सोने कडकडणार?

0
172
  •  शशांक मो. गुळगुळे

सोन्याची किंमत सध्या १० ग्रॅमसाठी ५० हजार रुपयांच्या पलीकडे गेली आहे. सोनेबाजार व्यवस्थेतील ‘अनालिस्ट’च्या मते सोन्याचे भाव येत्या भविष्यात ८० हजार रुपयांपर्यंत (१० ग्रॅमसाठी) उसळी घेतील. हा निष्कर्ष खरा ठरेल?

सोन्याची किंमत सध्या १० ग्रॅमसाठी ५० हजार रुपयांच्या पलीकडे गेली आहे. सोनेबाजार व्यवस्थेतील ‘अनालिस्ट’च्या मते सोन्याचे भाव येत्या भविष्यात ८० हजार रुपयांपर्यंत (१० ग्रॅमसाठी) उसळी घेतील. हा निष्कर्ष खरा ठरेल?
कोणत्याही कारणाने जगात मंदी आली की सोन्याचा भाव गगनाला भिडतो. सध्या आर्थिक व्यवहार मंदावलेले आहेत. ‘लॉकडाऊन’ आणि सततच्या भाववाढीमुळे सोन्याची खरेदी मंदावली आहे. सराफांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी नाही. लग्न समारंभात सोन्या-चांदीची फार मोठ्या प्रमाणावर विक्री होते. पण ‘कोरोना’मुळे यावर्षी तरी लग्नसोहळे होतील अशी शक्यता नाही. सोन्याचा भाव खूपच वाढल्याने इतर ग्राहकांनीही सोने खरेदी थांबविली आहे. थांबविली म्हणण्यापेक्षा सोने खरेदी करणे सामान्य भारतीयाच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे.

२०१९ मध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमला ३५ हजार ३२० रुपये होता, तो आज ५५ हजार रुपयांच्या जवळपास पोचला आहे. दूरदृष्टीचे व ज्यांच्याकडे आजही बर्‍यापैकी पैसा आहे असे लोक आज चढ्या भावातही सोने खरेदी करीत आहेत. कारण सोन्याच्या भावात येत्या काळात ६० ते ६५ टक्के वाढ होईल अशी शक्यता या विषयातील माहीतगार व्यक्त करीत आहेत.

सोन्याच्या दरात होणारे हे ‘ऍप्रिसिएशन’ लक्षात घेऊन गुंतवणूक केली जात आहे. महाराष्ट्रात जळगाव हे शहर सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘होलमार्क’ असलेल्या सोन्याची शुद्धता ९१.६ इतकी असते, पण ५० पेक्षा जास्त वर्षांपासून जळगावच्या ज्युअलर्सनी सोन्याची गुणवत्ता ९४ पेक्षा जास्त टिकवून ठेवली आहे. लॉकडाऊनमध्येही जळगावात सोने खरेदी काही प्रमाणात चालूच होती. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ८० हजार रुपये इतका होईल असे जाणकारांचे मत आहे. सोने बाजार, चांदी बाजार हे शेअर मार्केटसारखे आहेत. दिवसभर व्यवहार सुरू असताना फिजिकल भावात चढ-उतार होत असतात.

सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास ९९५ किंवा ९९९ शुद्धता असलेली कॅडबरीच्या आकारात मिळणारी सोन्याची बिस्किटे खरेदी करावीत. कारण हे सोने विकताना भावात हजार रुपयांपर्यंत फरक पडू शकतो. आणि दागिने खरेदी करायचे असल्यास ९१६ शुद्धता असलेले दागिने खरेदी करावेत.

‘फोर्ब्स’ मासिकाचे मुख्य संपादक स्टीव्ह फोर्ब्स यांनी सोन्याचा भाव का वाढतोय, आणि पुढे किती वाढेल याचे विश्‍लेषण एप्रिल २०२० मध्ये केले होते. त्यांच्या मते जर तुम्ही एक वर्षापूर्वी शेअरबाजारात १० हजार डॉलर्सची गुंतवणूक केली असती तर आता (म्हणजे एप्रिल २०२०) त्याचा भाव ९ हजार डॉलर्स इतका असता. पण तेच १० हजार डॉलर्स सोन्यामध्ये गुंतविले असते तर त्याची किंमत १३ हजार ५० डॉलर्स इतकी असावी. सोने हा असा धातू आहे की याने व्यक्तीच नव्हे तर देशही आपली आर्थिक बाजू स्थिरावू शकतो व याचा अनुभव भारताने कै. चंद्रशेखर पंतप्रधान असताना घेतला आहे. स्टीव्ह फोर्ब्स यांच्या मते कोणाही व्यक्तीने त्याच्या एकूण गुंतवणुकीपैकी फक्त १० टक्के गुंतवणूक सोन्यात करावी. दीर्घकालीन गुंतवणुकीत सोन्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळतो. १९३० नंतरच्या सर्व आर्थिक मंदीत शेअर बाजारात सोन्यापेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. ‘कोविड-१९’मुळे अनेक देशांची सरकारे आर्थिक सवलतीची पॅकेज जाहीर करीत आहेत म्हणून सोने उसळी घेत असल्याचे काही विश्‍लेषकांचे मत आहे.

