मॉडेल व अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या गोव्यात हणजूण येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या शवचिकित्सा अहवालात मारहाणीच्या अनेक खुणा आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अखेर गोवा पोलिसांनी खुनाचे ३०२ कलम नोंदवून घेतले आहे. सोनालीच्या भावाने केलेल्या अत्यंत गंभीर आरोपांमुळे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष असल्यामुळे या मृत्यूप्रकरणाची सर्वोच्च पातळीवरून दखल घेतली गेली. राष्ट्रीय महिला आयोगानेही यासंदर्भात सत्यशोधन समिती स्थापन करून पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले होते. त्यामुळे पोलीस इथवर पोहोचले. अन्यथा ह्रदयविकाराचा झटका ग्राह्य मानून हे प्रकरण गुंडाळले जाऊ शकले असते.
आजकाल समाजमाध्यमांमुळे एका रात्रीत सेलिब्रिटी बनता येते. एकदा का नाव झाले की रिअलिटी शोपासून राजकारणापर्यंत मागणी येते. अवघ्या ४२ वर्षीय सोनाली फोगट यांचा जीवनप्रवास असाच वेगवान राहिला आहे. त्यामुळे एखादा भगभगता दिवा अचानक विझून जावा तसे त्यांचे झाले आहे. ज्या स्वीय सहायकावर त्यांच्या भावाने आपल्या बहिणीच्या हत्येचा थेट आरोप केला आहे, तो आधी पक्ष कार्यकर्ता म्हणून सोनाली यांच्या संपर्कात आला होता व पुढे त्यांच्याच घरचा होऊन गेला होता असे दिसते. तीन महिन्यांपूर्वी याच स्वीय सहायकाने जर सोनाली यांना खिरीतून विष खायला दिल्याचे, आपला अश्लील व्हिडिओ काढून तो ब्लॅकमेल करीत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते, तर आता त्याच माणसासोबत त्या गोव्यात कशासाठी आल्या होत्या व खरोखर ह्या स्वीय सहायकाने सोनाली यांच्याशी असे दुर्वर्तन चालवले होते का हे कोडे उलगडण्याची जबाबदारी आता गोवा पोलिसांची आहे. सोनाली ह्या गोव्यात नेमक्या कशासाठी आल्या होत्या हेही शोधले गेले पाहिजे. भाजपची अनेक उत्तर भारतीय नेतेमंडळी आपल्या येथील सरकारचा फायदा उठवत गोव्यात धंदे व्यवसाय थाटू लागल्याचे दिसत आहे. सोनाली यांचेही गोव्याशी काही व्यावसायिक संबंध होते का ह्याचाही तपास ह्या निमित्ताने झाला पाहिजे.
सोनाली यांचा अनैसर्गिक मृत्यू झालेला असताना मृतदेहाची शवचिकित्सा होण्याआधीच ह्रदयविकाराच्या झटक्याने तो झाल्याचे पोलीस महासंचालकांपासून अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना कोणी सांगितले हेही तपासणे जरूरी आहे. ह्या हत्या प्रकरणात स्वीय सहायक हा केवळ मोहरा आहे, खरे सूत्रधार बडे लोक आहेत असेही दावे सोनाली यांचे काही नातलग करताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास केला पाहिजे.
२०१९ साली सोनाली यांनी हरियाणातील आदमपूरमधून हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र व कॉंग्रेस नेते कुलदीप बिश्नोईंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. ह्याच महिन्यात या बिश्नोईंनी सोनालींची त्यांच्या फार्महाऊसवर सदीच्छा भेट घेतली होती. हरियाणाच्या राजकारणात सोनाली यांचा बराच सक्रिय वावर दिसतो. त्यामुळे या प्रकरणाचे राजकीय अंगही तपासले जावे. हरयाणातील त्यांच्या फार्महाऊसमधील सीसीटीव्ही डीव्हीआर व लॅपटॉप गायब असल्याचे भाऊ सांगतो आहे, त्यामुळे या प्रकरणाचे गूढ निश्चितच वाढते.
२०१६ मध्ये सोनाली यांचा पती संजय फोगट त्यांच्या फार्महाऊसवर संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे सोनाली मृत्यूप्रकरणाची चौकशी करतानाच त्यांच्या पतीच्या हत्येच्या प्रकरणाचीही माहिती नव्याने तपासण्याची आवश्यकता भासते आहे. हे आंतरराज्य प्रकरण असल्याने सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थेकडे ह्याचा तपास सोपविणे अधिक उचित ठरेल. सोनाली यांच्या भावाने आपल्या बहिणीशी झालेल्या संभाषणाचा जो तपशील दिला आहे, त्यात तिने आपले हात पाय कापत असल्याचे आपल्याला सांगितल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे अमली पदार्थांचा वापर कोणी त्यांच्या खाण्यातून करीत होते का, कोणी त्यांना विषबाधा चालवली होती का हेही कसोशीने तपासले गेले पाहिजे. ताज्या गोवा भेटीदरम्यान सोनाली शॅकवर जेवायला गेल्या होत्या. ह्या त्यांच्या गोव्यातील शेवटच्या वावरण्याची सीसीटीव्ही फुटेज निश्चितच उपलब्ध असेल. तिच्या विश्लेषणातून काही ठोस निष्कर्षाप्रत पोलीस लवकरच येतील अशी अपेक्षा आहे. तंदुरुस्त सोनाली यांचा एकाएकी मृत्यू कसा काय ओढवला? त्यांचा मारेकरी कोण आहे? तपास यंत्रणेने लवकरात लवकर हे गूढ उकलावे, ऐन तारुण्यात बळी गेलेल्या या महिलेला न्याय द्यावा आणि या मृत्युप्रकरणामुळे गोव्याची देशभर अकारण चाललेली बदनामीही थांबवावी.