचारी हे सुरक्षित पोशाखात असतील. त्याचप्रमाणे एका प्रवाशाला एकच चेक इन बॅग प्रवासात नेता येईल. विमान ज्या वेळेला सुटणार आहे त्याच्या दोन तास आधी प्रवाशांनी विमानतळावर येणे बंधनकारक असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जे प्रवासी प्रवास करणार आहेत त्यांनी फेस मास्क लावणे तसेच सॅनिटायझरची बाटलीही सोबत बाळगणे आवश्यक आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे जेवण दिले जाणार नाही. फक्त पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करुन दिल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

१ जूनपासून रेल्वे सेवा
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) व गृह मंत्रालय (एमएचए) यांच्याशी सल्लामसलत करून रेल्वे मंत्रालयाने (एमओआर) येत्या दि. १ जून २०२० पासून भारतीय रेल्वेची रेल्वे सेवा अंशतः सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या १ जूनपासून धावतील व या सर्व गाड्यांचे आरक्षण काल दि. २१ मेपासून सुरू झालेले आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, यात्रेकरी, पर्यटक विद्यार्थी आणि इतरांना आपापल्या ठिकाणी पोचते करण्यासाठी दि. १ मेपासून भारतीय रेल्वेने या श्रमिक स्पेशल गाड्या सोडलेल्या असून २० मेपर्यंत विविध राज्यांत एकूण १७७३ गाड्या चालवल्या गेल्या. यातून २३.५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी आपापल्या राज्यात पोचले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.