राज्यातील भाजप सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री सोन्याच्या तस्करीत गुंतल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केला.
या प्रकरणी काँग्रेसने रेव्हिन्यू इंटेलिजन्स खात्याकडे तक्रार नोंदवली आहे. सदर प्रकरण दाबून टाकण्यासाठी त्या मंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात आहे, असा आरोप पाटकर यांनी केला.
गोव्यातील एका कॅबिनेट मंत्री, त्याचे कर्मचारी, नातेवाईक वारंवार दुबईला जात असल्याचे आढळून आले आहे. मंत्र्याकडून ही कौटुंबिक सहल असल्याचे भासविले जात आहे; मात्र त्यात काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता आहे. सोने तस्करीसाठीच ते वारंवार दुबईला जात आहेत. या प्रकरणात सदर मंत्र्याबरोबर काही सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी पाटकर यांनी केली.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस, संजय बर्डे, एव्हरसन व्हॅलेस, सावियो डिसिल्वा यांची उपस्थिती होती.