गुंतवणूकगुरू वॉरेन बफेट सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विरोधात आहेत. फक्त भाव वाढतो म्हणून गुंतवणूक करू नये असे त्यांचे मत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्व खाणींमधील सोने एकत्र केले तर १ लाख ६५ हजार मेट्रिक टन इतके होईल. या सोन्याच्या बाजारी मूल्यापेक्षा अमेरिकेच्या शेअर बाजारचे बाजारी मूल्य तीन पट जास्त आहे.

आणखीन एक नामांकित गुंतवणूकगुरू रेडिसियो यांच्या मते, गुंतवणूकदाराच्या पोर्टपोलिओमध्ये सोन्याची गुंतवणूक १० टक्के असायला हवी. इतिहास पाहिल्यास प्रत्येक मोठ्या आर्थिक मंदीत सोन्याने चांगला परतावा दिलेला आहे. २००२ मध्ये ‘डॉट कॉम’ आर्थिक अडचणीत आली, तेव्हा ‘एस ऍण्ड पी’चा ५०० शेअर निर्देशांक ४९ टक्क्यांनी घसरला होता. पण त्यावेळी सोन्याच्या भावात १२ टक्के वाढ झाली होती. त्याचप्रमाणे २००७ ते २००९ पर्यंतच्या महामंदीत शेअर निर्देशांक ५९ टक्के घसरला होता, पण सोन्याच्या भावात २५ टक्के वाढ झाली होती. २०११ मध्ये शेअर निर्देशांक १९ टक्के घसरला होता तर सोन्याचा भाव ९ टक्क्यांनी वाढला होता.

भारत सरकारने ३ ते ७ ऑगस्ट या कालावधीत सोव्हरीन गोल्ड बॉण्डस् विक्रीस काढले आहेत/होते. म्युच्युअल फंडसारख्या ‘गोल्ड ईटीएफ’बरोबरच येथेही गुंतवणूकदार शेअर बाजाराप्रमाणे ‘ट्रेडिंग’ व गुंतवणूक करतात. ‘एमसीएक्स’वर १ ग्रॅम गोल्ड पेटल, ८ ग्रॅम गोल्ड गिनी, १०० ग्रॅम गोल्ड मिनी व १ किलो गोल्ड बार या उत्पादनांची खरेदी-विक्री होते. एमसीएक्सवर ब्रोकरमार्फत सोने व इतर कर्मोडिटीची खरेदी-विक्री करता येते. एमसीएक्समध्ये गेल्या काही दिवसांपासून रोज अंदाजे १५ हजार कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी-विक्री होते.

जगात सर्वात जास्त सोने भारतीय लोक खरेदी करतात, त्यामुळे भारत सोने व इंधन फार मोठ्या प्रमाणावर आयात करतो. भारतातील लोकांकडे २२ ते २५ हजार मेट्रिक टन सोने असेल असा अंदाज आहे. तर अमेरिकेतील लोकांकडे नऊ हजार मेट्रिक टन सोने असेल असा अंदाज आहे.

सोन्याचा भाव लंडन-न्यूयॉर्क बाजारपेठेत ठरतो. भारतात सौद्यात समान धोरण आणि पारदर्शकता नाही. पूर्वी वेगवेगळ्या राज्यांत सोन्यावर वेगवेगळे कर होते. आता १० टक्के आयात कर आणि ३ टक्क्यांपेक्षा जास्त ‘जीएसटी’ आहे. सोन्याची कायदेशीर आयात केल्यास १३ टक्के कर भरावा लागतो. आपली अर्थव्यवस्था बंदिस्त असताना सोन्याचे ‘स्मगलिंग’ फार मोठ्या प्रमाणावर होत असे. पण अर्थव्यवस्था खुली झाल्यावर ‘स्मगलिंग’चे प्रमाण कमी झाले. पण पूर्ण बंद झालेले नाही. भारतात दागिने मोडून ‘रिफायनरी’मध्ये शुद्ध करण्याचा मोठा उद्योग चालतो. ‘कोरोना’च्या बर्‍याच लोकांनी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) पैसे काढले/काढत आहेत. पण महिलांच्या सुदैवाने अजून त्यांना जीवनावश्यक खर्चासाठी फार मोठ्या प्रमाणावर सोने विकावे लागलेले नाही आणि देवा हीच परिस्थिती कायम ठेव आणि लवकरात लवकर कोरोनाची हकालपट्टी कर.
‘गोल्ड टू सिल्व्हर रेशो’ म्हणजे १० ग्रॅम सोन्याच्या तुलनेत १ किलो चांदीची किंमत असते. हा लेख लिहिताना सोन्याच्या १० ग्रॅमच्या भावाने ५६ हजार रुपयांची पातळी ओलांडली होती, तर चांदीने १ किलोसाठी ६५ हजार रुपयांची पातळी ओलांडली होती. चांदी हा धातू अनेक उद्योगांत लागतो.